Friday 20 January 2017

रेकॉर्ड ब्रेक श्रमदानामुळे नदीचे पुनरुज्जीवन


कुठलही काम लोकांनी आपल मानून केलं की ते यशस्वी होत आणि त्यातून इतरांनाही योग्य दिशा मिळते. हेच घडलं अंबाजोगाई इथं. एकीकडे दुष्काळाचा सामना करायचा होताच. तेव्हाच अंबोजोगाई येथील ‘मानवलोक’ या स्वयंसेवी संस्थेने गावातल्या लोकांना विश्वासात घेऊन जलयुक्त शिवार या योजनेचं काम हाती घेतलं. 
कोणतीही सरकारी मदतीची अपेक्षा न करता मानवलोक व ग्रामस्थांनी स्वखर्चातून बीड जिल्ह्यातील पाटोदा, देवळ आणि पळसखेडा या गावात जलसंवर्धनासाठी होळना नदी, उपनद्या व ओढ्यांचे खोलीकरण, रुंदीकरण आणि सरळीकरणाचे काम यशस्वी करून दाखविले आहे.
दुष्काळाचा सामना करण्यासाठी तसेच जातीभेद, पंथभेद, राजकारण सोडून पाणीदार गाव करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने एकत्र आले. सुमारे २५०० लोकांनी एकत्र येऊन नदीच्या पुनरुज्जीवनासाठी श्रमदानाचा एक विक्रमच केला. या शिवाय पाटोदा ग्रामस्थांनी श्रमदानातून जवळपास २२० हेक्टर बांध बंधिस्ती, ६०० शोषखड्डे आणि ४००० वृक्षारोपणाचे खड्डे अशी अनेक कामे केली गेली. याच काळात गावातील काही युवकांनी अखंड श्रमदानाचा निश्चय केला आणि गेल्या अनेक दिवसांपासून चोवीस तास आळीपाळीने श्रमदान केले.
गावातील प्रतिष्ठांपासून सामान्य कष्टक-यांपर्यंत सर्वांनी एकत्र येऊन श्रमदान केले. मे महिन्यात एका आठवड्यात तर २५०० लोकांनी श्रमदानात सहभाग घेतला. ख-या अर्थाने लोकचळवळ उभी राहिली. यासाठी ‘मानवलोक’चे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी लोकांमध्ये समन्वय घडवून आणला. पाटोदा शिवारातील २८ किमी लांब असलेल्या होळना नदीच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम श्रमदानातून १० किमीपर्यंत झाले आहे. शिवाय या नदीला जोडणारे सुमारे ८ किमी नाल्यांचेही खोलीकरण पूर्ण केले आहे.



या सर्व कामांसाठी २ कोटींचा अपेक्षित खर्च होता, त्यापैकी ५० लाख रूपयांचा निधी लोकसहभागातून जमा झाला तर उर्वरित १.५० कोटींचा निधी मानवलोक संस्था खर्च करीत आहे. या कामात पारदर्शकता आणण्यासाठी गाव कमिटी, लोकसहभागाचे स्वतंत्र बँक खाते, ग्रुपवर दररोजचा जमा-खर्च टाकला जातो. त्यामुळे या या कामाबाबत लोकांचा विश्वास वाढला. नदी, ओढ्यांचे खोलीकरणाचे काम करीत असताना काही बाबींची काळजी घेण्यात आली. त्यामध्ये दोन मीटरपेक्षा खोलीकरण करण्यात आले नाही, रुंदीकरण करीत असताना दोन्ही बाजूच्या शेतक-यांनी आपापले अतिक्रमण काढून नदीची पूर्व स्थिती कायम ठेवली. नदीपात्रातून निघालेल्या मातीतून नदीच्या दोन्ही बाजूंनी रस्ते तयार करण्यात आले. या कामाच्या निमित्ताने लोकांना पावसाच्या पडणा-या पाण्याचे व्यवस्थापन तसेच त्याचा ताळेबंदही शिकविण्यात आला. या सगळ्या कामांतून पाटोदा, देवळ आणि पळसखेडा ही गावे पाणीदार होतील आणि येथील लोक पाण्याचे योग्य नियोजन करून भविष्यातील पाणीसंकटावर मात करतील, हे निश्चित. होळना नदी पुनरुज्जीवनाच्या कामाला खा. सुप्रिया सूळे, महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी देऊन कामाचे कौतुकही केले.
- शिवाजी कांबळे

No comments:

Post a Comment