Monday, 21 January 2019

जालन्याची घेवर

जालना शहर हे विविध परंपरांनी नटलेले शहर. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून संक्रांतीच्या काळात घेवर या पदार्थांनी जालनेकरांच्या मेजवानीत आपले स्थान पक्के केले आहे.
सुरुवातीला फुलबाजार परिसरात घेवर बनविले जाई. परंतु या राजस्थानी पदार्थाची मागणी वाढू लागली. आणि आतातर संक्रांतीच्या साधारण महिनाभर आधी जालना शहरातील बडी सडक भागात घेवर बनवण्याची दुकानं थाटली जातात. मैदा, साखर आणि तुपापासून बनवल्या जाणाऱ्या मधमाशीच्या पोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या कुरकुरीत केशरी गोड घेवर आता जालनेकरांच्या मेजवानीचा अविभाज्य घटक बनला आहे.

मैदा घोटून घोटून एका विशिष्ट सपाट कढई मध्ये उकळत्या तुपात साच्यामधे थोडा थोडा टाकला जातो. उकळत्या तुपात पडताच त्याचा थर बनत जातो, एकावर एक थर जमा होत मधमाशीच्या पोळ्यासारखे बनत जाते. त्यामुळे त्यात एक विशिष्ट कुरकुरीतपणा येत जातो.साधी घेवर आणि बदाम, पिस्ता, मावा असलेली घेवर पण विकली जाते. ती महाग असते. जास्त मागणी असते ती साध्या घेवरला. २०० ते ४०० रुपये प्रतिकिलो या भावाने घेवर विकली जाते.
गोड न खाणाऱ्यांसाठी साखर नसलेल्या घेवरही बनवल्या जातात. या सध्या घेवरवर पिस्ते, बदाम, मावा यांचे मिश्रण टाकून त्याचा स्वाद वाढवला जातो. तो मात्र महागड्या भावाने विकला जातो.
येणाऱ्या जाणाऱ्यांची लक्ष वेधून घेणाऱ्या या घेवरचा खप मोठ्या प्रमाणात होतोय. मराठवाड्यात प्रामुख्याने जालन्यातच मोठ्या प्रमाणात बनणाऱ्या केशरी रंगाच्या या घेवरची चव आजूबाजूच्या जिल्ह्यातही पोहचली आहे. आता इथं बनणारी घेवर बाहेर गावी देखील पाठवली जाते.  या घेवर सोबतच शेवयांसारख्या दिसणाऱ्या फेणीला सुद्धा मोठी मागणी असते. केशरफेणी, सांबारफेणी अशा प्रकारची साधी आणि गोड फेणी लोक मोठ्या आवडीने खातात. गरम दुधात फेणी टाकून खाण्याला खवय्ये पसंती देतात. त्यामुळे संक्रांत येऊ लागली की खवैय्यांचे पाय घेवर, फेणीच्या दुकानाकडे वळू लागतात.
- अनंत साळी, जालना



विधवांची संक्रांत

काकडहिरा (ता. बीड) येथील सासर असलेल्या मनिषा जायभाये यांचे पती रामकिसन भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. सन २००६ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. एक मुलगा, एक मुलगी असा परिवार. सर्व काही सुरळीत असताना सन २००९ मध्ये रामकिसन यांचे अपघाती निधन झाले आणि सगळे चित्रच क्षणात पालटून गेले.
मनीषा म्हणतात, “शिक्षिका असूनही वैधव्यामुळे समाजातील मंगल कार्यांतून टाळण्यात आल्याचे अनुभव मला आले. आतापर्यंत सन्मानाने बोलवणारे लोक वैधव्यानंतर मात्र टाळताना दिसून आले. हा अनुभव मनाला लागला.”
 


  खरंतर, मकरसंक्रांत हा तिळगुळ देत एकमेकांना गोड बोलण्याचा संदेश देणारा सण. या दिवशी एकमेकींना वाण देत, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांचे आयोजन करुन सुवासिनी संक्रांत साजरी करतात. मात्र, नियतीच्या आघाताने वैधव्याचे दु:ख सोसणाऱ्या महिलांना अशा सणांमध्ये टाळले जाते.

