‘'आष्टीच्या कन्याशाळेत नववीत पहिल्यांदा शड्डू ठोकून उभी राहिले. पुढे जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत गेले. प्रत्येक वेळी मी ठोकलेला शड्डू हा प्रतिस्पर्ध्यांपेक्षा, परिस्थितीच्या विरोधात जास्त जोरात होता!" सिंगापूरमध्ये २०१६ साली झालेल्या स्पर्धेची रौप्यपदक विजेती सोनाली तोडकर सांगत होती.सोनाली, बीड जिल्ह्यातल्या कायम दुष्काळी असलेल्या आष्टी तालुक्यातल्या बाराशे लोकवस्तीच्या मंगरुळ गावची. घरची अवघी दोन एकर शेती, वडील महादेव आणि आई कुसूम इतरांच्या शेतात मजूरी करणारे. मोठी बहीण राणी हिच्या लग्नाचं कर्ज अात्ता कुठे फिटलं आहे, मोठा भाऊ सचिन पदव्युुत्तर शिक्षण घेतोय. घरात कुस्तीचा कोणताही वारसा नाही. सोनालीला पोहण्याची खूप आवड. पण मुलींनी काय पोहायचं, म्हणून घरातून विरोध झालेला. कुस्तीबाबत मात्र शेजाऱ्यांनी सोनालीच्या वडिलांचं मन वळवलं. आळंदीच्या दिनेश गुंड यांच्या जोग महाराज महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्रात ती दाखल झाली. त्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धांमधून पदकांची लयलूट सुरूच राहिली. पुण्यातल्या महापौर करंडकानं तिला नाव मिळवून दिलं. राष्ट्रीय स्तरावर पदकांची एकविशी तिने गाठली. हे यश मिळवताना तिला प्रचंड संघर्ष करावा लागला. २०१६ मध्ये राष्ट्रकुलसाठी निवड झाली, तो क्षणही सोनालीसाठी अत्यंत कसोटीचा होता. आतापर्यंतच्या कष्टांचं चीज होण्याची संधी येऊन ठेपली होती. पण सिंगापूरला जाण्यासाठी फेडरेशननं दोन दिवसात दीड लाख रुपये भरायला सांगितलं. सोनालीसमोर प्रश्नांचा डोंगर उभा राहिला. मात्र वडिलांनी धीर दिला, ''तू खेळावर लक्ष दे , पैशांचं मी पाहतो.'' आष्टीकरांनी मदतफेरी काढून रुपया रुपया गोळा केला आणि सोनालीने त्यांचा विश्वास सार्थ ठरवला.

कुस्तीची सुवर्णकन्या होण्यासाठी सोनालीला शुभेच्छा!
- अमोल मुळे.
No comments:
Post a Comment