Tuesday 24 January 2017

इच्छा तिथे मार्ग



वयात येणाऱ्या मुलींसाठी मासिक पाळीतील ४-५ दिवस त्रासाचे असतात. मुलींची ही समस्या लक्षात घेऊन भोकरदन तालुक्यातील बाभूळगावच्या जिल्हा परिषद शाळेत मुलींसाठी ‘चेंजिंग रूम’ तयार करण्यात आली. त्यामुळे मुलींचे मनोधैर्य वाढले, त्या ४ दिवसांची भीती पळाली आणि शाळेतील अनुपस्थितीचे प्रमाण देखील कमी झाले. 
 भोकरदन तालुक्यातील बाभूळगावच्या या शाळेत १ली ते १० वी च्या जवळपास १५० विद्यार्थिनी आहेत, त्यात ९वी-१०वी च्या विद्यार्थिनी आहेत, ६५ ते ७० पर्यंत. विद्यार्थिनींच्या शाळेत अनुपस्थित राहाण्याच्या कारणाचा शोध घेतला तेव्हा ही मासिक पाळीची समस्या आहे हे शाळेतील शिक्षिका स्वाती चित्ते यांच्या लक्षात आले. आणि या शिक्षिकेला त्यावरचा उपायही सापडला. खरोखरच, इच्छा तिथे मार्ग ! 
प्रथम त्यांनी मुलींशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला. मुलींच्या अडचणी जाणून घेतल्या आणि यातूनच पुढे आली ‘चेंजिंग रूम’ ची कल्पना. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या या कल्पनेला शाळेचे मुख्याध्यापक जयंत कुलकर्णी आणि बाकी सहकाऱ्यांनी स्वखर्चातून बळ दिले. मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून दिले. चेंजिंग रूम तयार झाली आणि बघता बघता मासिक पाळीच्या समस्येपायी मुलींना शाळेतच न पाठवणाऱ्या पालकांनी मुलींना शाळेत पाठवायला सुरुवात केली. मुलींची अनुपस्थिती तर कमी होऊ लागलीच. पण आणखीही काही घडलं. 
या उपक्रमामुळे बाभूळगावसारख्या ग्रामीण भागातील महिलांचेही मासिक पाळीविषयीचे गैरसमज दूर झाले. शास्त्रीय माहिती मिळाली आणि त्या चार दिवसांची भीतीच दूर पळाली. शाळेच्या या नियोजनाची आणि चेंजिंग रूमची ‘युनिसेफ’नेही दाखल घेतली आहे. त्यांनी या उपक्रमावर डॉक्युमेंट्री तयार केली असून राज्यभरातील शाळांमध्ये ती दाखवण्यात येणार आहे.

बाभूळगाव शाळेच्या शिक्षिका चित्ते मॅडम, मुख्याध्यापक जयंत कुलकर्णी व त्यांचे सहकारी यांचं अभिनंदनच करायला हवं. मुलींनी शाळेत अनुपस्थित राहू नये या प्रामाणिक इच्छेतून त्यांनी शोधलेला मार्ग अनुकरणीय आहे. आज बाभुळगावतील विद्यार्थिनींच्या पालकांना या शाळेचं खूप कौतुक आहे.
मुलामुलींची अनुपस्थिती रोखणारे असे उपाय अनेक शाळा करत असतात. या उपायांचा प्रसार व्हायला हवा. आम्हाला तशी माहिती या मेलवर अवश्य कळवा. 
- अनंत साळी

No comments:

Post a Comment