Wednesday 16 May 2018

‘स्नेहग्राम’ची शाळा

“डीएड ची पदवी घेतली आणि माझ्यातला शिक्षकच जागा झाला. लातूरला जाताना बार्शीतील स्थलांतरितांची वस्ती नेहमी पाहायचो. एकदा त्या वस्तीत शिरलो. आणि शिक्षण हक्क कायदा समजवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. शब्दांची दमदाटी करुन मी घरी परतलो. पण आपण नेमकं काय केलं..? हा प्रश्न मला सतावत होता. 
१-२ महिन्यातच त्या रस्त्यावरुन जायची संधी मिळाली. सहजच लातूर रोडच्या वस्तीकडं नजर गेली अन् काळीज चरर्र करणारं वास्तव नजरेपुढं आलं. १००-१२५ मुलांची फौज पालांभोवती घुटमळताना दिसली. काही अर्धनग्न अवस्थेत, तर काही शिळ्या भाकरीचा तुकडा मोडत होती. पुन्हा तिथं वळलो. साजंवेळ. वस्तीत चुली पेटलेल्या, भाजीला फोडणी देणं चालू. वडीलधारी माणसं झिंगाट झालेली. तरीही संवादाचं अस्त्र उपसलंच. परिस्थितीचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी पुन्हा वस्तीत गेलो, सर्व्हे चालू केला. जवळच्याच घोडके प्लॉटच्या नगरपालिका शाळेत मुख्याध्यापकांना भेटलो. कांबळे सरांनी कसबसं या मुलांना शाळेत बसायला संमती दिली. हे सारं होईपर्यंत १५ दिवस उलटले”, महेश निंबाळकर समरसून सांगत होता. 



"गड सर करावा, अशा आनंदात वस्तीत गेलो. आणि सदाशिव मुळेकरांची भेट झाली. काकांना म्हणालो, उद्यापासून पोरांना शाळेत घेऊन जा, फक्त रस्ता ओलांडायचा." काका म्हणाले, "बरंय, एकट्या गड्याला दीस जातोया, सर. म्या हाय जायाला तयार. मंग माज्या बिगारीचं काय. ती तुमी द्या." शाळा शिकणार यांचीच मुलं अन् मी दिवसाची हजेरी देणारा कोण..? या विचारानं प्रचंड संतापलो. रागानं म्हणालो, "काका, आता फक्त या वस्तीत येऊन शिकवायचं तेवढं राहिलंय." काकानं लगेचच होकार दिला, "लय बेस हुईन." थोडा विचार करता मलाही हे पटलं. शेवटी २० सप्टेंबर २००७रोजी या अनौपचारिक शाळेचं उद्घाटन झालं. पोटापाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या मुलांच्या शाळेचं नाव ‘भटक्यांची शाळा’ ठेवलं. भीक मागायची, चोऱ्या करायची, कचरा गोळा करायची, ती मुलं शाळेत अक्षरं गिरवू लागली.



