Wednesday 1 February 2017

डब्बा गुल !

गाव तामसी, तालुका, जिल्हा वाशिम. सप्टेंबर महिन्यातली एक पहाट. ही रोजच्यासारखी नव्हती. गावकरी जेव्हा डब्बा घेऊन शौचाला निघाले, तेव्हा हागणदारीच्या मार्गावर गावातल्या मुख्य चौकात शाळेतल्या मुला-मुलींची रांग पाहुन अचंबित झाले. रस्त्यावर दोन्ही कडेला साखळी करुन माध्यमिक शाळेतले विद्यार्थी गणवेशात उभे होते. आणि डब्बे घेऊन येणार्यां चं स्वागत टाळ्या वाजवून करत होते. ज्या गावकर्यांाना हा प्रकार उमगला, ते डब्बे फेकून परत गेले. ज्यांना कळलं नाही ते मात्र या विद्यार्थ्यांच्या तावडीत सापडले.
जिल्हा परिषदेच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ कक्षातर्फे हा अभिनव उपक्रम आयोजला होता. तामसी आणि सोनखास ही गावं हागणदारीमुक्त करण्यासाठी या गावांत ‘गुड मॉर्निंग पथका’ने केलेला हा खटाटोप. भल्या सकाळी साडेपाच वाजताच ‘स्वच्छ भारत मिशन’चे कार्यक्रम व्यवस्थापक राजू सरतापे आणि विस्तार अधिकारी विजय खिल्लारे यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं पथक गावात दाखल झालं. विद्यार्थ्यांना तयार रहायला सांगितलं होतंच. मुली महिलांच्या आणि मुलगे पुरुषांच्या गोदरीत गेले. तिथे उघड्यावर शौच करुन परतणार्यांमना त्यांनी शौचालय बांधायची विनंती केली. गावाचं आरोग्य धोक्यात आणू नका, असं सांगितलं. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, गावातल्या अन्य स्वच्छतादूता यांनीदेखील उपक्रमात भाग घेतला.
आपल्याच गावातली मुलं-मुली आपल्याला शिकवत असल्याने खजील झालेल्या अनेक गावकर्यांीनी घरी शौचालय बांधण्याचं आश्वासन देऊन विद्यार्थ्यांच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली.
तामसी गावाची लोकसंख्या ३,७३८ असून गावात ७६५ कुटुंबं आहेत. त्यापैकी सुमारे सुम२०० कुटुंबांनी शौचालयं बांधली आहेत आणि त्याचा ती वापरही करत असल्याची माहिती पथकाच्या तपासणीतून कळली. वर वर्णिलेल्या प्रसंगानंतर आणखी ५० कुटुंब शौचालयबांधणीच्या तयारीलासुद्धा लागली आहेत. वाशिम जिल्ह्यात ७९२ गावं आणि ४८२ ग्रामपंचायती आहेत. जिल्हा परिषदेच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ कक्षातर्फे एकेक करून सर्वच गावांमध्ये असे अभिनव उपक्रम आयोजले जात आहेत.
गाव-वस्त्यांना हागणदारीमुक्त करणं हे ‘स्वच्छ भारत मिशन’पुढचं मोठं आव्हान आहे. शौचालयं बांधणं एक वेळ सोपं आहे, ते मोठ्या प्रमाणात सुरूही आहे. पण लोकांच्या जुन्या सवयी बदलणं महाअवघड. त्यामुळे आधी मुलांमध्ये जाणीवजागृती करावी आणि त्यांच्या मदतीने पालकांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करावा, हे अजमावून बघितलं जात आहे.
- मनोज जयस्वाल.

No comments:

Post a Comment