Wednesday 1 February 2017

मेक इन पारधेवाडी

दुर्गम भागात मेडिकल दुकान असेल-नसेल. पण सॅनिटरी नॅपकिन मिळायला हवा, या निग्रहाने छाया काम करते आहे. ‘नवी उमेद’वर सॅनिटरी नॅपकिन्सविषयीच्या पोस्ट्स वाचून छाया काकडेने आमच्याशी संपर्क केला.
पारधेवाडीच्या (ता.औसा, जि.लातूर) मुली-महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स आणण्यासाठी प्रवास आणि वीस-तीस रुपये खर्च करून औशात किंवा लातुरला जावे लागायचे. आज छायाच्या प्रयत्नांमुळे अवघ्या ३० रुपयांत सहा नॅपकिन्सचे पाकिट पारधेवाडीतच मिळते. औसा तालुक्यातील २० टक्के महिला गर्भाशयविकारग्रस्त, बहुतांश विशी-तिशीच्या, मासिक पाळीतील अस्वच्छता, उघड्यावर शौचास जाणे हीच याची कारणे – स्वतःच केलेल्या अभ्यासातले हे निष्कर्ष छायाच्या कामाची प्रेरणा ठरले.
१९९३ साली, किल्लारी भूकंपानंतर १८ वर्षांची छाया समाजकार्यात गुंतली. बाबा आमटेंच्या शिबिरात भाग घेतला. ‘मानवलोक’ची कार्यकर्ती बनली. ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’च्या आरोग्यकार्यशाळेसाठी थेट अमेरिकेला गेली. तिथून नॅपकिन्सनिर्मितीची शास्त्रशुद्ध माहितीही मिळवली.
मासिक पाळीबद्दलची गुप्तता, ग्रामीण भागात मुलींची शाळा थांबण्याचे ते एक कारण, पॉलिएस्टर कापडवापरामुळे नाजुक ठिकाणी इजा होणे, वापरलेले कापड धुण्या-वाळवण्याची, अस्वच्छ पद्धत, पाणीटंचाईमुळे वाढणारी अस्वच्छता, यामुळे होणारा जंतुसंसर्ग....ही साखळी छायाला तोडायची होती. इंजिनियर नवर्‍याची साथ, मानवलोक, सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. देवेंद्रनाथ मिश्रा यांचे सहकार्य मिळाले. छायाने पारधेवाडीत ना नफा-ना तोटा तत्त्वावर ‘रिफ्रेश सॅनिटरी नॅपकीन शुअर स्टार्ट प्रकल्प’ सुरू केला.
रिफ्रेश नॅपकिन्सचा रास्त दरही ज्या मुली-महिलांना परवडत नाही, त्यांना नॅपकिन्स मोफत देण्याची छायाची योजना आहे. देणगीदारांमुळे सध्या ८०० गरीब मुलींना नॅपकीन्स मोफत वाटले जातात. ही संख्या महिन्यागणिक वाढत आहे.
यामागचे अर्थकारण काय? पारधेवाडीच्या युनिटमध्ये २५ लाख भांडवल गुंतवले आहे. ११० रु रोजंदारीवर ३० महिला काम करतात. रोज १ हजार नॅपकिन्स बनतात. एका पाकिटाच्या ३० रु विक्रीमागे २ रुपये सुटतात. पण अमेरिका आणि दुबई इथल्या मैत्रिणी आणि ‘वूमन’सारख्या अमेरिकन संस्था तेच पाकिट ६० ते ७० रु ना विकत घेतात. दरमहा ५ हजार पाकिटे अमेरिकेला पाठवली जातात. त्या नफ्यातून इथे विक्रीकिंमत कमी ठेवता येते. प्रकल्पात २५० महिला मासिक १२०० रु मानधनावर आपापल्या गावात नॅपकिनवापराचा, स्वच्छतेचा प्रसार करतात. महिलांच्या पाळीची संभाव्य तारीख माहीत करून घेऊन चार दिवस आधी तिच्या घरापर्यंत पाकिट पोचवतात. औसा तालुक्यातील ६० गावांमध्ये नॅपकिन वाटपासोबतच मासिक पाळी व संबंधित विषयांची माहिती देतात. महाराष्ट्रातल्या अशा प्रकारच्या या पहिल्याच प्रकल्पाने जाणत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
महाविद्यालयांत सॅनिटरी नॅपकिन्स वेंडिंग आणि डिस्पोजल मशीन्स हवीत या शासन निर्णयाच्या पूर्ततेसाठीही छाया प्रयत्न करते. ही मशीन्स दिल्लीहून मागवून घेते. मशीन्स महाराष्ट्रात मिळाली तर खूपच खर्च वाचेल, असं तिचं म्हणणं.
२०१५ साली प्रकल्पाची जुळवाजुळव करताना लोकांनी अज्ञातून कामाची टवाळी केली. त्याला न जुमानता छायाने मुली-महिलांमध्ये जागृती केली. सॅनिटरी नॅपकीन तयार करण्याबरोबरच नॅपकीनवापराबद्दलची जागृती करून छाया काकडेने एका मोठ्या कामाचा आरंभ केला आहे.

- शिवाजी कांबळे, लातूर

No comments:

Post a Comment