Monday, 12 March 2018

विज्ञानप्रसारक बापमाणूस

एकुलती एक गुणी मुलगी कविता. तिला रक्ताचा कर्करोग झालेला. तिचं कोमात जाणं. महिनोन् महिने चालणारे उपचार. या मुलीचा बाप डॉ शंभुनाथ कहाळेकर, तंत्रग्राम संकल्पनेचे जनक. विज्ञानप्रसारक म्हणून सर्वपरिचित झालेले. त्यांच्या लेकीचा आजार सुरू झाला १९९२ साली. ती आजारातून बरीही झाली. तेव्हा तिचं लग्न झालं. शंभुनाथांना नातही झाली. पण नंतर कविताचा आजार बळावला. या सर्व काळात या दुःखी, व्यथित बापाने मन गुंतवण्यासाठी विज्ञानप्रसाराचा मार्ग शोधला.
गेल्या २५ वर्षात विज्ञानरंजनाचे तीन हजार प्रयोग, 



विज्ञानेश्वरी,विज्ञानबोध,विज्ञानवेध,विज्ञानगीता,विज्ञानपुराण,विज्ञानकविता, वीजविज्ञान, खेड्यासाठी विज्ञान, घर पहावं बांधून,विज्ञानातील गमतीजमती,वैद्यकीय उपकरणे हे त्यांच्या नावावर जमा आहे.अलिकडे विज्ञानरंजन आणि तंत्रग्राम प्रदर्शन असा कार्यक्रम ते करतात. विज्ञानाच्या अनेक गंमतीजमती, छोट्या प्रयोगातून विज्ञान समजून देणं, भोंदूगिरीवर आघात आणि रोजगारमार्गदर्शन असा हा कार्यक्रम. सारं विनामूल्य.
       पाचपाचशे घरं असलेली, निवघा बाजार आणि चीमेगाव ही त्यांनी केलेली नांदेड जिल्ह्यातली तन्त्रग्रामं. या कामासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना 20 लाखाचा निधी दिला. या कामात त्यांना तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी, आमदार डी.पी सावंत यांचं मोलाचं सहकार्य झालं. इथे महिलांना पाचशे रुपये भांडवलावर निर्धूर चूल बनविण्याचं तंत्र शिकविण्यात आलं. त्यावर या महिलांची पोटापुरती कमाई होते. महिलांना कचऱ्यापासून कोळसा बनविण्याची यंत्रंदेखील देण्यात आली आहेत. तंत्रज्ञानाधारित असे शंभर उद्योग करायला कहाळेकर मार्गदर्शन करतात.
कहाळा गावी जन्मलेले डॉ शंभुनाथ कहाळेकर. १९७७ मध्ये आयआयटी, खरगपूरहून एमटेक पदवी, टाटा कन्सल्टिंगमध्ये काही वर्ष नोकरी, १९८७ पासून नांदेडच्या एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकी, पीएचडी मार्गदर्शक, मराठी विज्ञान परिषदेचे सक्रीय सदस्य, आहेत. विज्ञानप्रसाराच्या कार्यासाठी आणि पुस्तकलेखनासाठी पुरस्कार ही त्यांची ओळख. कहाळेकरांची मुलगी कविता आज हयात नाही. २०१७ मध्ये ३६व्या वर्षीच तिचं निधन झालं. नात कीर्ती आणि पत्नी सुनीता यांच्या मदतीने ते दुःखातून बाहेर पडत आहेत. आज वयाच्या ६६ व्या वर्षीही विज्ञान तंत्रज्ञानप्रसाराचं त्यांचं कार्य सातत्याने सुरूच आहे.

- सु.मा. कुळकर्णी.

Saturday, 10 March 2018

बँक ऑफ न्यूयॉर्कने दखल घेतलेली जि.प. शाळा!!

