Wednesday 11 April 2018

पगार नाही; पण मुलांना शिकायला मिळतंय तेच समाधान आहे

पुण्यापासून जेमतेम 8 किमीवरची महमंदवाडी. इथल्या तरवडे वस्तीतली, विद्यावर्धिनी नावाची शाळा. एकशिक्षकी. 1 ते 4 थीचे मिळून 50 विद्यार्थी. मंगला गायकवाड एमए बीएड झाल्या आणि त्यांनी इथं शिकवायला सुरवात केली. तेव्हा ही शाळा सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत सुरु करण्यात आली होती. मंगलाताई अजूनही एकट्याच ही शाळा चालवतात.
मुलांचे पालक काचपत्रा गोळा करतात आणि बरेचजण बिगारी काम करतात. मंगलाताई सांगतात की, ह्यापैकी बहुतेक मुलांचे आई वडील दोघंही कामाला बाहेर जाणारे आहेत. त्यामुळे पाणी भरुन ठेवणं, भांडी घासणं, घरातली बाकी कामं करणं आणि लहान भावंडाना सांभाळणं अशा जबाबदा-या या मुलांवर असतात. मुलं शाळेत गेली तर ही कामं कोण करणारं म्हणून सुरुवातीला पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार नसायचे. अर्थातच आर्थिक परिस्थितीही नाजूक असायचीच. मग त्यांच्याशी बोलून, समजावून मुलांना शाळेत आणावं लागायचं.



2002मध्ये 10 मुलांना घेऊन ही शाळा सुरु झाली. हळूहळू विद्यार्थी संख्या 250 वर गेली. त्यावेळी मंगलाताईंबरोबर इतर शिेक्षकही होते. तेही चांगल्या नोकरीच्या शोधात शाळा सोडून गेले. मंगलाताईंनी मात्र हाती घेतलेला शिक्षणाचा वसा पुढं न्यायचा ठरवला आणि ही शाळा सुरु राहिली. अर्थात आता मात्र त्यांना विनावेतन काम करावं लागणार होतं.
या शाळेत मुलांना सर्व विषयांची ओळख करुन दिली जाते. त्यांना लिहायला वाचायला शिकवलं जातं. त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड रुजवण्याचं काम इथं होतं. साधारणपणे 6 ते 12 वयोगटातली मुलं या शाळेत येतात. तोपर्यंत पालकही त्यांच्या फी, वह्या-पुस्तकांसाठी पैसे जमवतात. आणि त्यानंतर त्यांना दुस-या मोठ्या शाळेत घातलं जातं.
नगरसेवकांनी उपलब्ध करुन दिलेल्या 2 खोल्यांमध्ये सध्या शाळा भरते. मंगलाताई सांगतात, “तरवडे वस्तीपासून साधारण तीन किमीवर महानगरपालिकेची शाळा आहे. पण पहिली ते चौथीची मुलं एवढ्या लांब चालत जाऊ शकत नाहीत. म्हणून पालक त्यांना तिथं पाठवत नाहीत. आणि ही सध्याची जागा अपुरी पडते. त्यामुळे आता मुलांची संख्या वाढवता येत नाही.”
आरोग्य तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धांमध्ये सहभागाची संधी मुलांना उपलब्ध करुन दिली जाते. त्यांना मशाल, इनरव्हिल, रोटरी यासारख्या संस्था शालेय साहित्याचं वाटप करतात. मशाल संस्थेतर्फे मुलांना स्कॉलरशिप दिली जाते, मेहेरबाबा फाऊंडेशन मुलांना रोजचा खाऊ देतं.
क्वेस्ट ही संस्था मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी खास प्रयत्न करते. त्यांचे प्रतिनिधी ठराविक दिवशी येतात आणि मुलांना गोष्टींची पुस्तकं वाचून दाखवतात. त्यांनी मुलांसाठी पुस्तक लायब्ररीची सोय केली आहे.
मंगलाताई सांगतात, “या वस्तीतली मुलं अशीच फिरत राहून नयेत, बिघडू नयेत यासाठी माझा प्रयत्न आहे. त्यांना आता स्वच्छ राहायला आवडतं आहे. कधी कधी पाणी भरण्यासाठी या मुलांना शाळेच्या मध्ये एक-दीड तास घरी सोडावं लागतं. पण अशा अडचणी समजून घेतल्या तरच या मुलांचं शिक्षण चालू राहणार आहे. या मुलांना आता शिक्षणाची गोडी लागली आहे. मुलं आवडीने शाळेत येतात.” एकच शिक्षिका असल्याने परिपूर्ण शिक्षण देऊ शकत नसल्याची खंतही त्या व्यक्त करतात.
घरातली एक स्त्री शिकली तर पूर्ण घर साक्षर होतं असं म्हणतात. मंगलाताईसारख्या शिक्षिका सगळीकडे असतील तर सगळी छोटी मोठी गावं -वस्त्या साक्षर व्हायला वेळ लागणार नाही.

No comments:

Post a Comment