Sunday 29 January 2017

‘दिशा’ देते जगण्याचे बळ

रात्रीच्या अंधारात गावकुसाबाहेरील ती वस्ती जागी होते.. मद्यधुंद माणसांची तेथे ये-जा सुरू राहते.. कुठे आक्रोश तर कुठे हास्यांची मोठी लकेर.. शिव्यांची लाखोली तर दुसरीकडे पैशांची बरसात, दिव्यांच्या रोषणाईत तिथला हा कोलाहल सहज झाकला जातो. सर्वसामान्य नागरिक या वस्तीचे वर्णन ‘रेडलाईट एरिया’ असं करतात. काळानुरूप वस्ती बदलत असली तरी तेथील समस्या, विवंचना, आरोग्याचे प्रश्न यासह मुलांचे शिक्षण, निराधार वयोवृध्द महिलांना आवश्यक रोजगार असे प्रश्न आजही कायम आहेत. या वस्तीसाठी ‘प्रवरा मेडिकल ट्रस्ट’ने एक पाऊल पुढे टाकले. संस्थेच्या प्रयत्नातून येथील महिला हक्कसजग झाल्या. आणि दाद मागण्यासाठी जिल्हा परिसरातील वारांगनांनी एकत्र येत ‘दिशा’ची स्थापना केली. 
या संस्थेच्या माध्यमातून वारांगनांच्या विविध प्रश्नांवर सरकारदरबारी पाठपुराव्यासह अन्य काही महत्वपूर्ण प्रश्नांवर काम सुरू आहे. इतर काही शहरांप्रमाणे नाशिक मधील गंजमाळ, भद्रकाली परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांचा वावर खुलेआम होता. अश्लिल शेरेबाजी, हावभाव करत ग्राहकांना आपल्या जाळ्यात खेचायचे, त्यांच्याकडील मौल्यवान सामान काढून घेत त्याला हाकलून द्यायचे असा शिरस्ता. त्यातील काही महिला हा व्यवसायही प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र काही अपप्रवृत्तीमुळे ही वस्ती बदनाम होत राहिली. पोलीसांनीही मग या वस्तीवर दंडेलशाही करण्याचा प्रयत्न केला. अशा स्थितीत प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या सहकार्याने येथे देहविक्री करणाऱ्या महिला, समलिंगी संबंध ठेवणारे महिला व पुरूष, तृतीय पंथी यांच्यासाठी काम करणारी समन्वयक संस्था उभी राहिली. पहिल्या टप्प्यात प्रवराने देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी काम सुरू केले. या महिलांच्या अडचणी, त्यांची वागणूक, त्यांचे राहणीमान, आरोग्य, कुटुंबातील इतर माहिती असे सर्वेक्षण करत त्यांच्या वस्तीत जात त्यांच्याशी संवाद साधला. अर्थातच यासाठी संस्थेच्या आसावरी देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या वस्तीत कित्येक फेऱ्या माराव्या लागल्या. मात्र ही माणसे आपल्या हिताचे सांगत आहे हे शहाणपण वस्तीतल्या ‘मालकिणीला’ समजलं. मग मालकीण आणि तेथील काही महिलांनी संस्थेला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. यामुळे संस्थेचे काम थोडे सोपे झाले. 
संस्थेने या सर्व महिलांना एकत्रित करत ‘दिशा’ या बहुउद्देशीय संस्थेची उभारणी केली. संस्थेसाठी काम करणाऱ्या कार्यकारणीची निवड या महिलांमधूनच करण्यात आली. आपल्यावरच्या जबाबदारीचे भान कार्यकारिणीला असल्याने ‘दिशा’ने प्रवरासोबत अनेक प्रश्नांवर काम करण्यास सुरूवात केली. या महिलांना शिधापत्रिकांसह अन्य काही महत्वपूर्ण कागदपत्रे मिळावीत, वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ यातील गरजू महिलांना मिळावा यासाठी संस्था सातत्याने पाठपुरावा करत आहे. येथील महिलांच्या आरोग्यासाठी, त्यांना एड्स, एचआयव्ही यासह अन्य काही सांसर्गिक आजार होऊ नये यासाठी त्यांची नियमित तपासणी केली जाते, त्यांना कंडोमचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्राहकांची लूटमार करायची नाही हा इथला नियम झाला आहे. मुलांवर या वस्तीचे सावट पडू नये यासाठी त्यांना जिल्ह्यातील निवासी आश्रमशाळा, समाजकल्याण विभागाच्या काही योजनांच्या माध्यमातून वसतीगृहामध्ये पाठविण्यात आले आहे. या प्रयत्नातून १५हून अधिक बालके शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात पोहचली आहेत. लहान बालकांसाठी संस्थेच्या आवारात ‘पाळणाघर’ सुरू करण्याचा मानस आहे. त्याची जबाबदारी वस्तीतील निराधार महिलांवर देण्यात आली आहे.
ज्या महिलांना हा व्यवसाय सोडून चारचौघींसारखा संसार करायचा त्यांच्यासाठी वधुवर संस्था सुरू केल्याने एकीच्या संसाराला सुरूवात झाली आहे. फिनाईल, नीळ बनविणे, अत्तर तयार करणे अशा प्रशिक्षणातून त्यांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी करण्यासाठी दिशा व प्रवरा प्रयत्नशील आहेत. या काळात पोलीसांशी संवाद साधल्याने पोलीसही त्यांना सहकार्य करत आहे.
- प्राची उन्मेष

No comments:

Post a Comment