Friday 20 January 2017

‘विप्स’ने रक्तक्षयावर मात......विद्यार्थ्यांचं हिमोग्लोबिन वाढलं !



आपल्याकडे आजही ग्रामीण भागात बऱ्याच प्रमाणात बालविवाह होतात. काही विवाह वेळेवर लक्षात आल्यामुळे थांबतातही. पण, सगळेच असे विवाह कळून येत नाहीत. याचाच परिणाम म्हणजे मुलींच्या शरीराची पूर्ण वाढ होण्याआधीच विवाह आणि पुढे मातृत्वही त्यांच्यावर लादलं जातं. मुळातच शरीराची अपुरी वाढ, त्यातून येणारं गर्भारपण. यातूनच मग तिला ऍनिमिया - रक्तक्षयासारखा विकार होऊ शकतो. काही व्याधी मग पुढील पिढीपर्यंत पोहोचतात. काय केलं तर यावर उतारा मिळेल, असा विचार करताना नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी एक प्रयोग केला. हे अधिकारी म्हणजे डॉ. सुशील वाकचौरे. या प्रयोगाचं नाव "विप्स" अर्थात "विकली फॉलिक आर्यन सप्लीमेंटशन कोर्स." 

डॉ. वाकचौरे सांगतात की, माता व बालमृत्यूच्या विविध कारणांत एक कारण आहे ते म्हणजे रक्तक्षय. किशोरवयीन अवस्थेत शरीराची जडण घडण होताना होर्मोनल बदल तसेच रक्ताची कमतरता यामुळे नवी पिढी रक्तक्षयासह अन्य काही विकारांनी ग्रासल्याचे निष्पन्न झाले. त्याची स्पष्टता झाल्यावर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या सहकार्याने ‘विप्स’ अर्थात ‘विकली फॉलिक आर्यन सप्लीमेंटशन कोर्स’ काही शाळांमध्ये सुरु केला. वर्षभरात त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. वर्षभरानंतर बहुतेकांच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाणही वाढल्याचे समोर आले. ही उपयुक्तता लक्षात आल्याने यावर्षीही हा उपक्रम राबविण्याचे वाकचौरे यांनी नियोजन केले आहे. 
मागील वर्षी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांसह, सरकारी अनुदानित शाळांमध्ये हा उपक्रम राबवला गेला. सुरुवातीलाच किशोरवयीन मुला–मुलींना शरीरशास्त्राचा परिचय करून दिला गेला. त्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात लोहाचे प्रमाण कमी आढळले. शैक्षणिक वर्षात ५२ आठवडे असतात. मग, प्रत्येक सोमवारी आर्यन अर्थात लोहाच्या निळसर रंगाच्या गोळ्या देण्याचे निश्चित केले गेले. प्रत्येक सोमवारी विद्यार्थाना ही गोळी जेवणानंतर दिली गेली. शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी गोळी वाटपाची जबाबदारी सांभाळली. या गोळीने कुणाला काही त्रास होतोय का, यावर लक्ष ठेवण्यात आले. गोळी देण्याआधी विद्यार्थ्यांनी किमान नाश्ता करणे अभिप्रेत असते. शिक्षकांकरवी ही खातरजमा होऊन गोळी दिली गेली. गोळी वितरणासाठी स्वतंत्र कार्ड तयार करण्यात आले. वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने किती गोळ्या घेतल्या, किती राहिल्या याची मांडणी या कार्डवर होऊ लागली. वर्षभरानंतर विद्यार्थ्यांच्या हिमोग्लोबीनमध्ये वाढ झाल्याचे पहावयास मिळाले. यामुळे अर्थातच सर्वांचा उत्साह वाढला. 



जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक विद्यार्थी आज या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. मुलींचा मासिक पाळीत होणारा रक्ताचा ऱ्हास, लहान वयात होणारी लग्ने, मातृत्व यामुळे त्यांच्या शरीराचा विकास खुंटतो. शरीराची झीज भरून निघण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणारा आहे.
प्राची उन्मेष.

No comments:

Post a Comment