Friday 3 February 2017

पंचफुलाबाईंची ही गोष्ट

तिचे दिवस भरत आलेले. पतीने कर्जबाजारीपणापायी आत्महत्या केली. पोटात त्याचं बीज अंकुरतंय. पंचफुलाबाईने त्याही अवस्थेत स्वतःला सावरलं. निश्चय केला. हार मानायची नाही. नवऱ्यासारखी माघार नाहीच नाही! बाळाला जन्म द्यायचा, पालनपोषण करायचं. ...
आणि रेखाचा जन्म झाला. माय-लेक, दोघीच एकमेकींचा आधार. घरच्या दीड एकर शेतीत काम, मोलमजूरी सुरू झालं.
रेखा हुशार, तिची शिकायची आवड गावातल्या जि प शाळेतल्या चंद्रकांत कोलपुसे या शिक्षकाने ओळखली. त्यांनी मदत करून तिला बारावीपर्यंत शिकवलं. सीईटीच्या अभ्यासालाही मदत केली. आणि रेखाला चक्क गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तरीही माय-लेकींसमोर प्रश्न होता. पैशाअभावी पोरीचं शिक्षण थांबतं की काय? जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्यापर्यंत हे पोहोचलं. तातडीने पावलं उचलली गेली. लगोलग, 'बळीराजा चेतना अभियान’ निधीतून १६ हजार ८०० रूपयांचा धनादेश महाविद्यालयाच्या नावाने रेखासाठी दिला गेला. आता डॉक्टर होण्याचं तिचं स्वप्न पुरं होणार आहे.
‘बळीराजा चेतना अभियाना’तून अशीच मदत नेर नबाबापूरचे अल्पभूधारक शेतकरी सुभाष गायकवाड यांच्या किरण आणि पूजा या जुळ्या बहिणींना मेडिकलच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी करण्यात आली. या अभियानाने जिल्ह्यातल्या कितीतरी शेतकरी कुटुंबांच्या अडचणींत आधार दिला आहे. 

 यवतमाळच्या शेतकरी आत्महत्या हा संवेदनशील विषय. यवतमाळचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी गेल्या वर्षी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना जगण्याची प्रेरणा, मनोबल देण्यासाठी 'बळीराजा चेतना अभियान' नावाने एक प्रस्ताव तयार केला. विशेष म्हणजे, त्याच महिन्यात झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मान्य झाला. आणि जुलै १५ मध्ये 'बळीराजा चेतना अभियान' सुरुदेखील झालं. 
राजेश खवले यांनी भजन, कीर्तन, भारूड, भागवत कथा या पारंपरिक माध्यमांचा जनजागृतीसाठी चपखल वापर केला. साहित्यिक, कलाकार, विद्यार्थी आणि प्रगतीशील शेतकरी या अभियानाचे 'चेतनादूत' म्हणून प्रबोधन करत आहेत. शेतकऱ्यांच्याच शाळा-कॉलेजात जाणार्‍या मुलांशी संवाद वाढवला.
शेतकरी आत्महत्यांचं बारमाही लोण असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात गेल्या वर्षभरात शेतकरी आत्महत्यांत ४० टक्क्यांनी घट झाली आहे. जाने ते सप्टें १५ या काळात २९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्या तुलनेत २०१६ मध्ये १९० आत्महत्या झाल्या आहेत.
पीक कर्ज, अल्पदरात धान्य पुरवठा, बळीराजा चेतना आठवडी बाजार, पथनाटय, कलापथक, भजन- निबंध- चित्रकला स्पर्धा, सामूहिक विवाह मेळावे ही अभियान लोकांपर्यंत पोचवण्याची माध्यमं आहेत.
जिल्ह्यातल्या शेतक-यांची कुठलीही अडचण सरकारला कळवण्यासाठी पुढील टोल फ्री क्रमांक जिल्हा प्रशासनाने दिले आहेत -
 १०७७ आणि १८००२३३६३६०
- नितीन पखाले

No comments:

Post a Comment