पुण्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी सहज टॅब आणि संगणक हाताळतात. तुम्हांला वाचून आश्चर्य वाटेल पण संपूर्ण शाळेत वायफाय आहे. शाळेत इ-लर्निंग आहे. मुलांना संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यासाला पूरक असे व्हिडिओ, गाणी, सोपे शैक्षणिक खेळ असं बरंच काही हाताळायला मिळतं. विशेष म्हणजे ही शाळा विजेसाठी ‘महावितरण’वर अवलंबून नाही. इतर खेड्यांप्रमाणे वाबळेवाडीलाही भारनियमनाच्या संकटाने ग्रासलेलं होतं. शाळा डिजिटल हवी तर वीज हवीच. त्यामुळे यावर उपाय म्हणून शाळेने सौरउर्जेचा वापर करून घ्यायचे ठरवले. आज ही शाळा स्वत:ची विजेची संपूर्ण गरज स्वत:हून भागविते. इतकंच नाही तर, वाबळेवाडी गावातील काही पथदिव्यांनाही वीज पुरविते. हे कामही ग्रामस्थांच्या मदतीने उभं केल्याचं वारे सर नम्रपणे सांगतात.आम्हांला वाटत होते, शाळा जवळपास पूर्ण पाहून झाली, पण सर्वात महत्त्वाचे आश्चर्य तर बाकीच होते. वारे सरांनी आम्हांला शाळेच्या मागील भागात नेले. तिथं एक वेगळंच बांधकाम उभारताना दिसले. या बांधकामाविषयी वारे सर म्हणाले, “येत्या शैक्षणिक वर्षात आमच्या विद्यार्थ्यांसाठी हे सरप्राईज असेल. बहुतांश मुलांना शाळेच्या चार भिंतीत शिकायला नको वाटतं, त्यांना मोकळ्या हवेत, बाहेरची गंमत- जंमत बघत शिकायचं असतं. माझ्या विद्यार्थ्यांनीही अशीच भरपूर सूर्यप्रकाश, वारा आणि मोठ्या खिडक्या असलेल्या शाळेची मागणी केली होती, ती आम्ही पूर्ण करतोय.”

                                                                       वारे सरांच्या बोलण्यातून कळलं की शाळेची जागा कमी पडत असल्याने शाळेला लागून असलेली मागची काही एकर जमीन गावकऱ्यांनी एकमताने शाळेला दान केलेली आहे. या जागेवर विद्यार्थ्यांच्या मनातील शाळा उभारण्याचं काम सुरु आहे आणि त्या कामाकरिता आर्थिक मदत देतेय ती- बँक ऑफ न्यूयॉर्क!! होय, वाबळेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेची कीर्ती ‘बँक ऑफ न्यूयॉर्क’पर्यंत पोहोचली आणि त्यांनी स्वत:हून आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. या बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या मदतीतून शाळेची पर्यावरणपूरक इमारत उभी राहतेय. या वर्गांच्या भिंती म्हणजे पूर्ण काचेच्या, सरकत्या खिडक्या असणार आहेत. वर्गात पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा येणार आहे. पावसाचे पाणी साठविण्यासाठी प्रत्येक वर्गाखाली सुमारे 30 हजार लीटरची मोठी टाकी उभारून जलपुनर्भरण करण्याचं नियोजन आहे आणि अर्थात सौरउर्जेचा वापर तर होणारच आहे!!
इथल्या एका विद्यार्थिनीने तेलाच्या जुन्या डब्यापासून इकोफ्रेंडली ‘हँडवॉश स्टेशन’ उभारले आहे. ग्रामीण भागातील पाण्याच्या टंचाईतसुद्धा स्वच्छतेचा आग्रह धरणारा हा आगळा उपक्रम आहे. पूर्वी पाण्याच्या टाकीद्वारे हात धुवायला लागणारे 200 लीटर पाणी आता केवळ 50 लीटरवर आले आहे, शिवाय स्वच्छतेसाठी राख आणि निंबोणीपासून विद्यार्थ्यांनी बनविलेला साबणही आहे.
शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे सरांना 2016 साली ‘राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार’ही मिळालेला आहे. अगदी साध्या वेशातील वारे सरांनी ही जिल्हा परिषद शाळा अशाप्रकारे बदलली आहे की अनेक पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून काढून विद्यार्थ्यांना वाबळेवाडीच्या आयएसओ शाळेत दाखल करीत आहेत. आम्ही गेलो तेव्हा शाळेत प्रवेशासाठी रांगा लागलेल्या होत्या, हे वेगळं सांगायला नकोच!!

