Friday 22 February 2019

शिक्षणसंस्कृतीचे सहृदय ‘वाहक’


विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बरेच अडथळे असतात. बऱ्याच जणांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असल्याने त्यांची आवश्यक शैक्षणिक साहित्य विकत घेण्याचीही ऐपत नसते. अशावेळी शाळेतले शिक्षक किंवा गावातील सधन व्यक्ती माणुसकीच्या भावनेतून त्या विद्यार्थ्यांना मदत करतात, हे आपण ऐकले असेल. पण तुम्हांला जर सांगितले की एसटी बसचे वाहक (कंडक्टर) म्हणून नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीने सुमारे ५२ मुलांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेतलेले आहे, तर यावर तुमचा विश्वास बसेल का? होय, हे खरे आहे आणि या व्यक्तीचे नाव आहे- राहुल आंधळे. 
  मूळचे बीडमधील गेवराईचे असलेले राहुल आंधळे सध्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनच्या आगारात वाहक म्हणून काम करत आहेत. शिक्षणक्षेत्रात नसलेला एक माणूस, स्वत:ची एस टी महामंडळातील दगदगीची नोकरी सांभाळून इतक्या मुलांना शैक्षणिक मदत करतो याचे मला आश्चर्यही वाटले आणि खूप आनंदही झाला. त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे आभार मानण्यासाठी मी त्यांचे मूळ गाव असलेल्या गेवराई तालुक्यातील रामनगरला पोहोचलो, तिथल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका शीतल नाईकवाडे यांनीही आंधळे यांच्याकडून वेळोवेळी होत असणाऱ्या मदतीबद्दल भरभरून सांगितलं. एवढंच नाही तर गावातील एखाद्या बालकाची शाळा घरच्या जबाबदाऱ्यांमुळे अथवा गरिबीमुळे मध्येच थांबणार असेल तर आंधळे त्या बालकाचा शैक्षणिक खर्च तर उचलतातच पण त्याच्या पालकांना भेटून शिक्षणाचं महत्त्वही समजावून देतात हे आवर्जून सांगितलं. आंधळे यांचे आई, वडील, पत्नी शेतात राबणारी साधी श्रमजीवी माणसं होती.
दुसऱ्या दिवशी मी राहुल आंधळे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. एका विस्ताराधिकाऱ्याचा आपल्याला आवर्जून फोन आला आहे, हे पाहून आंधळे भारावून गेले. “काळम- पाटील सर तुम्ही माझ्या घरी गेलात, कुटुंबियांशी संवाद साधून आभारही मानले, फार बरं वाटले. पण मी जे काम करतोय ते तुमच्यासारख्या नि:स्वार्थ शिक्षकांच्या प्रेरणेतूनच करतोय”, आंधळे माझ्याशी खूप नम्रपणे बोलत होते. “सर, एसटी महामंडळात वाहक म्हणून कर्तव्य बजावताना आम्हांला अनेकांशी संवाद साधण्याची संधी मिळते. त्यात माझा स्वभाव बोलका आहे आणि मला शिक्षणाविषयी आस्था आहे, त्यामुळे बसमध्ये बसलेल्या विद्यार्थी आणि पालकांशी मी आवर्जून संवाद साधत असतो.”
आंधळेंनी पुढे सांगितलं की, “कितीतरी मुलांकडे बसचं तिकीट काढायला पैसे नसतात, पास संपलेला असतो, तेव्हा त्यांचे पैसे मी भरतो. काही मुलांची आर्थिक परिस्थिती खूपच खालावलेली असते, कधी एखाद्या मुलाचे पालक दगावलेले असतात. अशा मुलांचा शैक्षणिक खर्च मी उचलतो. त्यांना वह्या- पुस्तके, गणवेष, चपला- बूट अथवा इतर गरजेच्या शैक्षणिक साहित्याची मला होईल तेवढी मदत मी पुरवितो. माझ्या शिक्षकांनी माझ्या लहानपणी मला शिक्षणासाठी मदत केलेली आहे, त्यामुळेच कृतज्ञतेची भावना मनात ठेवून मी गरजू मुलांना मदत करतो.” राहुल आंधळे यांनी आत्तापर्यंत रायगड, नाशिक, जालना, अहमदनगर, बीड अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांतील सुमारे 52 गरजू विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे, हे ऐकून मी थक्क झालो आणि त्यांच्या कायम संपर्कात राहायचे ठरविले. 

 - प्रवीण काळम- पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी, पंचायत समिती गेवराई, जिल्हा बीड.

No comments:

Post a Comment