Monday 27 February 2017

प्रयोगातून शिकणारा नवा शेतकरी

जिल्हा नंदुरबार. तालुका नवापूर. गाव करंजी. डोंगराळ,आदिवासी बहुल परिसर. इथल्याच सुरेश गावित या तरुणाची ही गोष्ट. प्रशासनही सेवा-सुविधा देण्यात मागे पडत असतांना येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतीत बदल घडविण्याचा निर्णय घेतला. पारंपारिक पीकपध्दती, आस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्याला येणारे नैराश्य सुरेश यांनी जवळून अनुभवलेले. वडिलोपार्जित १० एकरपेक्षा जास्त जमिन. घरून शेती कसायचा सल्ला मिळाल्यावर पारंपारिक चौकट मोडत सेंद्रीय शेतीवर त्यांनी भर दिला. यासाठी जवळपासच्या गावात, राज्यात कुठे कुठे सेंद्रीय पध्दतीने शेती होते याचा इंटरनेटच्या मदतीने, कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने अभ्यास केला. त्यानुसार पिके घेण्यास सुरूवात केली. केवळ शेणखत आणि गोमुत्राच्या मदतीने तांदळाचे पीक घेतले. मागील वर्षाच्या तुलनेत खर्च कमी आला आणि पीकही चांगले आले. पण मार्चमध्ये पाण्याची कमतरता जाणवली. मग सरकारी शेततळे योजनेतून प्रश्न सोडवला. यातूनच त्यांना नव्या व्यवसायाची दिशा दिसली. शेततळ्याचा वापर करून त्यांनी शेतीला पूरक अशी ‘मत्स्यशेती’ सुरु केली. 
यासाठी गुजरात येथील खडकी, नंदुरबार जिल्हातील कोळदा येथील कृषी प्रशिक्षण केंद्रात जाऊन रीतसर अभ्यास केला. आणि मत्स्यबीज शेततळ्यात सोडले. मत्स्यबीजाची वाढ कशी होते, हे न समजल्याने पहिले सहा महिने दुर्लक्ष झाले. पण सहा महिन्यानंतर तळ्यात मासे दिसू लागले. मग दिवसातून तीन वेळा मत्स्यखाद्य देण्यास सुरूवात केली. सेंद्रीयवर भर असल्याने भाताची तूस, मका, ज्वारी यापासून तयार केलेले खाद्यच ते माशांना देतात. पहिल्या वर्षी केलेला खर्चही निघाला नाही. घरचे नाराज झाले. पण पुन्हा नव्या जोमाने त्यांनी कॉमन कार्फ, पेंगासी, रघुकोला या जाती आणल्या. यावेळी मात्र यातून दीड लाखांचे उत्पन्न मिळाले. 
दरम्यान, आंतरपीक पध्दतीने भाजीपाल्याची लागवड केली. शेततळ्यातील पाण्यात मत्स्यखाद्य, विष्टा, शेवाळ होतेच. या सेंद्रीय पाण्यावर वांगे, टोमॅटो, तुरीच्या शेंगा, शेवगा अशी पीके घेत बाजूला बांबूची झाडे लावली. एका वाफ्यात झेंडूची बागही फुलवली. आठवडे बाजारात त्याची विक्रीही केली. एकीकडे कांदाही झाला. पण भाव पडले. तरीही खचून न जाता कांद्याचा पाला, शेतातील ओला, सुका कचरा यापासून गांडुळ खत प्रकल्प तयार करून त्याचा शेतीसाठी वापर सुरू केला. 
आज सुरेशने त्याच्या सहकाऱ्यांसोबत व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. त्यातून शेतात सध्या काय सुरू आहे, काय करता येईल याची चर्चा होते. सुरेश म्हणतो, ‘‘घरचे म्हणायचे की पारंपारिक पध्दतीने पीक घ्यावे. सालाबादाला ठराविक उत्पन्न, नफा घ्यावा. काय उपयोग या प्रयोगशीलतेचा? पण माझं ठरलं आहे, पारंपारिक पीकपध्दतीपेक्षा शेतीत वेगवेगळे प्रयोग करून पहायचे. कधी थोडं नुकसान होतं पण त्यातून खूप काही शिकायला मिळतं’’. सुरेशच्या या प्रयोगशीलतेचा प्रशासनानेही गौरव केला आहे.
प्राची उन्मेष.

No comments:

Post a Comment