Saturday 24 December 2016

यांच्याकडून आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे!

अन्यायाचा प्रतिकार करणाऱ्या ह्या चंद्रपूर आणि लातूर जिल्यातील मुलींचं उदाहरण.
यांच्याकडून आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे! 
पश्चिम महाराष्ट्रातलं ३ ते ४ हजार लोकसंख्येचं एक गाव... ‘मसुचीवाडी’! गावात शिक्षणाच्या सोयी नसल्यामुळे गावातली मुलं शेजारच्या गावात शाळा –कॉलेजमध्ये जातात. पण आता गावातल्या मुलींना गावाबाहेर न पाठवायचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला – आणि त्याचं कारण आहे शाळेच्या वाटेवर होणारा लैंगिक हिंसाचार! गेल्या आठवडाभरात विविध वृत्तवाहिन्यांवर ही बातमी दाखवली जात होती. गेल्या दोन वर्षांपासून मसुचीवाडीला हा त्रास होत होता. गावातल्या लोकांनी आपल्या पातळीवर याला विरोध करायचे केलेले प्रयत्न अपुरे पडले. पोलीसही दखल घेत नव्हते आणि नेते मंडळींना देखील हा प्रश्न फारसा महत्त्वाचा वाटत नव्हता. अखेर मागच्या आठवड्यात जेव्हा ग्रामपंचायतीमध्ये मुलींचे शिक्षण बंद करायचा आणि निवडणुकांवर बहिष्कार घालायचे ठराव करण्यात आले! तेव्हा कुठे महिला आयोग, पालकमंत्री, आमदार ,पोलीस अशा सर्वांना जाग आली – आणि मुलींना त्रास देणाऱ्या चार जणांपैकी तिघांना अटक करण्यात आली.
रस्त्यावर होणाऱ्या छेडछाडीमुळे मुलींचे शिक्षण थांबवले जाण्याचे हे काही पहिलेच उदाहरण नाही - मागच्या वर्षी उत्तरप्रदेशातल्या बरेली जवळच्या एका गावात देखील २०० मुलींनी एकाचवेळी शाळा सोडलेली होती. त्याआधी हरयाणात महेन्द्रगढमधील एका गावातल्या ४०० मुलींनी याच कारणाने शाळा सोडली होती. ग्रामीण भागातच नव्हे तर अगदी मुंबईसारख्या शहरातदेखील शाळाकॉलेजकडे जाणारे रस्ते असुरक्षित असल्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये मुलींना सातवी नंतर घरीच बसावे लागते. वर्षानुवर्षे घरोघरी अनेक मुली रस्त्यावर आपल्याला होणारे त्रास पालकांपासून लपवूनच ठेवत आलेल्या आहेत. कारण एखाद्या मुलीवर लैंगिक हिंसा होणे – हा त्या कुटुंबाचा अपमान समजायची पद्धत आहे म्हणून मुलीला अशा छेडछाडीला सामोरे जावे लागल्याचे जेव्हा पालकांना समजते, तेव्हा पुढचा अतिप्रसंग टाळण्यासाठी ते मुलींचे शिक्षणच बंद करतात ! अर्थातच एकदा मुलींचे शिक्षण थांबले की तरण्याताठ्या पोरीला घरात ठेवण्याचा धोका नको म्हणून तिचे लग्न लावले जाते आणि तिच्यावरच्या अन्यायाची मालिका पुढे सुरूच राहते!
अन्यायाला प्रतिकार करण्या ऐवजी घाबरून स्वत:चेच नुकसान करून घेण्याचाच असा पायंडा पडलेला असताना जेव्हा चंद्रपूर, लातूर सारख्या मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातल्या मुली संघटितपणे गुंडाचा बिमोड करतात – तेव्हा त्यांचा आदर्श सर्वांसमोर मांडणे गरजेचे वाटते.
