Wednesday 28 December 2016

बालविवाहाचे दाहक वास्तव

वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याच्या आधी लग्न लावले जाणे – हे व्यक्तीच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन असते. जगभरात कोट्यावधी मुले ‘लग्न’ नावाच्या हिंसेला बळी पडतात. यात ८२% मुली आणि १८% मुलांचाही समावेश असतो. बालविवाहाचे दुष्परिणाम मुख्यत्वेकरून मुलींनाच भोगावे लागतात. दररोज सुमारे ३९,००० मुलींचे कोवळ्या वयात लग्न लावले जाते – असे UNFPA ची आकडेवारी सांगते. जितक्या लहान वयात लग्न होईल, तितके मुलीच्या आरोग्यावर आणि सामाजिक विकासावर होणारे दुष्परिणाम वाढत जातात. कधी अंधश्रद्धेपोटी कधी गरिबीमुळे कधी तर शिक्षणाच्या सोयींच्या अभावी अनेक मुली बालविवाहाच्या प्रथेला बळी पडत असतात. मुलांच्या पालकांना कितीही समजावले तरी ते वेगवेगळी कारणे सांगत या प्रथा सुरु ठेवतात – या अनुभवा नंतर ‘युनिसेफ’ ने गावोगावच्या मुलामुलींनाच स्वत:च्या हक्कांविषयी सक्षम करायचे ठरवले. त्यासाठी बालहक्क या विषयांवर गावोगाव कार्यशाळा घेतल्या गेल्या. बालविवाहाचे धोके त्यांना समजावून सांगण्यात आले आणि गावातल्याच मुलामुलींच्या नेतृत्वाखाली त्यांचे गट तयार करण्यात आले. या गटांच्या कार्यकर्त्यांनी बालविवाह होऊ नयेत, यासाठी आपापल्या गावात संघटीत प्रयत्न सुरु केले. आज हे कार्यकर्ते अल्पवयीन मुलांना स्वत:चे लग्न थांबवण्यासाठी मदत करीत असतात. त्याच प्रयत्नांचे फळ म्हणून पारनेरची सारिका, टाकळीबाजारची यमुना, धामणगावचा अस्लम अशा १४ते१६ वयोगटातल्या मुलांनी स्वत:चे लग्न नाकारून एक नवा संघर्ष उभारला आहे. शहरात रहाणाऱ्या लोकांना त्यांच्या संघर्षाची धार कितपत जाणवेल माहित नाही – पण जालना जिल्ह्यातल्या खेडोपाडी सुरू झालेले हे अभिसरण नक्कीच विचार करायला लावणारे आहे.
सुनिता – (वय १२)
जालन्यातल्या एका लहानशा खेडेगावात प्राथमिक शाळेत शिकत असतानाच सुनीताच्या आईवडिलांनी तिचे लग्न उरकायचे ठरवले. पण सुनीताला शिकायची खूप इच्छा होती त्यामुळे तिने लग्नाला विरोध करायचा प्रयत्न केला –पण तिचे कोणीच ऐकून घेत नव्हते. मग सुनीताने मदतीसाठी थेट मुख्य कार्यकरी अधिकारी यांनाच साद घालायचे ठरवले.सुनीताच्या शाळेत एकदा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते – तेव्हा त्यांनी मुलांना स्वत:चा फोन नंबर दिलेला होता आणि गावात जर बालविवाह आढळला तर कळवायला सांगितले होते. सुनीताचा फोन जाताच जिल्ह्यातली यंत्रणा त्यांनी कामाला लावली आणि ताबडतोब तिचे होऊ घातलेले लग्न थांबवले. आज ती कस्तुरबा गांधी निवासी शाळेत राहून स्वत:चे शिक्षण पूर्ण करते आहे.
यमुना (वय १६)
यमुना एक हसरी आणि दिसायला वागायला गोड मुलगी आहे. तिचा एकूण वावर समजदार आणि आत्मविश्वासपूर्ण असल्याचे जाणवते.ती वर्षभरापूर्वी युनिसेफतर्फे दिल्या जाणाऱ्या चाईल्डप्रोटेक्शन ट्रेनिंग मध्ये सहभागी झाली होती.त्यानंतर व्यक्ती म्हणून असलेल्या मुलीच्या हक्कांची जाणिव तिच्यामध्ये तयार झाली. नंतर तिचे दिपशिखा ट्रेनिंग भाग २ झाले. ती सध्या स्वत: गावात दीपशिखा वर्ग घेत आहे. या वर्गात ३५-४० मुली आहेत. मागच्या वर्षी तिला एक ठिकाण आले होते, मुलगा मिल्ट्रीतला होता, तेव्हा यमुनाच्या आईवडिलांवर तिचे लग्न उरकून टाकण्यासाठी नातेवाईकांचा खूप दबाव होता. यमुनाच्या वडिलांनाही वाटले – “ मुलीला शिकवून काय फायदा आहे ? ती तिच्या पायावर तरी उभी राहील का? तिला काय नोकरी मिळेल का ? की उगाच पैश्यापरी पैसा चाललाय?” पण यमुना ठाम राहिली, दिपशिखा ट्रेनिंग मध्ये सांगितलेली माहिती तिने प्रत्यक्ष आयुष्यात उतरवली. लहान वयात लग्न करण्याचे तोटे आईवडिलांना सांगितले. ते फारच आग्रह करायला लागले तेव्हा – “तुमची पोलिसात तक्रार करेन; मग ते तुम्हाला तुरुंगात टाकतील” –अशी धमकीच दिली यमुनाच्या आईवडिलांना युनिसेफ च्या फिल्ड कोऑर्डिनेटरनेही समजावून सांगितले आणि त्यांनाही मुलीचे इतक्यात लग्न करू नये हे पटले.