मनीषा सांगत होत्या, “यातूनच मग गतवर्षी माझ्या गावातील काकडहिरा येथील विधवा महिलांना संक्रांतीला साडीचोळीचे वाण देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा 85 महिलांना साडीचोळी देण्यात आली. त्यावेळी मी लिंबारुई येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होते. त्याच वेळी लिंबारुईतही हा उपक्रम राबवण्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान, माझी बदली पालवण येथे झाली. 
तरीही यंदा लिंबारुईत ६५ महिलांना कालच म्हणजे १४ जानेवारी रोजी साडीचोळी देण्यात आली. यातून समाजात विधवांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.”  या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सविता गोल्हार, जिल्हा परिषद सदस्य रेखा क्षीरसागर, माजी जिल्हा परिषद सदस्य सत्यभामा बांगर यांचीही उपस्थिती होती.
मनीषा यांचे सासऱ्यांचेही निधन झाले आहे. त्यांची मुलगी प्रियंका दंतरोग तज्ज्ञ म्हणून सध्या शिक्षण घेत आहे. तर मुलगा प्रतिक यंदा बारावीत आहे दोन्ही मुलांचे या उपक्रमाला प्रोत्साहन आहे, असं मनीषा सांगतात.

- अमोल मुळे, बीड

पार्वती आजींची डोळस सेवा


 ''इथे एवढी चांगली सेवा मिळते, नर्स प्रत्येकाची काळजी घेतात. चहा, नाश्ता , जेवण सगळं काही वेळच्यावेळी. तरी लोकांमध्ये गैरसमज का?'' रत्नागिरी शासकीय रुग्णालयात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर पार्वती आजींना प्रश्न पडला आणि त्यांनी यावर कामही सुरू केलं.
पार्वती हिराजी गिझम ६७ वर्षांच्या. मूळच्या लांजा बेनीच्या. १०-१२ वर्ष त्यांनी मुंबईत घरकाम केलं. नातीसाठी त्या पुन्हा रत्नागिरीत आल्या. गिझम कुटुंब मोलमजुरी करणारं. मोतीबिंदूचा त्रास जाणवू लागल्यावर त्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या नेत्र विभागात उपचार घेतले. याच शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात हजारो रुपये खर्च होतात. इथं मात्र संपूर्ण सेवा मोफत आहे. याबाबतची माहिती पार्वती आजींनी गावातल्या लोकांना द्यायला सुरुवात केली. शस्त्रक्रिया झाल्यावर आवश्यकता भासल्यास रुग्णाला सोबत म्हणून राहण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. रुग्णांची नातेवाईक असल्याचं त्या इथल्या परिचारिकांना सांगतात.
आजींची तळमळ, विश्वासाचे बोल यामुळे रुग्णालयात जाताना आजी सोबत असाव्यात असं रुग्णांनाही वाटतं. आपली कामं सोडून त्या रुग्णाच्या मदतीला धावून जातात. गेल्या दोन वर्षात लांज्यातल्या १९ रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेतला आहे. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये आणणं, त्यांचा केसपेपर काढणं, तपासण्या करून घेणं, शस्त्रक्रियेसाठी तारीख घेणं, ही सर्व कामं आजी करतात. यासाठी एक पैसाही आपणहून त्या कोणाकडे मागत नाहीत. रुग्णांचे नातेवाईकच स्वतःहून त्यांना चहापाण्यासाठी शंभर-दोनशे रुपये देतात.
''पैशांपेक्षा माणुसकी महत्त्वाची. अडीअडचणीला धावून येणारी माणसं ही संपत्तीच.'' असं सांगणाऱ्या पार्वती आजींच्या मदतीला धावून येणारी अनेक माणसं गावात आहेत. 


