Monday 28 May 2018

असं एक गाव, गणिताशिवाय बातच नाही राव!

भूम तालुक्यातील सुकटा हे छोटंसं गाव. गावात शिरताच प्रत्येक घराची भींत आकड्यांनी रंगलेली, वर्तुळ, चौकोनांनी सजलेली दिसते. गावकऱ्यांनी अगदी मनापासून जपलेल्या या भींतीवरील मजकूर गावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या ज्ञानात भर पाडणारा आहे. छोट्याशा खेड्यातील माध्यमिक शाळेचे शिक्षक प्रकाश यादगिरे यांच्या अभिनव कल्पनेतून ही जादू झाली आहे. यादगिरे यांनी विद्यार्थ्यांना गणित-भूमितीची सूत्र सोप्या पध्दतीने समजावून सांगण्यासाठी ही क्लृप्ती लढवली. त्यातून गावकऱ्यांनाही फायदा झाला.यादगिरे सुकटा येथील विद्यालयात १९९९ पासून कार्यरत आहेत. त्यांना विद्यार्थ्यांच्या गरजा आणि उणिवांची जाणीव होती. गणित विषयात कमी गुण मिळत असल्याने मुलं आणि पालकही निराश. त्यामुळे या विषयावर अधिक जोरकसपणे शिवाय वेगळ्या पध्दतीने काम करण्याची इच्छा यादगिरे यांच्या मनात घोळू लागली होती. या विचारातूनच गणिताची सूत्रं सोप्या पध्दतीने विद्यार्थ्यांना समजावण्यासाठी गावातील घरांच्या भिंतींनाच फळा बनविण्याची संकल्पना त्यांना सुचली. कामाला सुरुवात झाली. 
                                                                  गावातील सुमारे १५० घरांच्या भिंतींसह पाण्याच्या टाकीवरही गणिताची सूत्रं ऑइलपेंटने रेखाटली आहेत. पाचवी ते दहावीपर्यंतची गणितातील बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि समीकरणांसह बीजगणित व भूमितीमधील मूलभूत सूत्रांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे खेळताना-बागडताना, गावात फिरताना, शेतामध्ये जाताना सर्वत्र गणिताची सूत्रं विद्यार्थ्यांच्या दृष्टीस पडतात. या भिंती विद्यार्थ्यांच्या मनात कोरल्या गेल्या आहेत. त्यामुळे गावातील मुलांची गणिताची बौद्धीक क्षमता वाढून त्यांच्यात गोडी निर्माण झाली आहे. 
विद्यार्थ्यांच्या स्वप्नातील गणिताचं गाव त्यांनी प्रत्यक्षात आणलं आहे.
प्रकाश यादगिरे म्हणतात, ‘मी निरीक्षण करीत होतो. विद्यार्थ्यांशी चर्चा करीत होतो. तेव्हा सहज लक्षात आलं की शाळेत गणिताच्या तासाला विद्यार्थी घाबरतात. ही भीती दूर झाली पाहिजे, म्हणून मी हे काम हाती घेतलं. आता भिंतींवर रखाटलेली गणिताची सूत्रं विद्यार्थ्यांना शाळेत आल्यावर पुस्तकात दिसतात. त्यामुळे आपण कोणतेही गणित सोडवू शकतो, असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे. हे काम हाती घेतले तेव्हा मला शासकीय फंड मिळाला असेल, असं ग्रामस्थांना वाटायचं. मात्र हे सगळं स्वखर्चातून सुरू होतं. भिंती रंगवण्यासाठी पेंटरचा शोध, त्यांच्याकडून अचूक काम करून घेणं खूप कठीण होतं. काही पेंटर स्क्वेअर-फूटाप्रमाणे दर सांगायचे. त्यामुळे तीन-चार पेंटर बदलत कितीतरी दिवस उन्हात थांबून गणिताची सूत्रं रेखाटून घेतली. हे काम पूर्ण करण्यासाठी दोन महिने लागले. मात्र, मी मागे वळून पाहिले नाही. मला विद्यार्थ्यांसाठी हे काम पूर्ण करायचंच होतं. आज विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत असल्यामुळे माझ्या परिश्रमाचे चीज झालं आहे’. 

- चंद्रसेन देशमुख.

No comments:

Post a Comment