Tuesday 12 February 2019

लेकींच्या कल्याणा शिवणकामाची शिकवणी

"लेक वाचवा, लेक वाचवा असं नुसतं म्हणून काय फायदा ? लेकीच्या कल्याणासाठी काही तरी उपक्रम राबवला, तरच खरं लेक वाचवा अभियान यशस्वी होईल.'' बबन साबळे सांगत होते. यांचं गाव धानोरा. तालुका आष्टी. जिल्हा बीड.
मुलीच्या शिक्षणाच्या निमित्ताने बबन साबळे यांचा नगरच्या स्नेहालय संस्थेशी संपर्क आला. स्नेहालयच्या संगतीचा परिणाम असा की, समाजासाठी काही तरी केले पाहिजे असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. त्यांनी मुली- महिलांना शिलाईकामाचे प्रशिक्षण मोफत द्यायचे ठरवले. सुरुवातीला धानोरा आणि नंतर हळूहळू आसपासच्या गावातून मुली, महिला शिकण्यासाठी येऊ लागल्या. साबळे यांचे खास कौतुक म्हणजे, एखाद्या गावातून महिला, मुली जास्त संख्येने शिकण्यासाठी इच्छुक असतील तर ते स्वतः त्या गावात जाऊन त्यांना शिकवतात. बबन आणि त्यांच्या पत्नी संगीता यांनी गेल्या दोन वर्षात १०० ते १२५ मुलींना शिवणकामाचे मोफत प्रशिक्षण दिले आहे.

बबन हे तीस वर्षांपूर्वी ते त्यांच्या मूळ डोंगरगण गावाहून धानोऱ्यात आले. स्थायिक झाले. रेडिओ, टीव्ही दुरुस्तीचा व्यवसाय त्यांनी काही काळ केला. संगीताताई घरकामासोबत ब्लाऊज शिवण्याचे काम करून संसाराला हातभार लावत होत्या. कालांतराने तेही शिवणकामाच्या व्यवसायाकडे वळले. दोघांनी मिळून चांगली प्रगती केली.  याच व्यवसायाच्या बळावर साबळे दांपत्याने त्यांच्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले. त्यांची मुलगी एम फार्मसीचे शिक्षण पूर्ण करून आता प्राध्यापक म्हणून नोकरी करत आहे. मुलगा इंजिनिअर होऊन खाजगी कंपनीत नोकरीस आहे. संगीता साबळे सांगतात, ''मर्यादित प्रमाणात रोजगार उपलब्ध असण्याच्या काळात ब्लाऊज , सलवार वगैरे कपडे शिवून देण्याचा व्यवसाय महिलांसाठी एकदम योग्य आहे. घरी बसून काम करता येते आणि संसाराला हातभार लावता येईल अशी अर्थप्राप्ती सुध्दा होते.'' साबळे जोडप्याची कळकळ इतकी की, संधी मिळाली तर दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या शेतकरी किंवा मजूर महिलांनादेखील शिकवण्याची त्यांची तयारी आहे. आणि त्यांचं दातृत्व असं की, मुलाच्या लग्नात त्यांनी बस्त्याच्या खर्चाला फाटा देत अपंग व्यक्तींना नवीन कपडे, गावातील गरीब महिलांना साड्या घेऊन दिल्या होत्या. सामाजिक दातृत्व दाखवायला फक्त धनाची श्रीमंती हवी असं नाही. साबळे दंपतीसारखी मनाची श्रीमंती असायला हवी, नाही का?

-राजेश राऊत,बीड

No comments:

Post a Comment