Tuesday 12 February 2019

मोकाट कुत्र्यांपासून त्यांनी केली नांदेड शहराची सुटका

मोकाट, भटकी कुत्रे ही अनेक गावातील खूप मोठी गंभीर समस्या. दरवर्षी पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्यामुळं, अनेकांना प्राण गमवावे लागतात किंवा रेबिजपासून वाचण्यासाठी अनेक इंजेक्शन टोचून घ्यावे लागतात. नांदेड शहर मात्र या मोकाट कुत्र्याच्या त्रासापासून २०१३ पासून मुक्त झालं आहे. याचं श्रेय जातं, त्यावेळचे नांदेड मनपाचे मानद पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय वसंतराव लाड यांना.
२०१३ पूर्वी नांदेड शहरातील लोक व मनपा मोकाट कुत्र्यांच्या त्रासाने गांजलेलं होतं. रेबिज आजार झाला की कुत्रा पिसाळत असे आणि दिसेल त्या व्यक्तीवर हल्ला करून त्याला चावा घेई. या हल्ल्यात अनेक वेळा लोकांना आपले प्राण गमवावे लागत असतं. हा रेबिज झालेला कुत्रा दुसर्‍या कुत्र्याला चावला की, दुसरे कुत्रे देखील या रोगाने ग्रस्त होत असतं. परिणामी शहरात असं कुत्रं आढळलं की, पूर्वी मनपा अशा कुत्र्यांना विष घालून मारे. त्यावेळी शहरातील रस्त्या रस्त्यावर मेलेल्या कुत्र्यांचे ढीग पडत असतं. तसंच रेबिज झालेल्या कुत्र्‍याबरोबरच निरोगी कुत्री व इतर अनेक प्राणी विषबाधा होऊन मरत असत. हा साराच प्रकार अतिशय क्रूर आणि भयंकर असा होता.
२००२ साली, चेन्नई येथे भारत सरकारच्या जिवजंतू कल्याण बोर्डातर्फे अशिया खंडातील पशू चिकित्सकांची एक परिषद घेण्यात आली होती. त्यात डॉ. लाड सहभागी झाले होते. तेथे बाली या बेटावरील डॉक्टरांचा एक गट आला होता. त्यांनी कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचं ट्रेनिंग दिलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, त्यांचा बाली हा देश संपूर्णपणे रेबिजमुक्त देश आहे. या गोष्टीचं डॉ. विजय लाड खूप कौतुक वाटलं. नांदेड शहरातील मोकाट कुत्रे व रेबिज आजार यावर काही काम करता येईल का? असा विचार करतच ते चेन्नईचं ट्रेनिंग पूर्ण करून परतले. त्यावेळी त्यांचे मित्र डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार उपायुक्त म्हणून नांदेड मनपात कार्यरत होते. डॉ. लाड यांनी शहरातील मोकाट कुत्रे व रेबिज आजार या पासून नांदेडवासियांची मुक्तता करण्यासाठी ‘मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण’ करण्याचा प्रस्ताव त्यांच्या समोर मांडला. पुलकुंडवार हे स्वतः प्राण्यांचे डॉक्टर. त्यांना ही कल्पना आवडली. त्यांनी व डॉ. लाड यांनी याचा रितसर प्रस्ताव तयार करून तो त्यावेळचे नांदेड मनपा आयुक्त किरण कुरूंदकर यांच्या समोर मांडला. त्यांनी तो लगेच मंजूर केला. आणि डॉ. लाड यांची या कार्यासाठी मनपाचे मानद पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक केली. २००२-२००४ या तीन वर्षाच्या कालावधीत केंद्र सरकारच्या पशू वैद्यकीय सेवा संस्थाने देखील ‘मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरण’ योजनेस पाठिंबा देऊन ७५ हजार रूपयांचे अर्थसहाय्य नांदेड मनपा व डॉ. लाड यांना दिलं. या अर्थिक सहाय्याच्या मदतीने डॉ. लाड यांनी कुत्रे पकडण्यासाठी कर्मचारी, तीन चाकी गाडी, पिंजरे, जाळे, स्वतःच्या दवाखान्यात ऑपरेशन रूम तयार केली. डॉ. लाड यांच्या निर्बिजीकरण टिममधील कर्मचारी रोज शहरातील विविध भागात, वस्त्यात जाऊन तेथील मोकाट कुत्रे पकडून आणत असतं. डॉ. लाड त्यांच्यावर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रीया करत असत. नंतर शस्त्रक्रीया झालेल्या त्या श्‍वानास दवाखान्यात ठेवून त्याची सेवासुश्रूषा करून त्यांना परत जेथून आणलं होतं तिथं सोडलं जायचं. याचं कारण सांगाताना, डॉ. लाड सांगतात, की प्रत्येक कुत्र्याचा परिसर ठरलेला असतो. एका कुत्र्याच्या परिसरात दुसर्‍या कुत्र्याला प्रवेश करता येत नाही, अशा वेळी जर एके जागी पकडलेला कुत्रा दुसर्‍या जागी सोडला तर त्याला इतर कुत्रे मारून टाकतात. त्यामुळं निर्बिजीकरण झालेल्या कुत्र्याला परत त्यांच्या एरियात सोडणं भागं होतं. डॉक्टर सांगतात, “कुत्रं परत त्याच्या पूर्वीच्या परिसरात सोडण्यास जात असू तेव्हा आमची खरी परीक्षा असायची. कारण तेथील लोक आम्हाला विरोध करत असत. तुम्ही पुन्हा कुत्रं येथे सोडू नका, म्हणून भांडत असत. मग आम्हाला त्यांना समजाऊन सांगताना नाकी नऊ येई. सुरूवातीच्या काळात आमच्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण कार्यक्रमाला वृत्तपत्रातून खूप विरोध झाला. आमच्यावर टीका झाली. परंतू मी करत असलेल्या कामचे फायदे लक्षात आल्यानंतर लोकांनी विरोध करणं सोडून, आमचं कौतुक करण्यास सुरूवात केली.”
तीन वर्ष केंद्राची मदत आली, नंतर ती बंद झाली. त्यानंतर हा कार्यक्रम कसा चालवायचा? खर्च कसा भागवायचा? हा प्रश्‍न होता. अशावेळी नांदेड मनपा आणि डॉ. लाड यांची ‘सोसायटी फॉर प्रिव्हेंन्शन ऑफ क्रुयालिटी टु अ‍ॅनिमल्स’ यांनी पुढाकार घेतला. आणि २००२ पासून सुरू झालेला हा कार्यक्रम २०१३ पर्यंत न थकता चालू राहिला. या कालावधीत त्यांनी शहरातील १०, ००० पेक्षा अधिक कुत्र्यांचे निर्बिजीकरण केलं.
या निर्बिजीकरण कार्यक्रमाचा फायदा आजतागायत नांदेडवासियांना मिळतो आहे. याचा परिणाम म्हणून शहरातील मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आलं. कुत्रे माजावर आल्यानंतर त्यांची आपसात होणारी भांडणं थांबली. परिणामी त्यांना होणार्‍या जखमा, त्यातून रेबिजसारखे आजार फैलावणं देखील थांबलं. आज नांदेड शहरात मोकाट कुत्री आहेत. पण त्यांची संख्या नियंत्रित आहे. या सगळ्याची सुरूवात झाली ती डॉ. विजय लाड यांच्या प्रयत्नातून.