- स्नेहल बनसोडे- शेलुडकर

Friday, 9 March 2018

भारतीय आईनस्टाइन अजिंक्य !




आईनस्टाइन! ज्याच्या नावावर तब्बल साडेतीन हजार पेटंट आहेत. असं म्हणतात की, आईनस्टाइननंतर त्याच्या बुध्यांकाची बरोबरी करणारा अजून तरी कुणीही भूतलावर अवतरला नाही. पण, यवतमाळच्या अजिंक्यचा प्रवास या दिशेने सुरू आहे. संशोधनाच्या विश्वात, ‘इनमॅच्युअर एज’ अर्थात, वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत आईनस्टाइनच्या नावावर 15 पेटंट रजिस्टर्ड होते. यवतमाळच्या अजिंक्य रवींद्र कोत्तावार या मॅकेनिकल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याच्या नावावर वयाच्या 25 व्या वर्षी तब्बल 12 पेटंट रजिस्टर्ड झाली होतीे. वयाच्या 25 व्या वर्षापूर्वी मला आईनस्टाइनच्या विक्रमाबद्दल माहीत असतं, तर मी निश्चित 15 पेटंटचा आकडा पार केला असता, पण आता वेळ निघून गेली आहे, असं अजिंक्य सांगतो.
                                  

 अजिंक्यची घरची परिस्थिती जेमतेम. त्याने यवतमाळमधूनच मॅकेनिकल अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. शाळेपासूनच त्याला विविध प्रयोग करून पाहायची हौस. अभियांत्रिकीमुळे त्याला अधिकच चालना मिळाली. सध्या अजिंक्य 26 वर्षांचा असून त्याच्या नावावर 17 पेटंट रजिस्टर्ड आहेत. 26 वर्षाच्या वयात भारतातील सर्वाधिक पेटंट रजिस्टर्ड करणारा तरूण म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड यांनी त्याची दखल घेतली आहे. आयपी इंडिया अर्थात इंटिल्यॅक्चुअल प्रॉपर्टी ऑफ इंडिया या संकेतस्थळावर
अजिंक्यच्या सर्व पेटंटची माहिती बघायला मिळते. आयपी इंडियावर नोंदणी झाल्याशिवाय कोणत्याही संशोधनासाठी पेटंट मिळत नाही, असं अजिंक्य सांगतो. डिसेंबर 2017 मध्ये झी युवा वाहिनीतर्फे ‘यंग इंडियन सायंटिस्ट’ हा सन्मान देऊन अजिंक्यचा गौरव करण्यात आला. पद्मश्री डॉ. विजय भटकर यांच्या समवेत अजिंक्य सध्या एज्युकेशन सिस्टीमवर काम करीत आहे. विद्यार्थ्यांना प्रक्टीकल लर्निंगवर भर देऊन शिक्षणपद्धती विकसित करण्यासाठी त्याचे सध्याचे संशोधन सुरू आहे. त्याने दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्याक्रम तयार केला आहे. विद्यार्थी प्रात्यक्षिकातून धडे गिरवतील अशी विविध 500 मॉडेल्स त्याने तयार केलीे आहेत.
आसाममधील सिलचर इथल्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी इथे त्याने उच्च शिक्षण घेतलं. तिथे चहाच्या बागांमध्ये फिरताना, त्याने चहाच्या झाडांची फेकून दिलेली पानं बघितली. त्या पानांपासून त्याने बायो डिझेल तयार केलं. त्याचं हे संशोधन तिथल्या पेट्रोलियम लॉबीने पूर्णत्वास जाऊ दिलं नाही. शेवटी, त्रासामुळे आसाम सोडून यावं लागलं, असं तो सांगतो. असाच वाईट अनुभव ‘डिजिटल बायोमेट्रिक वोटिंग सिस्टम’च्या संशोधनादरम्यान त्याला आला. पारदर्शी मतदानप्रक्रिया या विषयात त्याने प्रात्यक्षिकासह हे वोटिंग सिस्टम मॉडेल तयार केलं. अगदी पीएमओ कार्यालयापर्यंत याबाबत पत्रव्यवहार केला. सुरूवातीला सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या पीएमओ कार्यालयाने नंतर मात्र हे प्रात्यक्षिक बघण्यास नकार देऊन अशा संशोधनाच्या भागनगडीत पडूच नको, असा संदेश अप्रत्यक्षपणे दिला, अशी खंत अजिंक्यने व्यक्त केली.
2013 मध्ये, अजिंक्यने तयार केलेलं वाहनाची कार्यक्षमता वाढविणारं इंजिन, हे त्याचं पहिले संशोधन. या पेटंटची नोंदणी झाल्यानंतर गेल्या पाच वर्षात भारतातील सर्वाधिक पेटंट दाखल करणारा तरूण म्हणून अजिंक्यची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. त्यानंतर त्याने पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या मल्टिफ्युअल वाहनाचं - केवळ एक स्वीच बदलून वाहन पेट्रोल किंवा डिझेलवर चालू शकेल- असं संशोधन केलं. सध्या एक नामांकित मोटरकंपनी अजिंक्यला घेऊन या संशोधनावर काम करत आहे. अपघाताची सूचना देणारी दुचाकी, ॲनिमल रिप्लाइंट, मुलांसाठी गेमिंग झोन असलेला दरवाजा, पोर्टेबल एअर मोबाईल चार्जर, आरओ वॉटर बॉटल अशा अनेक संशोधनांची पेटंट्स त्याने मिळवली आहेत. अत्यंत दूषित पाणी एका बॉटलमध्ये टाकल्यानंतर केवळ चार वेळा हलवून ते आरओ पाण्याप्रमाणे शुद्ध होईल, अशी बॉटल त्याने तयार केली आहे. ही बॉटल अत्यंत कमी पैशात सर्वसामान्यांना विकत घेता यावी, यासाठी भविष्यात स्वत:चं प्रॉडक्ट तयार करण्याची त्याची तयारी सुरू आहे. नामांकित कंपन्यांकडून त्याला उच्चपदाच्या नोकरीच्या संधी येत आहे. मात्र आपल्याला लोकांसाठी काम करायचं आहे. या संशोधनाचा उपयोग सर्वसामान्य जनता, शेतकऱ्यांना व्हावा यासाठी माझे प्रयत्न आहेत, असे अजिंक्य अभिमानाने सांगतो.