-जान्हवी पाटील, रत्नागिरी

तीन हजार पिंपळांनी उजाड शिवाराचं पालटलं रूप

बीड तालुक्यातल्या लोणी घाट गावापासून तीन किलोमीटर अंतरावरचा उजाड परिसर. परिसरात झाडं नसल्यामुळे वाटसरू, पशुपक्ष्यांची दैना होत असे. पाच वर्षांपूर्वी हरिश्चन्द्र भागा ट्रस्टचा आश्रम इथं उभा राहिला आणि चित्र पालटू लागलं.
आज आश्रम परिसरात आणि लोणी पाचंग्री मार्गावर दुतर्फा १० फुटांहून अधिक उंचीचे थोडेथोडके नव्हेत तर तीन हजार घनगर्द पिंपळ वृक्ष आपल्या स्वागताला सज्ज आहेत. माऊली कदम महाराजांनी गेल्या साडेतीन वर्षांपासून अथक मेहनत घेत उजाड शिवाराचं नंदनवन केलं आहे. पिंपळासह लिंबोणी आणि आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड महाराजांनी केली आहे. दुष्काळात ठिबकद्वारे पाणी दिलं, झाडांची वेळोवेळी निगा राखली.

‘’पिंपळाचं झाड दीर्घकाळ टिकणारं आणि प्राणवायू देणारं. औषधी उपयोगही अनेक. पिंपळावरच्या पुष्पशयामुळे पाखरांचीही भूक भागते.’’माऊली कदम महाराज सांगतात.
हृषिकेश, काशी इथं धर्म अध्ययन आणि हिमालय परिसरात आयुर्वेदाचं अध्ययन महाराजांनी केलं. समाजाचं ऋण फेडता यावं यासाठी, आपल्या पालकांच्या स्मरणार्थ महाराजांनी आश्रम उभारला. ‘’वृक्ष असतील तरच जीवसृष्टी बहरेल. वृक्ष नाहीत तर पाऊस, प्राणवायू नाहीं, पशुपक्षी , माणूस जगणार नाहीत. इतकं साधं गणित आहे. ते आपण विसरता कामा नये,’’असं महाराज सांगतात.
- अनंत वैद्य, बीड

भान आरोग्याचे: उत्कर्ष किशोरींचा





जसे कळीचे फुलात रूपांतर होते, तसे निसर्गनियमाप्रमाणे मुले-मुलीही वयात येतात. पण फुलात रूपांतर होण्याची प्रक्रिया जशी सहज-सुलभ, सुंदर असते, तितके हे वयात येणे सुलभ नसते. मुलगा वयात आला की तो मोठा झालाय, हे घर-दार स्वीकारते, पण मुलींच्या वयात येण्याच्या प्रक्रियेने त्यांच्यावर ‘सातच्या आत घरात’ सारखी बंधने येण्यास सुरूवात होते. तिचे मैदानी खेळ कमी होतात, कपडे कोणते घालावेत, कसे घालावेत, मुलग्यांशी कितपत मैत्री ठेवावी याचे कडक नियम बनविले जातात.
हे सगळे पाहून नुकतीच मासिक पाळी सुरू झालेल्या मुली आधीच ‘पाळी’ म्हणजे काय, हे नीटसं ठाऊक नसल्याने भांबावलेल्या असतात. शिवाय वागणुकीवर टाकल्या जाणाऱ्या बंधनाने त्या अधिकच अंतर्मुख होतात. या काळात गरज असते, एका समजूतदार मैत्रीच्या हाताची. तोच मैत्रीचा हात देण्याचा प्रयत्न सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ‘उत्कर्षा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून करीत आहे. ‘उत्कर्ष किशोरींचा, विकास सिंधुदुर्गचा’ हे ब्रीदवाक्य घेऊन सप्टेंबर २०१६ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा कार्यक्रम सुरू आहे.


