Sunday 29 January 2017

विद्यार्थिनींसाठी विशेष बससेवा: मलकापूर पॅटर्न



दिल्लीमध्ये २०१२ साली ‘निर्भया दुर्घटना’ घडल्यावर सार्वजनिक वाहनाने प्रवास करणार्‍या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला. देशभर दाटलेली अस्वस्थता सातारा जिल्ह्यातलं छोटं शहर मलकापूरही अनुभवत होतं. खरं तर अशा घटना घडतात आणि विस्मरणातही जातात. आणि मुलींचा सुरक्षित प्रवास हा मुद्दा उरतोच. पण मलकापूर नगरपरिषदेने समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला आणि मुलींसाठी सुरक्षित बससेवा सुरू करून आदर्शच घालून दिला.
‘निर्भया दुर्घटने’नंतर मुलींच्या सुरक्षित प्रवासाचा विषय आमसभेत चर्चेला आला तेव्हा अनिता यादव या नगरसेविकेने मुलींसाठी बससेवेची कल्पना मांडली. मुलींना एकएकटं शाळा-कॉलेजला जावं लागणार नाही आणि मुलींची शाळेतली उपस्थितीही वाढेल असा यामागचा विचार. मलकापूर नगरपरिषदेचे अभ्यासू, कल्पक उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून योजनेला आकार दिला. 
एसटी बसप्रवासासाठी मुलींना पन्नास टक्के सवलत होतीच. उर्वरित पन्नास टक्के नगरपरिषदेने स्वतःच्या महिला-बालकल्याण निधीतून द्यायचं ठरवलं. एसटी महामंडळाचे तेव्हाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनीही साथ दिली. दोन बसेस राखून ठेवल्या गेल्या. मेळावे घेऊन लोकांना, विशेषत: महिलांना विश्वासात घेतलं आणि ८ जुलै २०१३ ला ‘प्रेमलाताई चव्हाण कन्यासुरक्षा अभियाना’अंतर्गत बससेवेचा शुभारंभ झाला. तेव्हापासून ही सेवा अविरतपणे सुरू आहे.
सकाळी ६.३० ते संध्याकाळी ७.३० या काळात दर अर्ध्या तासाने ही बस मुलींच्या दिमतीला असते. बसमध्ये कंडक्टरही महिलाच नेमल्या आहेत. त्यामुळे शिक्षणासाठीचा प्रवास आनंददायी आणि तणावरहित होतो, असं मुली सांगतात. मुख्य म्हणजे मुलींची गळती जवळपास शून्यावर आली आहे.
शाळा-कॉलेजं सुरु व्हायच्या एक महिना आधी नगरपरिषद पुढील शैक्षणिक सत्राच्या प्रवासखर्चाची पूर्ण रक्कम एसटी महामंडळाकडे जमा करते. कुटुंबांची, मुलींची, त्यांच्या शाळा-कॉलेजची माहिती जमा केली जाते. त्यानंतर एसटी पासेस दिले जातात. यासाठी वर्षाला जवळपास सात लाख खर्च येत असल्याचं मलकापूर नगरपरिषदेचे जनसंपर्क अधिकारी ज्ञानदेव साळुंखे यांनी सांगितलं. प्राथमिक शाळांपासून कॉलेजात जाणार्‍या मलकापूरमधल्या सुमारे १ हजार विद्यार्थिनी या सेवेचा लाभ घेत आहेत. दिवसेंदिवस लाभार्थी मुलींची संख्या वाढत आहे.
मलकापूर शहर आणि परिसरातील काही महाविद्यालयांना जाण्यासाठी थेट सोय नव्हती. त्यामुळे बाहेरगावावरून येणाऱ्या बसने मुलींना जावं लागायचं. विशेष बससेवा सुरू झाल्याने आणि थोड्या-थोड्या अंतरावर बसथांब्याची सोय केल्यामुळे मुलींना घरापासून केवळ पाचच मिनिटांच्या अंतरावर बस मिळू शकते. बससेवेचा मुख्य फायदा झाला गरीब कुटुंबांना. एरवी कॉलेजपर्यंत जाण्या-येण्यासाठी रोज होणारा ८० रु. खर्च या सेवेमुळे वाचला. पूर्वी कित्येक पालक मुलींना सोडा-आणायला येत. पालकांचा तो वेळ आणि खर्चही वाचला. त्यामुळे आता पालकही निश्चिंत झाले आहेत.
मलकापूर हे माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांच्या मतदारसंघातलं शहर. गेल्या महिन्यात आम्ही त्यांना भेटलो होतो तेव्हा त्यांनी हा बससेवेचा उपक्रम कोणत्याही छोट्या शहराला करता येण्याजोगा असल्याचं आग्रहपूर्वक म्हटलं होतं. आंध्रप्रदेशातली एक नगरपरिषद लवकरच अशी बससेवा सुरु करणार असल्याचं समजतं. महाराष्ट्रातल्या नगरपरिषदाही मलकापूरपासून प्रेरणा घेतील का?
- वर्षा जोशी-आठवले

No comments:

Post a Comment