हिंगोली शहरापासून चार किलोमीटरवरचं बेलवाडी गाव. साधारण ५० कुटुंबांचं ६०० लोकसंख्येचं. अर्ध्या हिंगोली शहराची दुधाची गरज भागवणारं. मांडगे कुटुंबाच्या यशोगाथेमुळे गावातल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबानं म्हैसपालन सुरू केलं आहे. मांडगे कुटुंबाचं खर्च वजा जाता दिवसाचं उत्पन्न आज आहे १५ ते १८ हजार. ३० वर्षांपूर्वी मात्र परिस्थितीे वेगळी होती. कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ किशनराव आता 90 वर्षांचे आहेत. एकेकाळी केवळ तीस रुपये महिन्यावर एकाच मालकाकडे तीस वर्ष सालगडी म्हणून त्यांनी काम केलं. पाच मुलं, तीन एकर शेती आणि तीन म्हशी. तुटपुंजे उत्पन्न, नापिकी याला कंटाळून किशनरावांच्या मुलानं आत्महत्या केली.

म्हशीसाठी वीस बाय शंभर फुटाचे तीन टीनशेड केले आहेत. या शेडमध्ये कॉक्रीट बेड, हवेसाठी पंखे, म्युझीक सिस्टिम, शॉवर्स, फॉगर्स बसवले आहेत. चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी सिमेंटच्या गव्हाणी बांधल्या आहेत. टीनशेडमधील म्हशींचं मलमूत्र एका हौदात सोडण्यात येते. यासाठी २५ बाय १०० रूंदीचा हौद बांधण्यात आला आहे. दुपारी बारा ते पाच या काळात म्हशी मनसोक्त या हौदात डुंबतात. बाहेर पडताना धुवून स्वच्छ करण्यासाठी फवारे लावले आहेत. याच हौदातील पाणी चाऱ्यासाठी वापरलं जातं. दररोज निघणारे दोन ट्रॅक्टर शेण, खत म्हणून वापरलं जातं. यामुळे जमीन सुपीक व कसदार बनली आहे. गेल्या अनेक वर्षात या शेतात रासायनिक खतं, कीटकनाशक फवारणीची गरज पडली नाही. शंभर टक्के सेंद्रिय शेती करण्यात येते. म्हशींना दररोज तीन पोतं सरकी, तीन पोती ढेप, यासह हरभरा, मका, लाल ज्वारीचं पीठ, हिरवा चारा, कडबा कुट्टी असं सुमारे दोन ट्रक खाद्य दिलं जातं.
शेतीपैकी पन्नास एकर जमीन हिरव्या चाऱ्यासाठी राखून ठेवली आहे. शेतात लसूण घास, बरसीम, गजराज गवत, ऊस लावण्यात येतो. सोबत टाळकी, मका, ज्वारीही घेतली जाते.
दररोजचं 500-600 लिटर दूध हिंगोली शहरात 60 ते 70 रुपये लिटर दरानं विकलं जातं. यासाठी एक पिकअप व्हॅन, पाच मोटरसायकली आणि सायकली वापरल्या जातात. गेल्या अनेक वर्षांपासून मांडगेंचे ग्राहक कायम आहेत.
घरातले पाच जण आणि तीन सालगडी यासाठी काम करतात. सध्या रामेश्वर मांडगे कुटुंबप्रमुख म्हणून सर्व काम पाहतात. ३४ जणांच्या या कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीनं आता श्रीखंड, खवा, आइस्क्रीम असे दूधप्रक्रिया उद्योग सुरू केले आहेत.
-गजानन थळपते.
No comments:
Post a Comment