-नितीन पखाले.

शालूपाशी प्रचंड ऊर्जा आहे. आणि तिची ऊर्जा संसर्गजन्य आहे.

 २००४ सालची ही गोष्ट. शालू तिच्या कामाचा भाग आणि विभाग म्हणून तिकडे गेली आणि चक्क नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडली. तिने परोपरीने विनवण्या केल्या. सत्य सांगितलं. तरीही उपयोग झाला नाही. शालूला पूर्ण दिवसभर दोरखंडांनी बांधून ठेवलं गेलं. तिच्या सर्व साहित्याची तपासणी केली गेली. ज्यांच्या तावडीत ती सापडली, त्यांनी, शालूने सांगितलेल्या सर्व तपशिलांची तिच्या कारंजा या गावी जाऊन खातरजमा केली, माहिती घेतली. ती पोलिसांची खबरी नाही, याबाबत पक्की खात्री पटली, तेव्हाच आणि पुन्हा त्या वस्तीत फिरकणार नाही, अशी तिच्याकडून कबुली घेऊनच तिची सुटका केली. शालू साखरे नुकतीच माविममध्ये सहयोगिनी म्हणून काम करू लागली होती आणि हा भयंकर अनुभव तिने घेतला. या अनुभवानंतर, तिने घाबरून काम नको, म्हटलं असतं, कामाचा विभाग बदलून मागितला असता किंवा काम सोडलंच असतं, तरी ते समजण्यासारखं होतं. पण यातलं तिने काहीएक केलं नाही. शालू या प्रसंगानेदेखील डगमगली नाही. तिने हाती घेतलेलं काम थांबवलं नाही.
                                                                  गोंदिया जिल्ह्याच्या ज्या भागात शालू काम करते, तिथे जंगल आहे. रस्ते नाहीत. अन्य सुविधाही नाहीत. लोकांची बोलीभाषा प्रत्येक वस्तीत वेगवेगळी. कमी आणि अर्धवट शिक्षण, रूढी परंपरांमुळे अनेक चुकीच्या समजुती घट्ट बनून लोकांच्या मनांत रुतून बसलेल्या. नक्षलवादी किंवा प्रशासकीय अधिकारी यांचा आपल्या जगण्यात, दिनक्रमात, गावात आणि घरातही, कधीही हस्तक्षेप होईल, असं वातावरण. अशा ठिकाणी, तिथल्या आदिवासी महिलांपर्यंत आणि अन्य महिलांपर्यंतही पोचणं शालूसाठी फार जिकिरीचं होतं. पण या सर्व प्रतिकूलतेवर मात करत शालूने, आज तिथल्या हजारो महिलांशी संपर्क साधून त्यांना लघुव्यावसायिक होण्याइतपत प्रशिक्षित केलंय.
आता, शेळीपालन, मत्स्यपालन यासारख्या योजनांत तिथल्या महिलांचा सहभाग वाढला आहे, सर्व बाबतीत मागास असणाऱ्या या आदिवासींना, गोंदिया जिल्ह्यातल्या महिलांना मुख्य प्रवाहाशी जोडताना शालूने काय केलं नाही? तिने त्यांची गोंडी भाषा शिकून घेतली. मध्यप्रदेशाच्या सीमेलगतच्या या भागात काही लोक छत्तीसगढी भाषाही वापरतात. हे लक्षात आलं आणि तीही भाषा तिनं आत्मसात केली. शिवाय लोधी, गुजराती, मराठी, हिंदी, इंग्रजी मिळून एकूण सात भाषा शालूला लिहायला, बोलायला आणि वाचायला येतात.
महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी माविमच्या अनेक योजना आहेत. या सर्वच उपक्रमांत शालू विविध पातळीवरचं सर्व प्रकारचं काम करत गेली. स्वतःला झोकून देत काम करण्याचा तिचा स्वभाव. स्वभावाला अनुसरून ती कामं करत गेली. २०१०साली शालूची पदोन्नती झाली. ती आता सीएमआरसी व्यवस्थापक आहे. तिच्या आणि अर्थात माविमच्या या कामाचा पसारा गोंदिया जिल्ह्यात मुख्यत्वे, ५८गावं आणि २८ग्रामसंस्थांमध्ये पसरलेला आहे. हे काम सहारा लोकसंचालित साधनकेंद्रातर्गत चालतं. शालू आणि तिच्या सहकाऱ्यांचं हे काम सालेकसासह आसपासची अनेक गावं आणि जिल्हे इथेही चालतं.
अगदी कठीण भागात आणि सामान्यातल्या सामान्य शेतकरी महिलांपर्यंत शालूची पोच आहे, त्यामुळे खऱ्या गरजू व्यक्तींना माविमच्या या प्रशिक्षणाचा, सुविधांचा फायदा मिळू शकला आहे. माविमच्या एका योजनेत प्रत्येक गावाला तीन लाख रुपये रक्कम मदतनिधी किंवा कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे महिलांना शेळीपालन, इतर घरगुती व्यवसाय आणि तशाच प्रकारच्या व्यवसायउभारणीसाठी भांडवल मिळतं. भांडवलाची सोय झाली की पुढच्या कामाला बळ मिळतं. वेळोवेळी विविध गटांना ही मदत मिळावी, म्हणून शालू सतत धडपडत असते.
शालूच्या कार्यक्षेत्रातली ही घटना बोलकी आहे. अर्चना कुटे या महिलेने आंतरजातीय लग्न केलेलं. लग्नानंतर तिला दोन मुली झाल्या आणि काही काळातच तिच्या पतीचं अकाली निधन झालं. दोन्ही घरच्यांच्या विरोधात हे लग्न झाल्यामुळे संकटग्रस्त अर्चनाला तिच्या नातेवाईकांपैकी कुणाचाच आधार नव्हता. मात्र, आमगावच्या ‘साही महिला बचत गटा’चा आणि सहारा लोकसंचालित साधन केंद्र, सालेकसाचा तिला खूप आधार मिळाला. त्यामुळे तिला व्यवसायासाठी माविमकडून चांगलं अडीच लाख रकमेचं कर्ज मिळू शकलं. त्यातून तिने कपड्याचं दुकान टाकलं. आज तिने स्वतःचं घर बांधलं आहे. ती मुलींसह नीट राहते आहे. मुलींना चांगले शिक्षण देऊ शकते आहे. “महिलांना असे मजबूत उभं करताना, त्यांच्या स्थिर होतानाच्या या प्रवासात खूप शक्ती मिळते. त्यामुळे कितीही काम केलं, तरी मी थकत नाही", शालू म्हणते. असं समाधानाचं काम करण्याची संधी दिल्याबद्दल माविमविषयी खूप कृतज्ञता वाटत असल्याचं सांगते.
शालू तिच्या पाच बहिणींमध्ये दुसरी. तिची एक बहीण पोलीस तर एक माविम सहयोगिनीच आहे. भाऊ खाजगी नोकरीत आहे. शालूचे आईवडील मोलमजुरी करणारे. मग शालूनेच घराची जबाबदारी घेऊन सर्वांना शिकायला मदत केली. आधीचं राहतं घर मातीचं होतं. तिने तेही चांगलं पक्कं बांधून घेतलं. गायन, नृत्य, कवितांची शालूला आवड आहे. या एवढ्या व्यापातही शालूने राज्यशास्त्र विषय घेऊन एमए पूर्ण केलं. या सगळ्यात तिचं लग्न जरी मागे पडलं असलं, तरी तिचा संसार मात्र खूप मोठा आहे. शालूपाशी प्रचंड ऊर्जा आहे. आणि तिची ऊर्जा संसर्गजन्य आहे.
- गीतांजली रणशूर

