'एस दुर्गा’ (बहुचर्चित मल्याळी चित्रपट) फेम राजश्री देशपांडे. चंदेरी दुनियेत वावरताना समाजाला आपला उपयोग व्हावा, ही भावना तिच्या मनात रुंजी घालत होती. राजश्री मूळची औरंगाबादची. आसपासच्या परिसरात फिरताना पांढरी गाव आढळलं. गावात 300 कुटुंब, पाण्याचं दुर्भिक्ष्य, पायाभूत सुविधांची वानवा, सार्वजनिक कामांबाबत लोकांची उदासिनता. राजश्री आणि तिच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांतून पांढरीचा गावविकास आराखडा तयार केला, सर्वांना एकत्र आणलं. राजश्रीचे पदरचे दीड लाख आणि मुंबईतल्या काही सहकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या मदतीतून बेमळा नदीच्या पात्राचं खोलीकरण, रुंदीकरण केलं. ग्रामस्थ एकत्र आल्याचं पाहून प्रशासनाचीही या कामी साथ मिळाली. तीन वर्षांनंतर, आज या नदीपात्रात जलसाठा झाला अाहे. भूजल पातळीही वाढली.गावाच्या पाणंदमुक्तीबाबत जागृती करत राजश्रीनं जवळपास दोनशे कुटुंबांना स्वच्छतागृह उभारण्यास आणि ती वापरण्यासाठी उद्युक्त केलं. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, तहसीलदार सतीश सोनी, बीडीओ एस.सी.राठोड यांनीही काही दिवसांपूूर्वी राजश्री आणि तिच्या टीमचं अभिनंदन केलं.
आपण त्या गावात असू - नसू, एकदा सुरू केलेलं काम स्थानिक नेतृत्वानं, लोकांनी सुरू ठेवलं पाहिजे, याची विशेष काळजी राजश्री घेते. अर्थात तिच्यासाठी हे सगळं सोपं नव्हतं. ग्रामस्थांच्या भेटीसाठी ती मुंबईहून पहिल्यांदा आली होती तेव्हा ती आपल्या गावासाठी काम करेल, याबाबत त्यांना विश्वास वाटला नव्हता. मात्र गावकऱ्यांचं शंकानिरसन करत, आपला उद्देश केवळ ग्रामविकासाचाच आहे आणि आपण ठरवलेलं काम पूर्ण करणारच, हा विश्वास राजश्रीनं ग्रामस्थांना दिला.
पांढरीच्या कायापालटानंतर राजश्रीने जालना जिल्ह्यातलं मठजळगाव हे गाव निवडलं आहे. जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्यासोबत गावाला भेट देऊन विकासआराखडा तयार केला आहे. जळगाव जिल्ह्यामधल्या काही गावांतही तिचं काम सुरू आहे.
आपण ज्या भागातून येतो, त्या भागाच्या विकासासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे, अशी राजश्रीची भूमिका प्रशंसनीय तर आहेच. अनुकरणीयसुद्धा आहे.
आपण ज्या भागातून येतो, त्या भागाच्या विकासासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे, अशी राजश्रीची भूमिका प्रशंसनीय तर आहेच. अनुकरणीयसुद्धा आहे.
-अनंत वैद्य.

No comments:
Post a Comment