Tuesday 24 April 2018

सामाजिक संदेश देणारा राष्ट्रपाल

बीड जिल्ह्यातलं अंबेजोगाई. सामाजिक संदेश देणाऱ्या वेगवेगळ्या घोषणांनी रंगलेला कुर्ता, अशाच घोषणा असलेली डोक्यावर टोपी अन् हातात एक डफली असा पेहराव असलेला माणूस बसस्थानक, एखादा चौक, शाळा, महाविद्यालय, सरकारी दवाखाना आणि दहा पाच माणसं जिथे कुठे एकत्रित दिसतील अशा प्रत्येक ठिकाणी जातो अन् सुरु होतो सामाजिक प्रश्नांचा जागर! मग कधी विषय असतो स्त्रीभ्रूण हत्येचा, कधी पर्यावरणाचा, जल बचतीचा, संविधानाच्या जागृतीचा तर कधी हेल्मेटच्या वापराचा.
या माणसाचं नाव राष्ट्रपाल पडुळे. 10 वर्षांपूर्वी पत्नी अर्चना गर्भवती होती. तिला नियमित तपासणीसाठी घेऊन जात असताना गावातील इतर तीन-चार बायकाही त्या सुमारास तपासणीसाठी यायच्या. कालांतराने मात्र त्या यायच्या बंद झाल्या. पडुळे दाम्पत्याला मुलगी झाली. आपल्याबरोबर येणाऱ्या इतर बायकांच्या प्रसूतीविषयी चौकशी केली तेव्हा त्या बायकांनी गर्भलिंग निदान करून गर्भपात केल्याचं समजलं. हे रोखण्यासाठी काहीतरी करायला हवं, असा आग्रह अर्चना यांनी धरला. अन् त्या दिवसापासून सुरु झाला स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठीचा जनजागृतीचा उपक्रम!
संधी मिळेल तिथे राष्ट्रपाल यांनी कधी एकट्यानं तर कधी इतर सहकाऱ्यांसाेबत जिल्हाभर जनजागृती करायला सुरुवात केलं. सुुरुवातीला हा विचित्र वाटणारा पेहराव पाहून अनेकांनी हेटाळणी केली, हसले, वेडा झाल्याच्या निष्कर्षापर्यंतही काही जण पोहचले. पण राष्ट्रपाल डगमगले नाहीत. पुढे २०१० मध्ये जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्याप्रकरणे समोर आली. स्त्री जन्मदराच्या बाबतीत बीड देशात रेडझोनमध्ये गेला आणि लोकांना त्यांच्या जनजागृतीचं महत्त्व पटलं. राष्ट्रपाल यांनी बीडसह पुणे, सातारा, सोलापूर इथंही जागृती केली. खासदार सुप्रिया सुळेंबरोबर ‘जागर जाणीवांचा, तुमच्या आमच्या लेकींच’ अभियानातही राष्ट्रपाल आघाडीवर होतेे. दरवर्षी ते 'लेक वाचवा वारी पंढरीच्या दारी' अशी अंबाजोगाई ते पंढरपूर दिंडीही आषाढी वारीच्या वेळी काढतात.

जनजागृती करत असतानाच काही तरी कृतीशील करावं या भावनेतून त्यांनी गरीब, एचआयव्ही बाधित, अनाथ मुलींचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं. त्यांना इतर दात्यांच्या मदतीनं शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिलं. जवळपास 50 ते 60 अनाथ ,गरीब, परित्यक्ता महिलांच्या मुलांना त्यांनी शैक्षणिक साहित्य पुरवलं आहे. सध्या लोकसहभागातून अनाथ मुलींसाठी वसतिगृहाचं काम सुरू आहे. त्यांचं काम, प्रामाणिकता, धडपड पाहून समाजातून त्यांना वस्तू आर्थिक स्वरूपात मदत मिळते.
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत विविध संस्थांकडून १० पुरस्कार मिळाले आहेत.
सतत होणारे अपघात पाहून, जानेवारी- फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रपाल यांनी हेल्मेट वापराबाबत जनजागृती अभियान राबवलं. त्यातून ३१ जण नियमित हेल्मेट वापरासाठी तयारही झाल्याचं राष्ट्रपाल सांगतात.
राष्ट्रपाल यांची थोडी फार शेती आहे. काही काळ त्यांनी बार्टीचा (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचा) समतादूत म्हणूनही काम केले आहे.
या सगळ्या कामात पत्नी अर्चना पाठीशी खंबीर आहे म्हणूनच काम करू शकत असल्याचं राष्ट्रपाल म्हणाले.

 अमाेल मुळे.

No comments:

Post a Comment