सिंधुदुर्गमधील सर्व शाळांतील सहावी ते बाराची मुलींना हे मासिक पाळी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिलं जातं. ग्रामीण भागात मुलींच्या आई- आजीचेच मुळात पाळीबाबत अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा असतात. त्यामुळे किशोरी तसेच त्यांच्या माता पालकांशी संवाद साधून मासिक पाळी या शरीरधर्माची शास्त्रीय माहिती पुरविणे, पाळी म्हणजे कसलीही नकोशी घटना नाही, विटाळ किंवा लपवून ठेवण्याजोगी गोष्ट नाही, तर पाळी ही मानववंशाचे सातत्य ठेवण्यासाठी मदत करणारी सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे, असा सकारात्मक दृष्टिकोन मुली आणि त्यांच्या पालकांमध्ये रुजविणे, पाळीच्या काळात काय काळजी घ्यावी, कसा आहार- विहार असावा याचे मार्गदर्शन करणे, हाच ‘उत्कर्षा’ सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.  
   

याकरिता २०१६ मध्ये युनिसेफच्या राज्य समन्वयक भारती ताहिलियानी यांनी शिक्षिका, आरोग्य सहायिका इ.८३७ जणींना मासिक पाळी व्यवस्थापनाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले. पहिल्यांदा या शिक्षिका सुद्धा मासिक पाळीबाबत बोलायला लाजत होत्या. पण भारती ताहिलियानी यांनी गप्पा मारत, वेगवेगळे खेळ घेत महिलांना बोलते केले. या प्रशिक्षणामुळे शिक्षिकांमध्ये सकारात्मक बदल घडून आले. ताहिलियानी यांनी मासिक पाळीची शास्त्रोक्त माहिती दिली, उपस्थितांचे गैरसमज आणि अंधश्रद्धा कशा निराधार आहेत, ते सोदाहरण स्पष्ट केले.
या प्रशिक्षणार्थी आता शाळाशाळातून विद्यार्थिनी तसेच त्यांच्या मातांची जनजागृती करतात. या प्रशिक्षणामुळे घडलेल्या ठळक बदलांची उदाहरणे:

• कणकवलीमधील घोणसरी नं.१ शाळेतील एका विद्यार्थिनीने मासिक पाळीच्या वेळी पाळण्यात येणाऱ्या पारंपारिक रूढीवर बंड करून आईचं मतपरिवर्तन केलं.
• दोडामार्ग तालुक्यातील आयनोडे सरगवे पुर्नवसन झरे शाळेतील एका विद्यार्थिनीची मासिक पाळी सुरू असताना शाळेतील शिक्षिकांनी तिला सरस्वती पूजनाच्या वेळी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं.
• वेंगुर्ल्यातील मोचेमाड नं.१ शाळेच्या समोर मंदिर असल्याने बऱ्याच मुली पूर्वीपासून पाळी आली की चार दिवस शाळेत गैरहजर असायच्या. ‘उत्कर्षा’ उपक्रमातील मासिक पाळीविषयक सत्रांमुळे त्यांना पाळी म्हणजे काहीही अशुभ नसते याची जाणीव झाली आणि त्यांची शाळेतील उपस्थिती नियमित झाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या उत्कर्षा उपक्रमाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा: http://samata.shiksha/…/utkarsha-initiative-adolescent-gir…/