पहिले उदाहरण आहे - चन्द्रपूर जिल्ह्यातल्या सिदूर तालुक्यातल्या दीपशिखा गटाचे. या गटाचे नेतृत्व करणारी चुणचुणीत मुलगी - वैभवी उल्माले. वैभवी जेव्हा शाळेला एकटी जायची तेव्हा वाटेवरती एक माणूस नेहमी लैंगिक हावभाव करून दाखवत असे – सुरुवातीला ती घाबरून मान खाली घालून गपचूप निघून जात असे. पण एके दिवशी शेतातून जात असताना तो माणूस तिच्या जवळ येऊ लागला , तेव्हा तिने एका शेतकरी आजोबांकडे मदतीसाठी धाव घेतली. तेव्हा तो माणूस पळून गेला आणि आजोबांनी पुन्हा कधीच एकटीने शाळेत न जायचा सल्ला दिला. वैभवी तेव्हापासून मैत्रिणींच्या सोबतच शाळेला जायला लागली. मैत्रिणींशी गप्पा मारताना लक्षात आलं की त्या माणसाने त्यांच्यापैकी सर्वांनाच कधीनाकधी त्रास दिलेला होता. मग युनिसेफ तर्फे चालवल्या जाणाऱ्या दीपशिखा वर्गात शिकवणाऱ्या ताईना त्यांनी हा अनुभव सांगितला. ताईशी बोलून त्यांना लैंगिक हिंसेला प्रतिकार करायचं बळ मिळालं आणि एक दिवस त्यांनी मुलींना जातायेता त्रास देणाऱ्या माणसाला घेरलं. त्याला पकडून ग्रामपंचायती समोर उभं केलं आणि ग्रामपंचायतीने त्याला इतका सज्जड दम भरला की तो माणूस गाव सोडून पसार झाला.
दुसरे असेच उदाहरण आहे – लातूर मधल्या बोरीवती गावातले. लातूरच्या बोरिवती गावात रहाणाऱ्या पमाताईंचे घर म्हणजे गावातल्या सगळ्याच मुलींच्या आणि बायांच्या विश्वासाची जागा! पमाताई दीपशिखा प्रेरिका म्हणून काम करतात. पण त्यांचे काम वर्ग घेण्यापुरतंच मर्यादित ठेवलेलेलं नाही. वर्गात शिकवली जाणारी मुलीच्या आत्मसन्मानाची मूल्ये प्रत्यक्षात कशी उतरवता येतील त्यासाठी देखील त्या जागरूक असतात. आपण एखादी अडचण पमाताईंना सांगितली तर गावातल्या इतर बायांच्या मदतीने त्या नक्की दूर करतील असा विश्वास दीपशिखा वर्गातल्या मुलींच्या मनात तयार झालेला होता. याच विश्वासापोटी बोलायला अतिशय अवघड अशी समस्या घेऊन काही मुली पमाताईंकडे आल्या. शाळेतून येताजाताना या मुलींना एक माणूस विचित्र खाणाखुणा करायचा. . .अचकट विचकट बोलायचा. . . नको तिथे हात लावायचा. सुरुवातीला प्रत्येक मुलगी आपल्यालाच असा घाणेरडा त्रास होतो आहे असे मानून गप्प बसत असे. पण एकमेकींशी बोलल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की आपल्या सगळ्याचजणींना हा त्रास होतो आहे. दीपशिखा वर्गात एक दिवस हा विषय निघाला आणि पमाताईंनी या त्रासाचा बंदोबस्त करायचे ठरवले. एक दिवस सगळ्या पोरींनी त्या फाजिल माणसाला बसमधेच घेरले आणि अक्षरश: हाताला धरून ओढत ओढत गावातल्या चौकात आणले. सर्वांसमोर त्याला असा काही दम दिला की पुन्हा तो माणूस गावात फिरकला देखिल नाही. आता बोरिवती गावातल्या मुलींना बिनघोरपणे शाळेत जायला मिळते आहे!
या दोन्ही उदाहरणांमध्ये म्हणजे मुलींना एकमेकींशी बोलण्यासाठी दीपशिखा वर्गांच्या निमित्ताने एक स्वतंत्र अवकाश मिळाला होता. तसेच त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय शोधायला मदत करणारी, धीर देणारी व्यक्ती त्यांच्यासोबत होती. म्हणून त्या मुलींना शिक्षणाचा हक्क सोडून द्यावा लागला नाही! मुलींसाठी आपापल्या वस्तीमध्ये, गावामध्ये अशा जागा आपण निर्माण करायला हव्यात – तरच त्यांना आत्मनिर्भर होण्याची दिशा दिसेल
वंदना खरे.

No comments:

Post a Comment