Monday 23 January 2017

मिळाला मायेचा हात


जन्मतःच एचआयव्हीनं बाधित, त्यातच माता-पित्याचं छत्र हरवलेलं आणि समाजाकडून मिळणारी तिरस्कारयुक्त वागणूक हे या मुलाचं आयुष्य. त्यातून एकीकडे मृत्यूशी झुंज द्यायची. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण असा नाहीच. पण, या मुलांच्या आयुष्यातही परभणीतल्या काही जणांनी परिवर्तन घडवून आणलं आहे. 
एखादयाला एचआयव्ही आहे असं कळताच लोक त्याच्यापासून दूर राहतात, एवढेच नव्हे तर त्याच्यासोबतचे संबंध तोडून टाकतात. अगदी नातेवाईकही अशा मुला-मुलींशी संबंध ठेवत नाहीत. अशी ८ मुले व ७ मुलींचे परभणीकरांनी पालकत्व स्वीकारून ८ वर्षापासून त्यांचा सांभाळ केला आहे.
 होमिओपॅथिक अकादमी फॉर रिसर्च आणि चॅरिटीजचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक व त्यांच्या पत्नी डॉ.आशा चांडक यांनी २००८ पासून विविध उपक्रम राबवले आहेत. सुख-सुविधांपासून वंचित राहिलेल्या बालकांना त्यांचे हक्क मिळवून दिले आहेतच. शिवाय, शिक्षणाचा गंधही नसलेल्या या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेशही मिळवून दिला, हे विशेष.
परभणी शहरातील एका बालगृहात आधी ही एचआयव्ही बाधित मुले राहत होती. पण तिथे कुठल्याही प्रकारच्या सुविधा मुलांना मिळत नव्हत्या. त्यामुळे बालकांचे प्रचंड हाल होत असत. निकृष्ट आहार, अस्वच्छता व दूषित पाण्यामुळे त्यांचे आरोग्यही धोक्यात आले होते. अशा परिस्थितीत डॉ.चांडक यांचा या बालगृहाशी योगायोगाने संबंध आला आणि बालकांच्या आयुष्यात बदल घडण्यास सुरूवात झाली.
याविषयी बोलताना डॉ.पवन चांडक म्हणाले की, बीएचएमएस अभ्यासक्रमातील संशोधनाचा भाग म्हणून ‘होमिओपॅथिक औषधींचा एड्स बाधितांवरील परिणाम’ अभ्यासताना बालगृहातील समस्या आमच्या ग्रुपने जाणून घेतल्या. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांबरोबरच आरोग्याची कुठलीही सुविधा तेथे उपलब्ध नव्हती. या मुलांच्या औषधोपचारासाठी शासकीय रूग्णालयांत एआरटी सेंटर सुरू आहेत. पण तेवढयाने भागणार नाही ही बाब लक्षात घेऊन आम्ही बालकांना निरनिराळया प्रकारची मदत करायला सुरूवात केली. सण-उत्सवाच्या माध्यमातून या मुलांना समाजासोबत मिसळण्याची संधी उपलब्ध करून दिली. होमिओपॅथिक अकादमीने वॉटर फिल्टर, बेड, पांघरूण, मच्छरदाणी, शैक्षणिक साहित्य, कपडे, गणवेश आणि दैनंदिन वापराच्या वस्तू पुरविल्या. 
बालगृह ते शाळा आणि कधी दवाखाना असेच या बालकांचे जीवन होते. योग साधना केंद्राचे डॉ.दीपक महिन्द्रकर यांनी त्यांना योग शिबीर व सहलीसाठी कधी उद्यानात तर कधी त्रिधारा-नवागड येथे नेले. डॉ.पवन चांडक यांची बालगृहातील मुला-मुलींशी जवळीकता वाढल्यानंतर संस्थाचालकाचे अनेक गैरव्यवहारही समोर येऊ लागले. बालकांच्या नावाने येणारे अनुदान लाटण्याबरोबरच बोगस कर्मचारी दाखवून शासनाची फसवणूक होत असल्याचा गंभीर प्रकारही उघकीस आला.
दरम्यान, डॉ.चांडक यांनी माहितीचा अधिकार वापरून बालकांच्या पिळवणुकीविरूध्द आवाज उठवला तसेच त्यांना अन्य ठिकाणी स्थलांतरीत करावे, अशी विनंती बालकल्याण समितीकडे केली. समितीचे डॉ.इंद्र ओस्तवाल, डॉ.उत्तमराव वानखेडे यांच्या प्रयत्नांमुळे अखेर 14 बालकांना लातूर-हासेगाव येथील रवि बापटले यांच्या सेवालय संस्थेत स्थलांतरीत करण्यात आले. तेव्हापासून डॉ.पवन चांडक व त्यांचे सहकारी दर महिन्याला नियमितपणे सेवालय संस्थेला भेट देतात. आपली पालकत्वाची जबाबदारी आत्मियतेने पार पाडत आहेत.
बाळासाहेब काळे

No comments:

Post a Comment