- मृणाल आरोसकर, सिंधुदुर्ग  #तेपाचदिवसतिलापरतमिळवूनदेऊया


कर्तव्यदक्ष अधिकार्‍याला साश्रू नयनांनी दिला निरोप

३१ डिसेंबरचा दिवस. सजलेला मंडप, पाहुण्यांची वर्दळ, डोळ्यांमध्ये अभिमान आणि पाणी. माजलगाव
 ग्रामीण पोलीस वसाहतीमध्ये पोलीस निरीक्षक मिर्झा बेग यांचा निरोपसमारंभ सुरू होता. बेग, कर्तव्यदक्ष अधिकारी. परळीतल्या स्त्रीभ्रूण हत्येतील मुख्य आरोपी डॉ सुदाम मुंडे यांना बेड्या ठोकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे.
दोन दिवसांपासून त्यांच्या निरोपसमारंभाची तयारी सुरू होती. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून जवळपास ५७ हजार रुपयांची वर्गणी गोळा केली होती. प्रमुख पाहुण्या म्हणून माजलगाव विभागाच्या उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार ,तहसिलदार एन.जी.झंपलवार ,माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बापूसाहेब महाजन, निरीक्षक रवींद्र शिंदे, उपनिरीक्षक विकास दांडे. बेग दाम्पत्याचं स्वागत. सेवेत दाखल झाल्यापासून पोलीस निरीक्षकापर्यंतच्या प्रवासाची फोटो फ्रेम भेट. मिर्झा यांच्याबद्दलच्या भावना आणि आठवणी, असा सगळा हृद्य कार्यक्रम.

मुख्य कार्यक्रमानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी फुलांनी सजवलेली उघडी जीप तयार ठेवण्यात आली होती. त्यामध्ये बेग यांच्यासह नवे पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत. पोलीस वसाहतीतून निघालेली वाजतगाजत मिरवणूक थेट पोलीस ठाण्यात पोहचली. त्यानंतर सुरेश बुधवंत यांनी पदभार स्वीकारला.
बेग मूळचे नांदेडचे. पोलीस खात्यात ३४ वर्षांची सेवा. सहकारी आणि नागरिकांसोबत त्यांचा उत्तम संवाद. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवत सामाजिक सलोखा जपणारे लोकप्रिय अधिकारी. बीड जिल्ह्यात सलग १२ वर्ष त्यांनी पोलीस दलाचं मान उंचावणारे काम केलं . गेल्या वर्षी ते १९ जानेवारीला माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात रूजू झाले. माजलगाव पोलीस ठाणे ऑनलाईन करून दुसरा क्रमांक त्यांनी पटकावला.
‘’काम करताना अडीअडचणी येतातच. पण प्रत्येक अडचणीवर साहेबांकडे तोडगा असे.’’ माजलगाव ग्रामीणचे पोलीस नाईक राजेंद्र ससाणे सांगत होते. ‘’ठाण्यातील पोलिसांशी ते मित्र म्हणून वागले .त्यांच्याबरेाबर काम करताना कधीच भीती वाटली नाही, आदरयुक्त धाक त्यांच्याबद्दल वाटे.
- दिनेश लिंबेकर, बीड

माळेगावची जत्रा...

