Sunday 29 January 2017

वाचन प्रथम !


"मुलांना कसं शिकवायचं तेच कळत नाहीये. शिकवायला सुरुवात कशी, कुठपासून करायची तेच समजेनासं झालंय..” मुलांना शिकवणारी एक मैत्रीण म्हणाली. शिक्षकांना येणारी ही नेहमीचीच अडचण. मुलं वरच्या इयत्तेत पोचूनही त्यांना प्राथमिक गोष्टी फारशा समजलेल्या नसणं. मुळात वाचताच न येणं. या समस्येवर ‘प्रथम’ संस्थेने मार्ग काढला. २००७ पासून संस्थेने सुरू केलेला 'रिड इंडिया' उपक्रम. ३० ते ५० दिवसात मुलांचं मूलभूत वाचन आणि गणित पक्कं करणारा. ‘प्रथम’च्या मजकूर (content) आणि प्रशिक्षण संचालक उषा राणे यांनी ‘नवी उमेद’ला माहिती दिली.

‘रीड इंडिया’त मुलं कोणत्याही इयत्तेत असली तरी त्यांना वाचायला किती येतंय याची अनौपचारिक चाचणी घेऊन, त्यांचं पाच स्तरांत वर्गीकरण करून शिकवलं जातं. ४० ते ६० सोपे शब्द, परिचित विषयावरची गोष्ट वाचता येणारी मुलं ‘गोष्ट स्तरा’वरची, पहिलीच्या पुस्तकातला सोपा परिचछेद वाचू शकणारी ‘परिच्छेद स्तरा’वरची, दहा छोट्या परिचित शब्दांपैकी चार शब्द नीट वाचणारी ‘शब्द स्तरा’वरची. चार शब्द नीट वाचता न येणार्यांीना १० अक्षरं वाचायला दिली जातात. त्यापैकी चार अक्षरं नीट वाचणारी ‘अक्षर स्तरा’वरची आणि तेवढंही न येणारी 'काहीच नाही' या स्तरावर मानली जातात. “पाचवीचे सगळे विषय वाचनाधारित आहेत पण पाचवीची ५० टक्के मुलं गोष्ट वाचू शकत नाहीत. तसंच सातवी-आठवीच्या ८०% मुलांना भागाकार येत नाहीत.'' उषाताई सांगतात.
याच पद्धतीने गणितही शिकवलं जातं. चाचणीनंतर पाच-पाच मुलांचे स्तरनिहाय गट करून त्यांना मजा वाटेल अशा प्रकारे शिकवलं जातं. ऐकणं-बोलणं-वाचणं-लिहिणं या क्षमता विकसित होण्यासाठी विविध खेळ घेतले जातात. वस्तू-चिन्हांच्या साहाय्याने बेरीज-वजाबाकी पक्की करून घेणं, नाणी-नोटांच्या साहाय्याने गुणाकार-भागाकार सोपे करून शिकवणं, मुलांना मोठ्याने वाचायला सांगणं, वाचलं त्यावर चर्चा करायला, प्रश्न विचारायला, मत तयार करायला, मत व्यक्त करायला प्रोत्साहन देणं. ''आपल्याकडे श्रवणपद्धतीमुळे कितीतरी मोठ्या माणसांसाठीही बोलणं ही खूप कठीण क्षमता असते. आम्ही मुलांना बोलतं करण्यावर खूप भर देतो. त्यांना परिचित असणारा एखादा शब्द देऊन त्यावर विचार करायला लावतो. उदाहरणार्थ आई. मग मुलं आई काय काय कामं करते ते सांगतात. शब्द , शब्दातून वाक्य, त्यातून छोटे निबंध करायला मुलं शिकतात. भाषेची ओळख त्यांना ऐका-बोला-करा-वाचा-लिहा या प्रकारे करून दिली जाते.”

आपल्याकडे खूप कमी घरांमध्ये वाचनसाहित्य असतं. ग्रामीण भागात तर २० टक्कयांपेक्षाही कमी घरांत वाचनसाहित्य आढळतं. हे लक्षात घेऊन ‘प्रथम’ने विशेष पुरवणीवाचन साहित्य विकसित केलं आहे. ‘रीड इंडिया’ परिणामकारक ठरतो आहे. संस्थेनंच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार उपक्रमात शिकलेल्या 75%मुलांना न अडखळता उत्तम वाचता येतं. 2014-15 च्या शैक्षणिक वर्षात पाच लाख मुलं ‘रीड इंडिया’त सहभागी झाली होती. शिक्षककार्यकर्त्यांची मोठी फळी ‘प्रथम’ने गावोगावी तयार केली. शिकण्याच्या प्रक्रियेत बदल घडवला.
‘प्रथम’कडून प्रेरणा घेत राज्य सरकारं आणि एनजीओंनी विविध उपक्रम सुरू केले. गुजरातमध्ये गुणोत्सव, पंजाबमध्ये प्रवेश, महाराष्ट्रात वाचन-लेखन प्रकल्प. पंजाबने 2015 पासून आपल्या शाळांमध्ये प्रथमचं मॉडेल अंगिकारलं आहे.
१९९५पासून ‘प्रथम’ शिक्षणक्षेत्रात कार्यरत असून भारतातल्या २१ राज्यांमध्ये संस्थेचं कार्य चालतं.


- सोनाली काकडे – समता रेड्डी.

No comments:

Post a Comment