डीएडला शिकणारी मुलं शिकवायला येऊ लागली. सकाळी त्या मुलांना हॉस्टेलवरुन दुचाकीवरुन न्यायचं. नंतर स्वत:च्या शाळेत जायचं. स्वतःच्या पगारातील मानधनही त्यानं या छात्रशिक्षकांना द्यायला सुरुवात केली होती. महिनाकाठी ३००-४०० रुपये खिशात रहायचे. त्यात सोसायटी काढलेली, भाड्याचं घर, किराणा, भाडं, दवाखाना सारी गणितं बिघडली. ३-४ दिवस पाण्यावर आणि बिस्कीटावर काढले. शाळेला जाणंही होईना. कारण पुरेसे पैसे जवळ नसायचे. अशावेळी रात्री १२ वाजता घरमालक चव्हाण काकुंच्या मुलींनी जेवायला आणलेलं ताट आजही आम्ही विसरलेलो नाही. माझ्या पत्नीनं, विनयानं कधीही तक्रार केली नाही”. 
महेश आणि विनया झटून काम करत राहिले. आणि अनेकांचे हात सहकार्यासाठी पुढे येऊ लागले. त्यामुळे या वस्तीत शिक्षणाबरोबर धान्य, कपडेवाटप, आरोग्यशिबीरं, रेशन कार्ड आधार कार्ड शिबीर, बँक खाते, प्रसूती, हॉस्पीटल खर्च, मुलांचे वयाचे दाखले, पाण्याच्या टाक्यांचे वाटप अशा विविध गोष्टी घडू लागल्या. 
देणगी मिळायची ती फक्त वस्तुरुप. साहजिकच प्रपंचाची ससेहोलपट सुरु झाली. जवळच्या नातलगांनी महेशच्या कामाला विरोध सुरु केला. नातलगांचे दरवाजे दोघांसाठी कायमचे बंद झाले. वडिलांनीही घराबाहेर काढलं. उपासमारीचे दिवस आले. तरीही त्यांनी कामात खंड पडू दिला नाही. २०१२ मध्ये महेशनी नोकरीला रामराम ठोकला. हे मोठं धाडस होतं. कारण मिळकतीचा शाश्वत पर्याय त्यानं स्वत:हून बंद केला होता. एकदा त्याला जाणवलं, “आपण खरंच शाश्वत बदलासाठी काम करतोय का?” मग मुलांना वस्तीतून बाहेर काढून गुणात्मक शिक्षण द्यावं असा विचार आला आणि त्यातूनच जून २०१५ ला खांडवीत शाळा सुरु झाली. पण वस्तीतलं एकही पोरं शाळेला आलं नाही. शेवटी पारध्याकडं मोर्चा वळवला. २५ मुलं मिळाली आणि काम सुरु झालं. 
महेश सांगतो, “निवासी प्रकल्पाचा कसलाही अनुभव नव्हता. तरी केलं धाडस. फासेपारधी समाज कायमच भटकं जीवन जगणारा. पाली, बेडय़ांवर वास्तव्य करणारा. जन्मजात गुन्हेगार म्हणून इतर भटक्यांप्रमाणेच फासेपारधी समाजाकडे बघितलं जातं. गरिबी, गुन्हेगारीची दलदल यात अडकलेल्या कुटुंबातल्या भटक्या मुलांसाठी ‘स्नेहग्राम’ ही निवासी शाळा सुरू केली”.
आणि नुकत्याच रुजू झालेल्या दांपत्यानं मानधन वाढवून मागितलं. ही अपेक्षा मान्य करणं शक्य नव्हतंच. अचानक रात्री ८ वाजता ते दोघं काम सोडून गेले. तब्बल २ महिने २५ मुलांना शिकवणं अन् स्वयंपाक करणं, या दुहेरी चक्रव्युहात विनया अडकली. रात्रीच्या मुक्कामाची जबाबदारी एकट्या महेशवर आली. सकाळी ६ वाजता ती बार्शी सोडायची अन् धावपळीत प्रकल्प गाठायची. मुलांसाठी न्याहारी, दोन वेळचे जेवण अन् अध्यापन ही कसरत तिनं साधली. प्रसंगी भाजीला फोडणी देत पोळ्या लाटत तिनं मुलांना शिकवलं. अशातच एकदा मुलांना पिवळं पुरळं आलं. हात-पाय आणि अगदी बसण्याच्या जागेवरही फोड. कुणी औषध लावायला धजावत नव्हतं. तेव्हा ३-४ दिवस विनयानं मायेनं काळजी घेतली. त्या दिवशी शाळेतल्या छोट्या सुरेशनं विनयाला माई म्हणून हाक मारली. आणि तिथूनच विनया मुलांची ‘माई’ झाली.
वर्षाच्या आतच जागा मालकानं दुप्पट भाडेवाढ केली. शेवटी महेश-विनयाने कोरफळे इथं घेतलेल्या जागेत शाळा हलवली गेली. पण ९० च्या दशकात बांधलेल्या या वास्तुची पडझड सुरु होती. सप्टेंबर २०१६ मध्ये पडलेला पाऊस अन् मुलांचं आजारपण यामुळे पालकांची मनस्थिती बिघडली. मुलं वजा होऊ लागली. सारं संपलं, असं म्हणून कित्येक रात्री विनया व महेशनं जागून काढल्या. आता पुढं काय..? 
अशातच महेश व विनया यांच्याविषयीचा लेख कौस्तुभ आमटे यांच्या वाचनात आला. त्यांच्याकडून बोलावणंही आलं. त्या भेटीनं अन् आनंदवन समाजभान अभियानाच्या सहकार्यानं स्नेहग्रामच्या प्रश्नांवर तात्पुरता मार्ग निघाला. सुरुवातीला ५ रुम. त्याही टिनशेडच्या. ना कंपाऊंड ना एकही झाडं ! नंतर सुमारे ४६० झाडे लावली. आजही परिसरात हरणांचा वावर आहे, तसा लांडग्यांचाही. सोबतीला महेश, विनया अन् ३६ मुलांची फौज. सुरुवातीला बोअर मारुनही पाणी उपसायला वीज नव्हती. शिक्षक उपलब्ध नव्हते, ना स्वयंपाकी. पाण्यासाठी ५०,०००/- रुपये मोजावे लागले. ही बातमी कळताच डॉ. विकास आमटे यांनी २,७०,०००/- रुपयांचा जनरेटर पाठवून दिला. बोअरचं पाणी उपसतेवेळी व्हर्च्युअल क्लास चालवण्याची कल्पना समोर आली. त्यासाठी प्रोजेक्टर, लॅपटॉप मिळाला. व्हर्च्युअल क्लॉसनंतर व्हीआर लायब्ररी साकारली अन् गेल्या महिन्यात टॅबस्कूलही. एका स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात, एक सोलर पॅनल सर्किटवर तात्पुरता प्रकाश, मोबाईल व टॅब चार्जिंगचा प्रश्न मार्गी लावला.
सध्या इथं २१ मुलगे, १५ मुली आहेत. १ली ते ४थी अशा ४ वर्गाची आवश्यकता असतानाही २ वर्गखोल्यांवर बहुवर्गअध्यापन पद्धतीनं विनया मुलांना शिकवते. मुलांचा पाया पक्का करुन क्रमिक अभ्यासक्रमाकडे वळण्याची दुहेरी कसरत इथं करावी लागतेय. तरीही ९५% मुलांना लिहिता-वाचता येतं. मुलांना कौशल्याधिष्ठीत शिक्षण मिळावं, यासाठी कुकिंग, शेती, मातीकाम यासह बालसंसद, बालन्यायालय, स्नेहग्राम बँक, व्हर्च्युअल ट्रीप, पुस्तकाबाहेरचं जग मुलांना दाखवणे. यात स्मशानभेट, पोलीस कार्यालय अशा क्षेत्रभेटीचं घडवून आणल्या जातात. “शिक्षण असो की जबाबदारी, कामाची रोटेशन पद्धत आम्ही अवलंबली आहे. भविष्यात स्नेहग्राममध्ये ‘लोकल ते ग्लोबल’ असा शिक्षणप्रवास आम्ही सुरुवात करतोय”, महेश सांगतो. 

No comments:

Post a Comment