Tuesday, 6 March 2018

जिद्द आणि फक्त जिद्दच


भंडाऱ्यातल्या किटाडी या खेड्यात राहणारा, खेळांची आवड असणारा, योगेश्वर रवींद्र घाटबांधे. पोलिओमुळे अपंगत्व आलं. मात्र, त्याने खेळण्याची जिद्द सोडली नाही. गेल्या महिन्यात अपंगाच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धा पुण्यात झाल्या. त्यात योगेश्वरने एफ-56 गटात भालाफेक, थाळीफेक आणि गोळाफेक स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं ते केवळ जिद्दीच्या बळावर. ही काही त्यांची पहिलीच पदकं नाहीत. राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत एकूण ४५ पदकं त्यांनी आतापर्यंत मिळवली आहेत. यात १७ सुवर्ण, १५ रौप्य आणि १३ कांस्य पदकं आहेत. नागपूरच्या विरजा अपंग प्रशिक्षण संस्थेच्या, स्वतःही अपंग असलेल्या अध्यक्षा रेणुका बीडकर यांच्याकडून प्रेरणा आणि पहिली संधी मिळाली. योगेश्वर ४ आंतरराष्ट्रीय, ५ राष्ट्रीय, १५ राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाला. २००७-०८ मध्ये चेन्नई इथं झालेल्या आठ देशांच्या स्पर्धेपासून योगेेश्ववरच्या क्रीडा कारकिर्दीला खरा आकार मिळाला. नागपूर इथं झालेल्या अपंगांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या तसंच बंगळुरू, चंदिगढ, गाझियाबाद, जयपूर इथं भरलेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्येही तो सहभागी झाला. २०१५ मध्ये गाझियाबाद इथं झालेल्या पॅराअॅथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचं कर्णधारपद त्याने भूषवलं. या स्पर्धांमध्ये भालाफेक, थाळीफेक प्रकारात कांस्यपदक मिळवून आपली योग्यता योगेश्वरने सिद्ध करून दाखवली. 






खेळाप्रमाणे शिक्षणावरही योगेश्वरने पकड ठेवली आहे. त्याने एमए, बीएडपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे . पाच वर्ष किटाडीमधेच कनिष्ठ महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून त्याने काम केलं. सध्या गावीच पाणलोट समिती सचिव म्हणून योगेश्वर काम करत आहेत. त्याच्या या कामाची दखल घेत त्याची किटाडीचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. ऑलम्पिक स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करून देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याची त्याची इच्छा आहे. त्यासाठी शासनानं मदत करावी अशी योगेश्वरची अपेक्षा आहे. स्वत:ला दुबळं समजू नका. मनात जिद्द असेल, तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही, असं योगेश्वरचं देशातल्या युवा अपंगाना सांगणं आहे. 
-हर्षा रोटकर.

