Monday 23 January 2017

लहानशी ‘फी जमवूया’ मोहीम



हर्षदा ही आमच्या भागातल्या भाजीवाल्या मावशींची १९ वर्षांची मुलगी. वडील काही वर्षांपूर्वी वारले. आई, एक बहीण आणि एक भाऊ असं छोटंसं कुटुंब. आईच्या अगदी तुटपुंज्या भाजीविक्रीच्या पैशातून घर चालतं. काही दिवसांपूर्वी हर्षदाच्या मावशीने (त्या पण भाजी विक्री करतात) विचारलं, “ताई, हर्षदाचं कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे. फी भरायची आहे. काही मदत होऊ शकते का ? १६ हजार रु. ची गरज होती. तशी रक्कम एकदम कमी नव्हती. पण जास्तही नव्हती. ही मी हर्षदाला भेटायला बोलावलं. ती लगेच तिचं आधार कार्ड, आधीच्या गुणपत्रिका वगैरे घेऊन भेटायला आली. (तसं घेऊन यायला मी तिला फोनवर सांगितलं होतं) सर्व नीट पाहून मी तिची माहिती आणि तिला मदत हवी आहे, असं आवाहन करणारा छोटासा संदेश माझ्या मित्रमंडळीना whats app वर पाठवला. सोशल मिडियाचा केला तर चांगला पण उपयोग होऊ शकतो, याचा प्रत्यय आला. माझ्या पैशांसह अगदी ५-६ दिवसात पूर्ण रक्कम जमली. सोशल मिडिया झिंदाबाद !!
माझी Success mantra ही placement agency आहे आणि आपल्या परीनं समाजाचं देणं देण्याच्या माझ्या प्रयत्नांचं ते माध्यमही आहे. अल्प उत्पन्न गटातल्या मुलामुलींना मी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करत असते. ज्याला मदतीची गरज आहे आणि ज्याला मदत करायची आहे त्यांच्यासाठी हे माध्यम बनतं, समन्वयाचं काम करतं. सांगायचा मुद्दा हा की हर्षदाच्या मदतीसाठी मित्रमैत्रिणींनी पैसे दिले. यात कोणी शेजारी होते, कोणी माझ्या क्लासेसचे शिक्षक होते, कोणी माझ्या शाळेतल्या मैत्रिणी होत्या. सर्वानी मनापासून या लहानशा ‘फी जमवूया’ मोहिमेला मदत केली.
हर्षदाच्या महाविद्यालयाच्या नावाने demand draft तिच्या हाती देताना मनात एकच विचार होता की पुढच्या वर्षी ती पदवीधर होइल. पैशाअभावी तिला शिक्षण अर्धवट सोडावं नाही लागणार. तिने दहावीत पहिला वर्ग, बारावीत दुसरा वर्ग मिळवला आहे. टायपिंग आणि कॉम्पुटर पण केलं आहे.
दोन्ही वेळा मुसळधार पावसात ती मला भेटायला आली. खूप पाऊस आहे, उद्या येऊ का असं चुकूनही विचारलं नाही. हर्षदाला भेटल्यावर भावलं ते... तिची शिक्षण घेण्याची जिद्द, परिस्थितीचे रडगाणं नाही की लाचारी नाही!
जाता जाता.. एका मैत्रिणीशी बोलताना हर्षदाचा विषय निघाला. तिच्यासाठी एखादी पार्ट टाईम नोकरी शोधण्याविषयी बोलले. मैत्रीण लगेच म्हणाली, “अगं दे तिचा resume.. आमच्या इथे ५-६ महिन्यांसाठी नक्की होईल.. प्रयत्न करते. मग तिची परीक्षा झाल्यावर पुढचं बघता येईल...!"
आपल्या दुनियेत माणुसकी आहे, यावरचा विश्वास पक्का व्हायला अजून काय हवं?
मेघना धर्मेश

No comments:

Post a Comment