एक चांगला पशूचिकित्सक डॉक्टर मनात आणल्यावर किती मोठं काम करू शकतो याचं हे आदर्श उदाहरण ठरावं. १९८६ साली परभणी येथील कृषी विद्यापीठातून पशूवैद्यकीची पद्वी त्यांनी घेतली आहे. डॉन्की सेंचुरी, ब्रिटन यांनी आयोजित केलेलं गांढवांच्या आरोग्यासाठीचं १५ दिवसाचं विशेष ट्रेनिंग त्यांनी २००२ साली घेतलं. ब्रिटनमधील त्या डॉक्टरांचं गाढवांविषयीचं प्रेम, त्याची काळजी घेण्याची पद्धत, या सर्वांचा डॉ. लाड यांच्यावर सखोल परिणाम झाला. हे लोक स्वतःचा देश सोडून इतक्या लांब येऊन गाढव प्राण्याच्या आरोग्यासाठी एवढे प्रयत्न करतात, हे पाहून त्यांनी पुढील आयुष्यात गाढव असो किंवा इतर कोणताही प्राणी त्याची सेवा करण्यास नेहमी तत्पर राहण्याचं व्रत घेतलं आणि ते कसोशीने पाळत आहेत. पाळीव प्राण्यांपासून, साप, विविध पक्षी, बिबटे यांच्यावर उपचार करण्यात, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. विजय लाड नेहमीचं तत्पर असतात. त्यामुळे शहरातील सर्व प्राणी मित्रांच्या मनात डॉक्टरांविषयी विशेष आदर व प्रेम आहे.
२०१७-२०१८  मध्ये जम्मु-काश्मीरमध्ये भारतातील इतर डॉक्टरांबरोबर त्यांनी ४५ हजार कुत्र्यांच्या निर्बिजिकरणाच्या शस्त्रक्रियेत सहभाग घेतला. डॉग हॉस्टेलचा उपक्रमही अनेक वर्षापासून ते व त्यांचे बंधू चालवतात. पशुचिकित्सेचं कार्य समर्थपणे सांभाळतचं, ते ग्राहक पंचायत, महाराष्ट्रचे सचिव म्हणून कार्य करतात. डॉ. विजय लाड यांच्या कार्याची नोंद घेऊन नांदेडच्या प्राणी क्लेश निवारण समितीवर शासनाने नोव्हेंबर २०१८  साली त्यांची नेमणूक केली आहे.
विजय लाड यांचा संपर्क क्र. - ९४२२१७०५८२

- उन्मेष गौरकर, नांदेड

No comments:

Post a Comment