Monday 14 May 2018

शेती विकली,दुसऱ्यांची कसली, मुलाला आयएएस बनवलं!

उस्मानाबाद जिल्ह्यातलं उमरगा तालुक्यातलं दोन हजार वस्तीचं कसगी गाव. २७ एप्रिल. संध्याकाळचे सव्वासात वाजलेले. शेतातली कामं आटपून दिलीपराव घराकडे येत होते. घरासमोर मोठी गर्दी जमली होती. दिलीपराव येताच गावकऱ्यांनी त्यांना उचलून घेत जल्लोष केला. त्यांचा मुलगा गिरीश आयएएस झाला होता. पंचक्रोशीतला तो पहिलाच आयएएस. यूपीएससीच्या परीक्षेत यंदाच्या निकालात डॉ गिरीश बदोले राज्यात पहिले तर देशात २० वे आले. दिलीपरावांच्या नजरेसमोर झर्रकन भूतकाळ तरळला. 
दिलीपराव बदोले यांची वडिलोपार्जित ६ एकर जमीन. त्यांचं शिक्षण दहावीपर्यत. मात्र मुलं गिरीश आणि आशिष यांनीे भरपूर शिकावं, मोठं व्हावं, असं त्यांचं स्वप्न. शेतीचा धंदा तर आतबट्ट्याचा. मग संसाराचा गाडा चालण्यासाठी १९ वर्षांपूर्वी त्यांनी ३० एकर जमीन वाटा पध्दतीनं (बटईनं) घेतली. 
गिरीशच्या शिक्षणाची गाडी सुरू झाली. पहिली- दुसरीपर्यंत कसगीमध्ये. तिसरी-चौथी आजोळी कासारशिरशी इथं. चौथीत तुळजापूरच्या सैनिक स्कुलमध्ये निवड. तिथे दहावीपर्यंत मोफत शिक्षण. नंतर लातूरच्या दयानंद महाविद्यालयात विज्ञान शाखेतून बारावी. पुढे मुंबईच्या जेजे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश. इथे मात्र, फी भरण्यासाठी पैसे नव्हते. दिलीपरावांनी ४ एकर जमीन विकली. उमरगा इथल्या बँक ऑफ हैदराबादमधून अडीच लाख रुपये शैक्षणिक कर्ज घेतलं. अनंत अडचणी पार करून २०१४ मध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं. तरीही गिरीश समाधानी नव्हते. त्यांना आयएएस व्हायचं होतं. कुटुंबावर कर्जाचा वाढता भार. स्पर्धा परिक्षेत यश मिळण्याची शक्यता कमी. तरीही गिरीशला आई-वडिलांनी निर्णयस्वातंत्र्य दिलं . गिरीशने तयारी सुरू केली. २०१४ च्या दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळ होता. शेती पिकत नसल्यानं घर चालणं मुश्किल होतं. त्यामुळे मुंबईतल्या एका कंपनीत २०१४ ते २०१७ अधूनमधून गिरीशने नोकरी केली. सोबतच दहा-बारा तास अभ्यासही.
पुण्यातल्या युनिक अकॅडमीचे तुकाराम जाधव यांचं मार्गदर्शन घेतलं. २०१४ पासून तीनदा अपयश आल्यानंतर चौथ्यांदा गिरीशने यशाला गवसणी घातली. 'या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांनी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी , सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. प्रत्येक वेळी यश मिळतंच असं नाही, मात्र प्रयत्नात सातत्य ठेवलं पाहिजे ', गिरीश सांगतात. परिस्थितीचा बाऊ न करता कठोर परिश्रमांनी, जिद्दीनं परिस्थितीवर मात करणाऱ्या गिरीश यांचं यश संपूर्ण गाव साजरं करत आहे.

-चंद्रसेन देशमुख .

No comments:

Post a Comment