मूळच्या जालन्याच्या डॉ . मंजिरी कुलकर्णी या आठवड्यात जपानच्या टोकियो कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान आणि जीवन विज्ञान विभागात वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून रूजू होत आहेत. डॉ.मंजिरी यांना परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात संशोधनाचं बाळकडू मिळालं. त्यांचं संशोधन पपई आणि डेंग्यू दोन्हीसाठी उपयुक्त ठरणारं आहे. पपईतील रिंग्ज स्पॉटमुळे देशातल्या तसंच जगातल्या पपईची 80 टक्के उत्पादनक्षमता कमी होते. हे विषाणू संपवणं गरजेचं आहे.त्याचबरोबर पपईच्या पानांच्या अर्कात काही औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे डेंग्यू बरा होऊ शकतो. अशा प्रकारचे गुणधर्म वापरून औषध किंवा लस तयार करण्याबाबत सध्या संशोधनपर चाचण्या सुरू आहेत असं डॉ मंजिरी यांनी सांगितलं. अलीकडेच परभणीच्या कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या आल्या होत्या. डेंग्यूचे चार प्रकार आहेत . त्यावर लस उपलब्ध असली तरी अद्याप ती परिपूर्ण नाही. यासंदर्भात मंजिरी यांनी केलेलं संशोधन डेंग्यूवरची लस तयार करण्यासाठी 'मूलभूत संशोधन' म्हणून वापरलं जाणार आहे.

परभणीच्या कृषी महाविद्यालयात डॉ.हिराकांत काळपांडे व इतर प्राध्यापकांमुळे नाविन्याचा ध्यास जडला, असं मंजिरी सांगतात. कुठलीही गोष्ट अवघड नाही. आजच्या मुलींनी जगाशी स्पर्धा ठेवून सातत्यपूर्ण प्रयत्न करायला हवेत. कुठल्याही गोष्टीचा न्यूनगंड न बाळगता कठोर परिश्रम व चिकाटीने प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळतं , असं मंजिरी सांगतात.
-बाळासाहेब काळे .
No comments:
Post a Comment