Sunday 29 January 2017

प्लास्टिक पुनर्वापराचे धडे


जिल्हा चंद्रपूर. ताडोबा व्याघ्रप्रकल्पाजवळचं मोहुर्ली वनक्षेत्रातलं भामडेळी हे आदिवासी गाव. प्रकल्पाला लागून असल्यामुळे गावपरिसरात पर्यटकांची सतत वर्दळ. आणि त्यामुळेच तयार झालेली मोठी समस्या प्लास्टिक कचर्‍याची. पर्यटक येताना पाण्याच्या बाटल्या आणतात आणि नंतर तिथेच त्या टाकून निघून जातात. त्यामुळे परिसरात ठिकठिकाणी प्लॉस्टिक बाटल्यांचे ढिगारेच झालेले. हे सगळं बघूनच विजय खनके अस्वस्थ झाले. गावातल्या जिल्हापरिषदेच्या शाळेतले ते तरूण शिक्षक. २१ विद्यार्थ्यांचा पट असलेली, पहिली ते चौथीपर्यंतची ही त्रिशिक्षकी शाळा. सध्या दोनच शिक्षक काम करताहेत.
भामडेळी हे चंद्रपूर औष्णिक प्रकल्पातल्या स्थलांतरितांचं पुनर्वसित गाव. अवघी ३०० वस्ती. पण परिसरात असणाऱ्या २०- २५ रिसॉर्ट्समुळे इथे गर्दी आणि त्यामुळेच प्लास्टिक कचराही कायमच. प्लास्टिक बाटल्या, पिशव्या आणि खर्रापन्नीचा (तंबाखू/गुटखा) कचरा सतत बघून चंद्रपुरातल्या पर्यावरणगटांसोबत काम करणारे विजय खनके अस्वस्थ झाले. या कचर्‍यापासून काय करता येईल या विचारातून त्यांच्या पुढाकाराने सुरू झालं ‘प्लास्टिकमुक्त मोहुर्ली’ अभियान.
जूनमध्ये शाळा सुरू झाल्याबरोबर खनके यांनी शाळेत ‘प्लास्टिक कचरा संकलन केंद्र’ सुरू केलं. आधी विद्यार्थांना बरोबर घेऊन परिसरात विखुरलेल्या प्लास्टिक बाटल्या गोळा केल्या. आसपासच्या रिसॉर्ट मालकांशी बोलून आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रेस्ट हाऊसला भेट देऊन तिथल्या प्लास्टिक बाटल्या शाळेच्या प्लास्टिक कचरा संकलन केंद्राला देण्याची विनंती केली़. प्लास्टिक कच-यामुळे होणा-या प्रदूषणाच्या गंभीर समस्येची त्यांनी लोकांना जाणीव करून दिली. काही दिवसांतच शाळेच्या प्लास्टिक कचरा संकलन केंद्रामध्ये तब्बल सात हजार प्लास्टिक बाटल्या, दुचाकी, चारचाकी वाहनांचे टायरही गोळा झाले़.
या टाकाऊ वस्तुनांच आता वेगळा आकार देणं, त्यांचा पुनर्वापर करणं महत्त्वाचं होतं. मग खनके यांनी प्लास्टिकपासून शाळेतील झाडांना आकर्षक कुंपण तयार केलं. शाळेतच एक कुटी तयार केली आणि या कुटीच्या सभोवती बाटल्यांचा उपयोग करून मनीप्लांटचे टांगते वेल लावले. तर काही बाटल्यांपासून कठडा तयार केला. टायरपासून झाडांना कुंपण, मुलांना बसण्यासाठी बाकं केली. सायकलच्या टायरपासून झोपाळे बनवले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसोबत ग्रामस्थांनीही या मोहिमेत भाग घेतला.
भामडेळी जि.प. प्राथमिक शाळेचं हे प्लास्टिक कचरा पुनर्वापर मॉडेल आता चंद्रपूर जिल्हा परिषदेने स्वीकारलं आहे. आणि जिल्ह्यातील अन्य शाळांमध्येही प्लास्टिक कचरा संकलन केंद्र सुरु करण्याचं ठरवलं आहे.
शालेय शिक्षणाबरोबरच पर्यावरणाच भान देणारे, जागरूक करणारे विजय खनकेंसारखे शिक्षक विरळाच. प्लास्टिक प्रदूषणाची समस्या व्यापक आणि गंभीर असली तरी खनके या कृतीशील शिक्षकाने त्यातून आपल्या शाळेपुरता, गावापुरता मार्ग काढला आणि विद्यार्थांनाही त्यात सहभागी करून घेतलं. हेच या उपक्रमाचं यश आहे.
अलिकडेच जिल्ह्याचे आमदार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार मोहुर्लीला गेले होते. तिथे त्यांना भामडेळीच्या शाळेतल्या या अभिनव उपक्रमाविषयी कळलं. मग त्यांनी गावाला आवर्जून भेट दिली आणि या उपक्रमाचं कौतुक केलं. 
खनके सर आता जंगल परिसरातल्या सर्वच शाळांत हे मॉडेल सुरू व्हावं आणि या शाळा पर्यावरणस्नेही व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत. प्लास्टिकबाबत तर सतत ते विचार करत असल्याचही जाणवतं. आपण जे प्लास्टिक फेकून देतो त्यातून विज्ञानविषयक प्रयोग करता येतील, यासाठी त्यांनी इंटरनेटवरून काही व्हिडीओ घेऊन ठेवले आहेत.
प्रयोगशील शिक्षक हे बिरूद मिरवावं ते या शाळेतील शिक्षकांनी. शाळेची इमारत बरीचशी कच्ची, कधीही पडेल अशा अवस्थेत आलेली आहे. अशा ठिकाणी मुलांना बसवायचं तर धोका आहेच. याबाबत शासनाशी त्यांचा पत्रव्यवहार चालूच आहे. पण होईल दुरुस्ती... म्हणून शिक्षक थांबले नाहीत. तर त्यांनी मार्ग काढला. शाळेचं बाहेरच आवारच त्यांनी असं बदलून टाकलं की त्या परिसराचीच शाळा झाली. शाळेची बाहेरची भिंत फळा झाली, एका भिंतीवर रेल्वेतून गणितं आली तर दुसरीकडे प्राण्यांबरोबर मुळाक्षरं आली. एबीसीडी तर जमिनीवर अवतरली. विशेष म्हणजे ही सगळी चित्रं शिक्षकांनी स्वतः रंगवली आहेत.
आज इथल्या मुलांना खरोखरच हसत-खेळत आणि पर्यावरणस्नेही शिक्षण मिळत आहे.
खनके यांचा मोबाईल क्र. ७७४४०९७१४५ / ७६२०७३४६१५


- प्रशांत देवतळे

No comments:

Post a Comment