Monday 23 April 2018

अडचणी सोडवण्यासाठी धाव घेणारे हरीभाऊ

वासुदेव पांडुरंग उर्फ हरीभाऊ जोशी यांची नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यातल्या बल्लाळ गावी वडिलोपार्जित शेती. उमरीला राहणारे हरीभाऊ मार्च 2014 मध्ये राज्य विद्युत वितरण कंपनीमधून सहायक लेखापाल पदावरून निवृत्त झाले आणि बल्लाळला आले. कडक उन्हाळ्याचे दिवस. लोकांना पिण्यासाठी पाणी नव्हतं. हरिभाऊंनी स्वतःच्या शेतात बोअर खणली. त्याला भरपूर पाणी लागलं. हरीभाऊंनी स्वखर्चाने बोअरवेलला पाईपलाईन केली आणि पाणी गावच्या विहिरीत सोडलं. त्या उन्हाळ्यात बल्लाळच्या लोकांचा पाण्याचा प्रश्‍न मिटला. सरकारी अधिकार्‍यांना याबाबत कळलं . बोअरवेलचे अधिग्रहण करून त्याचा मोबदला देण्याचा प्रस्ताव ठेवला. बोअरवेलच्या अधिग्रहणाला हरीभाऊंनी परवानगी तर दिलीच पण पैसेही नाकारले.
2015 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत हरीभाऊ स्वतः निवडणुकीसाठी उभे राहिले नाहीत पण सात अपक्षांचं त्यांनी उभं केलेलं पॅनल सत्तेत आले. सत्तेत आल्याबरोबर 91 हजार रूपये खर्च करून गावातील रस्त्यांवर एलसीडी लाईट बसले. गावातील ओढयाकाठी असलेल्या स्वतःच्या शेतातील दोन गुंठे जमीन देऊन जिल्हा परिषदच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंर्तगत मोठी विहीर खोदून घेतली. विहीरीला भरपूर पाणी लागलं. त्यावर जलवाहिनी बांधली. बल्लाळ गावातील 1300 घरात या नळयोजनेचं पाणी पोहोंचत असून गाव टँकरमुक्त झालं. त्यामुळे आजूबाजूच्या दोन तांड्यांनाही नळ योजनेव्दारे पाणीपुरवठा झाला.


गावातील पाणीप्रश्‍न कायमचा संपवण्यासाठी हरीभाऊंच्या सल्ल्यानुसार पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणाला गंगाधर बलिलवाड, बाजाजी राचेवाड, दत्ता, लक्ष्मण पाटील, मारोती पुवडवाड गेले. लोकसहभागातून पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी बल्लाळ गावाने घेतलेल्या पाणी ग्रामसभेला जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अधिकारी व 400 लोक उपस्थित होते.
स्वतःच्या शेताजवळ हरीभाऊंनी स्वखर्चाने नाला खोदून वन्यप्राण्यांच्या पाण्याचीही सोय केली आहे. भोकर इथल्या उपजिल्हाधिकारी दीपाली मोतियाळ यांनीही पाहणी करून त्यांच्या कामाचं कौतुक केलं.
कोणाच्याही कोणत्याही अडचणीबद्दल कळलं की हरीभाऊ तिथे धाव घेतात. गरीब, आदिवासींच्या मनात त्यांना विशेष स्थान आहे. सरकारी योजना, कागदपत्र याबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी हक्काचं माणूस म्हणजे हरीभाऊ. सर्व समुदायांमध्ये सलोखा राहावा यासाठी वेगवेगळ्या उपक्रमातून ते कार्यरत असतात. गावाच्या तंटामुक्त समितीचे ते अध्यक्ष आहेत. गावाच्या विकासाच्या ध्यासानं ते झपाटलेले आहेत. जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या काही अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा त्यांचा आरोप आहे. त्याविरोधात ते स्वखर्चानं लढा देत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री , पंतप्रधान कार्यालयाकडे त्यांनी तक्रार केली असून पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना सकारात्मक प्रतिसादही लाभला आहे.
पुत्रशोक, स्वतःचं ब्रेन हॅमरेज , शस्त्रक्रिया अशा वैयक्तिक दुःख-अडचणींवर मात करत हरीभाऊ खंबीरपणे उभे आहेत. स्वतःच्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णालयात येणाऱ्या इतर रुग्णांची विचारपूस करून त्यांचं मनोबल उंचावत असत. आपल्याला बोनस आयुष्य मिळालं असून त्याचा जास्तीत जास्त लोकांसाठी वापर करण्याचं हरीभाऊंनी ठरवलं आहे. 
- उन्मेष गौरकर.

No comments:

Post a Comment