Sunday 29 January 2017

चाकं शिक्षणाची प्रगती बालकांची


नाशिक शहर परिसरातील एका वाचनवेड्या युवकाने स्वामी विवेकानंदाच्या विचाराने प्रेरित होणे, ‘स्वदेस’ चित्रपट पाहाणे, मार्गदर्शकाशी चर्चा करणे आणि यातून बालकांसाठी एका उपक्रमाची निर्मिती होणे – हे जाणून घ्यायलाच हवे. 
नाशिकचे सचिन जोशी यांना पहिल्यापासून शिक्षणाची आवड. परिक्षेपुरते शिकण्यापेक्षा मुलांमध्ये शालेय वयातच संशोधक वृत्ती विकसीत व्हावी, भाषेपासून विविध भौतीक-वैज्ञानिक, गणितीय संकल्पना विद्यार्थ्यांना समजाव्यात यासाठी त्यांनी ‘इस्पॅलियर स्कुल’ची स्थापना केली. या शाळेत महात्मा गांधींनी विकसित केलेल्या ‘नयी तालीम’ या शिक्षणपद्धतीशी मिळताजुळता असा कौशल्याधारित अभ्यासक्रम शिकवण्यावर भर राहतो. सुताराचे काम पहायचे असेल तर त्यांच्या शाळेत सुतारकामासाठी लागणारे साहित्य असलेले दालन असून विद्यार्थ्यांना त्याचे प्रात्यक्षिकही दाखविले जाते. शिशु वर्गाला प्राणी-पक्ष्यांची ओळख करून घेण्यासाठी घोडा, हत्ती, गाय, बैल, उंट यासह काही निवडक पक्ष्यांची सफर शाळेला नवी नाही.
असे विविध प्रयोग करून बघणार्‍या सचिनच्या वाचनात विवेकानंदाचे एक वाक्य आले - ‘जर गरीब मुलगा शाळेपर्यंत जाऊ शकत नाही, तर शाळेने त्याच्यापर्यंत जावे’. हे प्रत्यक्षात कसे उतरवता येईल याचा विचार सुरू असतांना त्यांनी ‘स्वदेस’ चित्रपटात व्हॅनमधून ‘फिरती शाळा’ पाहिली. मग सचिनने त्याला गुरूस्थानी असलेले माजी पोलीस अधीक्षक भीष्मराज बाम यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ‘चाकं शिक्षणाची’ हा उपक्रम आकारास आला. लक्ष्यगट ठरला शहरातील झोपडपट्टी परिसर. व्यसने, गुन्हेगारी अशा गैरप्रकारांत अडकण्याची जास्त शक्यता असलेल्या इथल्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘चाकं शिक्षणाची’ शहरात वेगाने फिरू लागली.

एक शैक्षणिक सुविधांनी सज्ज बस वस्ती, झोपडपट्टी परिसरात जाते. कार्यकर्ते मुलांना गोळा करतात. प्रत्येक वस्तीत एक-दोन तास वर्ग चालतात. त्यांना गणित, विज्ञान व इंग्रजी विषय प्राथमिक पातळीवर शिकवले जातात. मुलांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी शैक्षणिक, मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात येतात. घराच्या उंबऱ्यापाशी शिक्षण आले तरी काही पालकांकडून मुलांना शिक्षणासाठी आडकाठी केली जाते. अशा पालकांचे समुपदेशनही केले जाते. हे काम करतानाच शाळेत न जाणाऱ्या, सरकारी शाळेत जाणाऱ्या, झोपडपट्टीत बांधकामावरील मजुरांच्या मुलांना शिकवणारे कार्यकर्ते तयार झाले आहेत. यंग एज्युकेशनल सोसायटी (‘यस’), राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प आणि शिक्षण मंडळ एकत्रितपणे प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी दोन वस्त्यांची निवड करतात. संस्थेने मागील वर्षी एका उपक्रमांतर्गत ८५० शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणमंडळाच्या सहकार्याने महापालिका शाळेत दाखल केले. मुलांना शाळेत दाखल करण्यापुरती भूमिका मर्यादित न ठेवता वंचित मुला-मुलींचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारण्यात आले. संस्थेने आतापर्यंत ११८ मुलामुलींचे पालकत्व घेतले असून काही बालकांना शाळेत ने-आण करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रायोजकांच्या सहकार्याने हे काम केले जात असून ‘चाकं शिक्षणाची’ उपक्रमाने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीने वेग घेतला आहे. प्रत्येक शहरात आणि गावात एखाद्या सामाजिक संस्थेने हा उपक्रम राबविला आणि त्यांना नागरिकांनी साथ दिली तर एकही बालक हे शिक्षणापासून वंचित राहाणार नाही असं सचिन जोशी आग्रहाने सांगतात.
- प्राची उन्मेष

No comments:

Post a Comment