विज्ञानप्रसाराचा वसा घेतलेलं वसुंधरा विज्ञान केंद्र



सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वसुंधरा विज्ञान केंद्र. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला तर अनेक समस्यांवर मात करता येऊ शकते, या विचारातूनच सी. बी. नाईक यांनी हे केंद्र सुरू केलं. नाईक यांना बाबा आमटे यांचा 25 वर्ष सहवास लाभला. भारत जोडो आंदोलनातही नाईक सहभागी झाले होते. बाबांपासून प्रेरणा घेऊन त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दुर्गम भागात विज्ञानप्रसाराचा वसा घेतला. बँक ऑफ इंडियातून स्वेच्छानिवृत्ती घेऊन 1995 मध्ये नाईक यांनी हे केंद्र सुरू केलं. सुरुवातीला निवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेतूनच कुडाळ तालुक्यातल्या नेरूरपार इथं आपल्या घरात त्यांनी केंद्र सुरू केलं. त्यानंतरची दहा वर्षे बिबवणे इथं भाड्याच्या खोलीत संस्थेचं कार्य चालू ठेवले. आता नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायतीने दिलेल्या साडेचार एकर जागेत संस्थेचे कार्य सुरू आहे .
युरेका हॉल ,गुणवत्ता विकास कार्यक्रम,आकाशदर्शन,फिरतं वाचनालय ,संगणक प्रशिक्षण, रविवारची विज्ञान शाळा, होमी भाभा सायन्स पार्क असे भरगच्च उपक्रम इथे चालतात. फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचे स्वयंसेवक जिल्ह्यातल्या शंभरहून अधिक गावांतल्या दीडशे शाळांमध्ये जाऊन अभ्यासक्रमावर आधारित प्रयोग करून दाखवतात आणि विद्यार्थ्यांकडून करून घेतात. आतापर्यंत या सर्व उपक्रमांचा लाभ चार लाखांहून अधिक विद्यार्थी- शिक्षकांना झाला आहे. युरेका हॉलमध्ये विज्ञानातले प्रयोग मुलांना स्वतः करून बघता येतात.
१९९७ पासून राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेसाठी संस्था मार्गदर्शन करते. या मार्गदर्शन उपक्रमांतर्गत आतापर्यंत ५४ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आहे . राज्यस्तरीय 'डॉ . होमी भाभा बालवैज्ञानिक' स्पर्धेमध्ये तीन सुवर्ण आणि अठरा रौप्यपदकं मिळाली आहेत . संस्थेच्या विविध शिबिरात भाग घेणारी कुडाळमधली प्राजक्ता प्रभाकर ठाकूर आज नागपूरमध्ये आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहे. .
शालेय मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी. त्यातून बालवैज्ञानिक घडावेत हा ध्यास घेऊन काम करणाऱ्या या संस्थेला देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी भेट दिली होती. अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. प्रकाश आमटे यांनीही इथे भेट दिली आहे. अशी ही मोलाचं काम करणारी विज्ञानसंस्था. 

-विजय पालकर.

