Monday 23 April 2018

‘अक्कलहशेदोन’ची गंमत

जिल्हा जालना. इथल्या मंठा तालुक्यातील कानफोडीची जिल्हा परिषद शाळा. वर्ग पहिली ते चौथीपर्यंतच. छोटीशीच, दर्शनी कमान, सुंदर बाग, मुलांना आणि झाडांना ऊन लागू नये म्हणून घातलेली ग्रीन नेटची शेड, आणि नीटनेटक्या गणवेषातील विद्यार्थी असं प्रसन्न रूप. शाळेचा भवताल सुंदर बनविण्यासाठी कानफोडीच्या ग्रामस्थांनी आर्थिक, वस्तूरूप मदत आणि वृक्षदान केलेलं आहे, आणि शिक्षकांनी प्रसंगी सिमेंट, विटा वाहून मिस्त्रिकामही केलेलं आहे.
भौतिक रूप सुंदर बनविताना शिक्षकांनी गुणवत्तेकडेही दुर्लक्ष केलं नाही. शाळेची वेळ सकाळी 9.30 – दुपारी 4.30 अशी आहे. पण कानफोडीच्या शाळेत शिक्षक सकाळी 7.30 वाजताच हजर असतात. शाळा भरण्याआधी आणि शाळा सुटल्यानंतरही एखादा तास मुलांचा जादा अभ्यास घेतला जातो. याविषयी मुख्याध्यापक किशन जाधव सांगतात, “आम्ही विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा पाया पक्का करण्याच्या प्रयत्न करतो. त्यामुळे मुळाक्षरे, 1 ते 100 अंक, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रियांचा जास्तीत जास्त सराव करुन घेतला जातो. वाचन, वाक्यविस्तार, गोष्ट तयार करणे असे भाषेशी संबंधित खेळही घेतले जातात. अभ्यासात मागं असणाऱ्या मुलांसाठी आम्ही हे जादा तास घेतो. याचा परिणाम म्हणून आमच्या शाळेतला पहिलीतला विद्यार्थीसुद्धा दीड महिन्यात वाचायला लागतो. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी वजाबाकी आणि भागाकारासारख्या अवघड गणिती क्रियांमध्ये तरबेज आहे. इतकंच नाही, तर कोणताही विद्यार्थी अब्जापर्यतची संख्या लिहून त्याची स्थानिक किंमतही सांगू शकतो.”
आणि खरोखरच पहिली- दुसरीच्या विद्यार्थ्यांनी अब्जाच्या आपण सांगू त्या संख्या लिहून दाखवल्या, हातच्याची वजाबाकी करुन दाखवली. तीन शब्द दिले असता या शाळेतले विद्यार्थी त्यावरुन गोष्टही तयार केली, तेव्हा जाणवले- ये तो लंबी रेसका घोडा है! अब्जाची संख्या येण्यामागची गंमत जाधव सरांनी सांगितली, “आम्ही मुलांना ‘अक्कलहशेदोन’ हा शब्द लक्षात ठेवायला सांगितला आहे. या शब्दाच्या आद्याक्षरांनुसार मुलं अब्ज, कोटी, हजार, शेकडा, दशक, एकक यांचा क्रम लक्षात ठेवतात आणि त्यावरुन कोणतीही संख्या लिहून दाखवितात. तसेच त्यांची स्थानिक किंमतही सांगू शकतात.”
2016 सालापासून कानफोडीची शाळा एबीएल (Activity Based Learning) शाळा झाली आहे. त्यामुळे इथं कृतियुक्त शिक्षणावर भर दिला जातो. मुलांचा स्तर निवडून त्यांच्या शैक्षणिक स्तरानुसार अभ्यास घेतला जातो. कानफोडी शाळेतले विद्यार्थी आता इतके तयार झालेले आहेत की अगदी पहिलीचा विद्यार्थीसुद्धा तिसरीच्या स्तराचा अभ्यास करुन दाखवतो. याचाच परिणाम म्हणून की काय गावात माध्यमिक शाळेत जाणारे अभ्यासात मागे राहिलेले काही विद्यार्थी सुद्धा कानफोडी शाळेच्या जादा तासांना अभ्यासासाठी येतात. आणि जाधव सर, नेवरे सर ही अधिकची कटकट, असं न म्हणता ज्ञानरचनावादी पद्धतीने त्यांच्याही समस्या सोडवून त्यांना अभ्यासाची गोडी लावत आहेत.

- स्नेहल बनसोडे-शेलुडकर

No comments:

Post a Comment