Tuesday 12 February 2019

रेषेवरचं आयुष्य


मला माझ्या भावंडांना चांगलं शिक्षण द्यायचं यासाठी मी वाट्टेल तेवढे कष्ट घेण्यास तयार आहे, असं म्हणणार्‍या रुख्मिणीनं आपलं ध्येय खरंच पूर्ण करुन दाखवलं आहे. घरी केवळ दोन एकर पडीक शेती. त्यात बुलडाणा जिल्ह्यातला पाऊस बेभरवशाचा, घरात तीन बहिणी, एक भाऊ. आई-वडील दुसर्‍याच्या शेतात राबून पोटाची खळगी भरत. या परिस्थितीत आपलं शिक्षण कसं पूर्ण होणार या विवंचनेत असलेली रुख्मिणी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आली. पाठीवरच्या बहीण, भावाला योग्य शिक्षण मिळावं, परिवाराला चांगलं खायला -प्यायला मिळावं या जिद्दीतून तिने मार्ग निवडला तो सैन्यात भरती होण्याचा. फिनिश लाईनच्या पलीकडे दिसणार्‍या स्वप्नाला गाठण्यासाठी तिने जीव कंठाशी येईल एवढ्या वेगात धावत रेषा पार केली. आज तिचं आयुष्य खरंच रेषेवरचं आयुष्य झालंय. आता तिच्या कर्तृत्वाची साक्ष दिल्लीतील लाल किल्लादेखील देणार आहे, लेकीच्या या कर्तृत्वाचा अख्ख्या गावाला अभिमान वाटत आहे. ही कथा आहे, रुख्मिणी राठोडची.
      बुलडाणा जिल्हयातील छोटसं चायगाव. वडील परमेश्वर राठोड, आई कस्तुरा राठोड. या परिवाराचं जगणं मोलमजूरीचं. घरात पुजा, वर्षा व लहानगा रोशन. परिस्थितीवर मात करीत तिने १२ वीपर्यंत शिक्षणात मजल मारली अन् नागपूरमध्ये सैनिक भरतीत यशस्वी प्रवेश केला. ३१ मार्च २०१५ ला तिची आसाम रायफल्सच्या महिला कमांडंट तुकडीमध्ये निवड झाली. आसाम रायफल्सच्या शुकोवी येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये तिचं प्रशिक्षण पूर्ण झालं. नागालॅन्डमध्येही तिने प्रशिक्षण घेतलं आहे. आसाम रायफलच्या १८४ वर्षाच्या इतिहासात अवघ्या चार वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या महिला कमांडंट तुकडीला ७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील परेडमध्ये राष्ट्रपतींना सलामी देण्याचा बहुमान मिळाला आहे. या ऐतिहासिक १४७ महिलांच्या तुकडीमध्ये रुख्मिणी राठोडची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल ती म्हणते की, “खरोखर मला याचा मनस्वी आनंद होत असून अभिमानही वाटतो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मेहकर येथील पोलिस ठाण्यात गेले होते, त्यावेळी बुलडाणा जिल्ह्यातून मी एकटीच महिलांच्या या रेजीमेंटमध्ये निवड गेल्याचं समजलं होतं. कुटुंबाकडून मिळालेल्या सहकार्यामुळेच मी इथवर पोहोचू शकले.”
आसाम रायफलच्या इतिहासातील ही ऐतिहासिक परेड ठरणार असून त्यासाठी आसाम रायफल्सच्या महिला रेजिमेंटच्या मेजर खुशबू आणि कॅप्टन रुची यांच्या नेतृत्त्वात पाच महिन्यांपासून रुख्मिणी ही दिल्ली येथे सहकार्‍यांसोबत कसून सराव करतेय. एका अल्पभूधारक शेतकर्‍याची मुलगी राजपथावर आता थेट राष्ट्रपतींना सलामी देणार असल्याने गावकर्‍यांना अभिमान वाटतो आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील परेडमध्ये राष्ट्रपतींना सलामी देणारी आसाम रायफल्सच्या महिलांची ही पहिलीच तुकडी आहे. राजपथावर प्रामुख्याने राष्ट्रपतींना सलामी (सॅल्युटींग डेस्क) देताना सुमारे ५०० मीटरचे अंतर या तुकडीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सॅल्युटींग डेस्कदरम्यान ‘दाहिने देख’ करीत या महिला तुकडीला मार्च करावा लागणार आहे. त्यादृष्टीने साडेतीन किलोची रायफल घेऊन हा सॅल्युटींग डेस्क लिलया सांभाळण्याचे कसब अंगीकृत करण्यासाठी सध्या ही तुकडी सराव करत आहे. दररोज पहाटे चार वाजल्यापासूनच त्यांचा दिवस सुरू होत असून १५ ते १८ किलोमीटर अंतर त्यांना शस्त्रासह पार करावं लागतं. दररोज सहा ते आठ तास त्यांचा कसून सराव सुरू आहे. शारिरिक तंदुरुस्तीसोबतच शस्त्र हाताळण्याचे कठीण ट्रेनिंग त्यांना मिळालेले असून पूर्वोत्तर भागात घडणार्‍या एनकाऊंटरसह कठीण परिस्थिती कशी हाताळायची? याचे प्रशिक्षण या तुकडीला देण्यात आले आहे. रुख्मिणीच्या या कर्तृत्वाची साक्ष २६ जानेवारी रोजी लालकिल्ला देखील देणार असल्यानी तिच्या आई-वडिलांसह गावकर्‍यांनाही आनंद झाला आहे.
- दिनेश मुडे, बुलडाणा

No comments:

Post a Comment