विज्ञानाला रंजक बनविताना







गेली 13 वर्षे अध्यापन करीत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे शाळांमध्ये असणारी विज्ञान प्रयोगशाळांची वानवा. खरंतर विज्ञान निसर्गातल्या अनेक चमत्कारांमागची कारणमीमांसा सांगणारा रंजक विषय आहे. डोक्याला चालना देणारा, नव्याने विचार करायला शिकविणारा विषय आहे. पण बहुतेक शाळांमधे हा विषय केवळ कथन पद्धतीने शिकविला जातो. केवळ पाठ्यपुस्तक वाचून दाखवून हा विषय मुलांमधे रुची निर्माण करू शकत नाही. विज्ञान हा अनुभवण्याचा विषय आहे. विज्ञानातील संकल्पना प्रत्यक्ष कृती आणि प्रयोगातून सिद्ध करायला मिळाल्या, तर ते ज्ञान मुलांच्या मनावर कायमस्वरुपी बिंबविले जाईल असं मला सारखं वाटायचं.
नंतर मला सप्टेंबर 2014 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा नं.5 शाळेत विज्ञान अध्यापनाची संधी मिळाली. आता नेमकं काय करायचं हे माझ्या डोक्यात पक्कं झालं होतं. माझ्याकडे सहावी- सातवीच्या वर्गाच्या अध्यापनाची जबाबदारी होती. सुरुवातीला मी या वर्गांच्या पाठ्यपुस्तकातील प्रयोगांची यादी केली. मुलांना पाठ नीट समजावा म्हणून कोणकोणते प्रयोग करणे आवश्यक आहे, त्याची नोंद केली. आमच्या शाळेत प्रयोगशाळा नाही, पण शाळेत सुविधा नाही म्हणून विद्यार्थी या प्रयोगांपासून वंचित राहावेत, हे मला पटत नव्हतं. मी स्वखर्चाने प्रयोगांसाठीचं आवश्यक साहित्य म्हणजे चंचुपात्रे, बर्नर, वेगवेगळी आम्ले, लिटमस पेपर, नवसागर, मोरचूद असे सुमारे आठ हजार रुपयांचं साहित्य खरेदी केलं.
            आत्तापर्यंत फक्त पुस्तकात पाहिलेलं साहित्य आपल्या वर्गात आलेलं पाहून विद्यार्थी खुश झाले. आवश्यक ती काळजी घेऊन माझ्या मार्गदर्शनाखाली मुलांना प्रत्यक्ष प्रयोग करता येणार होते. विद्यार्थी आता अतिशय उत्सुकतेने विज्ञानाच्या तासिकेची वाट पाहू लागले. या आधी केवळ पुस्तकातच पाहिलेली उपकरणे त्यांना प्रत्यक्ष हाताळायला मिळू लागली. प्रयोगातून विज्ञान शिक्षण सुरु झाल्याने विज्ञानातील तत्वे, नियम त्यांना कृतीद्वारे पडताळून पाहता येऊ लागले.
उदा. संप्लवनासारखी विज्ञानाची संकल्पना मुलांनी स्वत: प्रयोगाद्वारे पडताळून पाहिली. खरेतर स्थायूंना उष्णता दिली की त्यांचे रूपांतर द्रवात होते आणि द्रवाला उष्णता दिली की त्याचे रुपांतर वायूत होते. बहुतांश पदार्थांना उष्णता दिल्यास आपल्याला हे अवस्थांतर पाहता येते. मात्र काही पदार्थांना उष्णता दिल्यास त्यांचे द्रवात रूपांतर न होता, थेट वायूतच रूपांतर होते, त्यालाच ‘संप्लवन’ असं म्हणतात, हे आमच्या विद्यार्थ्यांनी सप्रयोग सिद्ध केलं. नवसागराला उष्णता दिली आणि त्यावर बाष्पमोजणी पात्र धरलं, थोड्याच वेळात तिथं नवसागराची वाफ जमा झालेली दिसली. संप्लवनाचा नियम लागू होणारे इतर पदार्थ विद्यार्थ्यांना शोधायला सांगितले, तर कापूर आणि डांबराच्या गोळ्या अशी योग्य उत्तरे विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक दिली.
असेच अनेक प्रयोग मुलं करून पाहतात. त्यातून चुंबकाचे गुणधर्म, आम्ल- आम्लारी पदार्थात रंग बदलणारा लिटमस पेपर पाहताना मुलांना मजा येते. आम्ल- आम्लारीचे गुणधर्म शिकविताना त्या प्रयोगांसाठी रासानिक आम्लांसोबत मी दही, लिंबाचा रस, चिंचेचा रस असे नैसर्गिक पदार्थ वापरण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त केलं. त्यामुळे फक्त पाठ्यपुस्तकात लिहिलं आहे, तेवढंच न वाचता त्यापलीकडे जात आपण स्वत: अनेक नवे प्रयोग करू शकतो यावर विद्यार्थ्यांचा विश्वास बसला आणि प्रत्यक्ष अनुभवांमुळे पाठांतराची गरजच भासेना.याखेरीज कदम मॅडम यांनी विज्ञानाची रांगोळी आणि भित्तीपत्रकाचाही उपक्रम घेतलेला आहे.
- वैशाली कदम.