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगांव. गावाची लोकसंख्या अडीच तीन हजार. नांदेड-लातूर महामार्गावरच्या या गावाचं अस्तित्व एरवी कुणालाही ओळखू येणार नाही. पण मार्गशीर्ष महिन्यात या गावात लाखो लोक येतात. वद्य एकादशीपासून सुरू होते, दक्षिण भारतातील सर्वांत मोठी माळेगावची जत्रा.
यावर्षी ३ ते ८ जानेवारी दरम्यान ही जत्रा भरली होती. देशभरातून व्यापारी या ठिकाणी आपली उत्पादने घेऊन येतात. घोडे, गायी-बैल, उंट, गाढव, म्हशी, कुत्रे, अशा विविध पाळीव प्राण्यांचा बाजार दरवर्षी येथे भरतो.
पूर्वी खेड्यातील लोकांच्या अनेक गरजा भागविण्याचं, संवाद, गाठीभेटी, संस्कृतिक देवाण-घेवाण करण्याचं महत्त्वाचं केंद्र म्हणून, अशा जत्रा भारतीय संस्कृतीत खूप उपयोगी असायच्या. आता काळ बदलला. माळेगांवच्या जत्रेचं महत्त्व मात्र आज शेतीसाठी उपयोगी वस्तूंच्या खरेदीविक्रीसाठी आहे. लहानात लहान औजारापासून, कपडे, गालीचे ते उंट, घोडे, गाढव, बैल-गाईंपर्यत सर्व गोष्टी इथं विक्रीसाठी उपलब्ध असतात.
   खाण्यापिण्याची विविध दुकानं हे या जत्रेचं खास वैशिष्ट्य. पेढे, बत्तासे, जिलेबी, तांदळाची खिचडी, भजे या सारख्या पदार्थांबरोबरचं मराठमोळ्या चवीचे झुणका भाकर, चिकन, मटणाचे विविध पदार्थ या जत्रेत खवय्यांना स्वस्त दरात उपलब्ध असतात. या सर्व व्यवहारात करोडो रूपयांची उलाढाल दरवर्षी माळेगावच्या जत्रेत होते. ११ व्या शतकात प्रतिष्ठापना झालेल्या खंडोबा देवस्थानाचा हा वार्षिक उत्सव. त्या निमित्ताने ही जत्रा गेल्या अनेक शतकांपासून भरत आहे. खंडोबाची पत्नी बाणाई खंडोबावर रूसून आजचे बनवस (बनवस याचा अर्थ वनवास असाही होतो.) या गाव आली, तिचा शोध घेत श्री खंडेराया माळेगाव येथे आले व गुप्त रूपात तेथेच राहिले. ११ व्या शतकात उदगीर येथील तांदळाचे व्यापारी माळेगाव येथून प्रवास करीत असताना त्यांना दृष्टांत झाला, तेव्हा त्यांच्या जवळील तांदुळाच्या पोत्यांमध्ये खंडोबाचा तांदळा असल्याचं आढळलं.
 मग याच व्यापार्‍याने खंडेरायाच्या तांदळ्याची प्रतिष्ठापना केली. आणि दरवर्षी उत्सव व जत्रेचं आयोजन केलं असा इतिहास येथील लोक सांगतात. आज महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, राजस्थान, गुजरात अशा अनेक राज्यातून या ठिकाणी भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी येतात. व्यापारीही येतात. १७ व्या शतकात मराठे आणि निजाम यांच्यात झालेल्या उदगीरच्या लढाईच्या वेळी या जत्रेतून मराठ्यांनी चार हजार घोडे खरेदी केल्याचा किस्सा आजही येथील लोक अभिमानाने सांगतात.
अठरा पगड जाती आणि बारा बलूतेदार या जुन्या भारतीय संस्कृतीचं प्रतिबिंब म्हणजे माळेगांवची जत्रा. या जत्रेत गोसावी, गारूडी, घिसडी, जोशी, कोल्हाटी, मसनजोगी, पांगुळ, वासुदेव, वैद्य अशा विविध भटक्या विमुक्त समाजाच्या जातपंचायती भरतात.

खंडोबाच्या साक्षीने त्यांचे न्यायनिवाडे, तंटे, विवाह आदी विविध सामाजिक विषयावर चर्चा होऊन अनेक निर्णय घेतले जातात.
देशातील विविध भागातून लोककलाकार या ठिकाणी येऊन आपली कला सादर करतात. त्यांना धन, रसिक श्रोत्यांची वाहवा लाभते. शेकडो एकरात ही जत्रा भरते. सर्वत्र पालं, राहूटया, रोशनाई याने सर्व परिसर भरून जातो.
नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती व माळेगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने या जत्रेचं, आज आयोजन केलं जातं. नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने या ठिकाणी भव्य असं कृषी प्रदर्शन यावर्षी भरवलं आहे. कृषी क्षेत्रातील विविध कंपन्या, मसाले, पिके, भाजीपाला उत्पादक यांनी या कृषी प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. खंडेरायाची शासकीय पूजा, पालखी, कृषि प्रदर्शन, पशु, अश्‍व, कुक्कुट व श्‍वान प्रदर्शन व कुस्ती स्पर्धा, लावणी महोत्सव व पशु प्रदर्शनातील विजेत्यांना बक्षीस वितरण, अश्‍व प्रदर्शन व चाल स्पर्धा, पारंपारिक कला महोत्सव अशा विविध गोष्टींनी ही जत्रा सजते.

- उन्मेष गौरकर, नांदेड