Sunday 26 February 2017

अन्नदात्री ज्योती

ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जिल्ह्यातील कट्यार गावात ज्योती देशमुख यांचं पारंपरिक शेती करणारं एकत्रित कुटुंब. घरी २९ एकर वडिलोपार्जित शेती. घरात पती संतोष आणि मुलगा हेमंत, सासरे पुरुषोत्तम, दीर सुनील, त्याची पत्नी आणि मुलगी असं 'गोकुळा'सारखं कुटुंब. पण २००१ पासूनची सहा वर्ष ज्योतीताईंची सर्वस्व हिरावून घेणारी ठरली. नियतीने या घरावर एकामागून एक आघात केले. 
शेतीतील नापिकीमुळे ज्योती यांचे सासरे पुरुषोत्तम यांनी २००१ मध्ये, शेती आणि व्यवसायातील अपयशामुळे दीर सुनील यांनी २००४ मध्ये आणि या आघातांना तोंड देताना यश न मिळाल्याने पती संतोष यांनीही २००७ मध्ये मृत्यूला कवटाळलं. ज्योती यांच्यावर आभाळच कोसळलं. दहा-बारा वर्षांचा मुलगा हेमंत, दिराची पत्नी आणि मुलगी आणि २९ एकर शेतीसह घराचा गाडा हाकण्याचं आव्हान त्यांच्यासमोर होते. नापिकीचा फेरा संपता संपत नव्हता. दहावीपर्यंत शिकलेल्या, घराचा उंबरठा कधीही न ओलांडणाऱ्या ज्योती यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा निर्णय अनेक आव्हानांनी भरलेला होता. 
शेतीविषयी अज्ञान. हे झेपेल की नाही ही भीती, शेती विकण्यासाठी काहींचा दबाव, धमक्या, एका नातेवाईकाने केलेला शेती हडपण्याचाही प्रयत्न. मात्र, ध्येय निश्चित केलेल्या ज्योतीताईंनी हा खाचखळग्यांचा प्रवास जिद्दीने सुरु ठेवला. त्यांनी शेती कसायला सुरवात केली. हळूहळू शेतीतील बारकावे आत्मसात केले. कापूस, सोयाबीन, तूर या पारंपरिक पिकांच्या साथीने सुरुवात केली. हा भाग मुळात कमी पाण्याचा. त्यातूनही खारपाणपट्टा. तरीही त्यांनी शेतात बोअर घ्यायचं धाडस केलं. बोअरला गोडं पाणी लागलं, वीजही आली. मग बागायती शेती सुरु केली. आता त्या दुचाकीने शेतात जातात. बैलगाडी जुंपण्यापासून शेतातील प्रत्येक काम त्या आता सहज करू लागल्या आहेत. मुलगा हेमंत संगणक अभियंता झाला आहे. त्यांनी आपल्या पुतणीला तिच्या आईसह अकोट इथे शिक्षणासाठी ठेवलं आहे.

शेतीच्या भरवशावरच त्यांनी नवं घर बांधलं. आता लवकरच शेतातील कामासाठी त्या स्वतःचा ट्रॅक्टर घेणार आहेत. अकोल्याच्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ज्योतीताईंचा यशस्वी शेतकरी म्हणून गौरव केला. याशिवाय जिल्हा पोलीस दलानेही त्यांचा 'जननी सप्ताहा'त विशेष सत्कार केला.

- कुंदन जाधव.

No comments:

Post a Comment