अस्लम (वय १७)
अस्लमच्या घरची परिस्थिती मध्यमवर्गीय आहे. त्याचे वडील ऊसतोडणीचे मुकादम आहेत. शिवाय साडेतीन एकर शेती आणि मटनाचे दुकान देखिल आहे. घरात असलमचे आईवडील; दोन भाऊ आहेत. असल्मच्या बहिणीचे लग्न झाल्यावर अस्लमच्या आईला एकटीला घरकाम करणे अवघड जायला लागले. तिला घरकामाला मदत व्हावी म्हणून त्यांनी अस्लमचे लग्न करायचे ठरवले. ही बातमी गावतल्या दीपशिखा प्रेरिकेच्या आणि युवा संघटकांना समजली. तेव्हा बचत गट स्थापन करायच्या निमित्ताने त्यांनी अस्लमच्या घरी येणेजाणे वाढवले. हळूहळू अस्लमच्या घरच्या मंडळींना लहान वयात लग्न करून देण्याचे तोटे समजावून सांगितले. अस्लमला स्वत:लाही इतक्यात लग्न करणे अजिबात मंजूर नव्हते. त्याला नव्या मित्रमंडळींचा आधार मिळाल्यामुळे जास्त ठामपणाने घरात स्वत:चे म्हणणे मांडता आले. आज त्याच्या आईवडिलांना त्याचे म्हणणे पूर्णपणे पटलेले आहे. अस्लम २१व्या वर्शाचा होईपर्यंत ते थांबणार आहेत. त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याच्या लग्नाचा विचार करायचा नाही- असे त्यांनी ठरवले आहे.
सारीका (वय १५ )
सारीकाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे ती लहानपणापासून तालुक्याच्या गावी मामाच्या घरी राहून शिकली आहे. तिच्याहून मोठ्या दोन बहिणींचे लग्न झालेले आहे. एका बहिणीला लग्नानंतर एकदीड वर्षानंतर आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या; तेव्हापासून ती माहेरी येऊन राहिलेली आहे. त्या बहिणीच्या नवऱ्याने सारिकाच्या वडिलांकडे सारिकाची मागणी केली – “ तुमच्या मोठ्या मुलीला काही समज नाही, म्हणून तिच्याऐवजी मला ही लहानी करून द्या – म्हणजे दोघी एका घरात नांदतील आणि तुमचाही एका मुलीचा हुंडा वाचेल” असे त्याचे म्हणणे होते. सारिकाच्या आईवडिलांना आपल्या दोन्ही मुलींचे भले होण्याची आशा वाटू लागली आणि ते लग्नाला तयार झाले. पण सारिकाला असे लग्न अजिबात मंजूर नव्हते. तिने गावातल्या दीपशिखा प्रेरिकेला स्वत:वर ओढवलेल्या आपत्तीबद्दल सांगून मदत मागितली. त्यानंतर दीपशिखा प्रेरिका आणि क्षेत्र समन्वयक अशा दोघींनी हस्तक्षेप केला आणि सारिकाच्या पालकांना समजावून सांगितले. तसेच माहेरी आलेल्या बहिणीनेही आई-वडिलांना स्पष्ट सांगितले की- ‘माझं वाटोळं झालं ते झालं आता तिला त्या घरात पाठवू नका !’ सारिकाच्या काकूनेही पुढाकार घेऊन तिच्या आईवडिलांशी चर्चा केली. ’ लहान मुलीला त्याच घरात सवत म्हणून दिले तर मोठीच्या जीवालाही धोका व्हायची शक्यता आहे’ हे लक्षात आणून दिले. ह्या सर्व गोष्टींचा सारिकाच्या आईवडिलांनी खूप विचार केला. अखेर त्यांना सारिकाचे म्हणणे ऐकले आणि अठरा वर्षापर्यंत तिचे लग्न करायचे नाही – असा निर्णय घेतलाय. आता ती उत्साहाने पुढील अभ्यासाला लागली आहे.
दीपशिखा गटाने या मुलींना मदत केली. अशी मदत करायला तुम्हाला आवडेल का? मुळात एखाद्या कुटुंबात बालविवाह करण्याचं घटतंय, हे कळल्यावर तुम्हाला तो रोखण्यासाठी हस्तक्षेप करण्यात काही गैर वाटत नाही ना?
वंदना खरे

No comments:

Post a Comment