Friday 3 February 2017

पुढाकार अधिकार्‍याचा, सहभाग लोकांचा, कायापालट शाळांचा


परभणी जिल्ह्यातला पूर्णा तालुका. तालुक्यात जि प च्या १११ शाळा, ३८ हजार विद्यार्थी. कुठे शाळा चालू, कुठे बंद. अपुरे अनुदान. सोयीसुविधांचा अभाव. मुलांची प्रगती मंदावलेली. २०१५ पूर्वीची इथली हीच परिस्थिती. 
अशातच एक अधिकारी येतो. आणि हे चित्रच पालटून जातं.
गटशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांची ही कामगिरी. ते अगोदरचे शिक्षक.पाच विषयांत एम ए तसेच एम एड, एम फील असे उच्चशिक्षित.
गेल्या वर्षी भुसारे पू्र्णा पंचायत समितीत रुजू झाले. सुरूवातीलाच त्यांनी तालुक्यातील सर्व शाळांना भेटी दिल्या. त्यांना जाणवले की, अनेक ठिकाणी शिक्षकांमध्येच अनास्था आहे. विद्यार्थी, पालकांच्या अडचणीही त्यांनी समजून घेतल्या. आणि हे चित्र बदलण्याचा निर्धार केला. २०१५मध्ये गांधीजयंतीपासून त्यांनी ‘जागर शिक्षणाचा’ सुरू केला. पालकसंपर्क अभियान, शिक्षकमित्र उपक्रम, महिन्यातून दोनदा गणित आणि इंग्रजी विषयशिक्षकांसाठी चर्चासत्र हे सगळे सुरू केले. यासाठी शासननिधीची तरतूद नव्हती म्हणून स्वखर्चातून उपक्रमांचा श्रीगणेशा केला. हळूहळू ग्रामस्थांचे सहकार्य मिळू लागले. अपुऱ्या अनुदानामुळे शाळांची देखभाल, दुरूस्ती, सुशोभिकरण करणे कठीण आहे, हे लोकांना उमगले. गावात सुविधासज्ज दर्जेदार शाळा हवी तर त्यासाठी वर्गणीही काढायला हवी, यावर एकमत झाले. सुरूवातीला शिक्षकांनी आर्थिक योगदान दिले. नंतर गावागावात प्रभातफेरीद्वारे लोकवर्गणी जमू लागली. पूर्णा तालुक्यातील १११ शाळांमध्ये काम सुरू झाले. शिक्षक-ग्रामस्थांनी मिळून शाळांची रंगरंगोटी, पत्राशेड, स्वच्छतागृहांची दुरूस्तीे, पिण्याच्या पाण्यााची सोय केली. 
आपल्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी भुसारे करीत असलेल्या प्रयत्नांना प्रतिसाद म्हणून दुष्काळी परिस्थितीतसुद्धा ग्रामस्थांचे ७५ लाख, शिक्षकांचे २५ लाख असे एक कोटी रूपये जमा झाले. नंतर आणखी २५ लाख रूपयांची भर पडली. 
१०५ शाळा सुविधासज्ज बनल्या. त्यातील ९० शाळांमध्ये ई-लर्निंग सुरू झाले. गुणवत्ताही वाढली. मागील वर्षी १२ हजार ३२० मुले अभ्यासात मागे होती. यंदा त्यापैकी ८ हजार २०० मुलांची चांगली प्रगती झाली. तालुक्याला खाजगी इंग्रजी शाळेत शिकायला गेलेली आलेगाव, कावलगाव, पेनुर येथील २० मुले आपल्या गावात दर्जेदार शिक्षण मिळू लागल्याने परत आली. खांबेगाव, कान्हेगाव, एकुरखा, हिवरा, फुकटगाव, कावलगाववाडी, धानोरामोत्याब, चांगेफळ, सोनखेड या गावांतल्या शाळांच्या कायापालटाचे मॉडेल बघण्यासाठी इतर ठिकाणचे शिक्षक, ग्रामस्थ येऊ लागले. विठ्ठल भुसा्रेंचे शिक्षक सहकारी दिलीप श्रृंगारपुतळे, सूर्यकांत पिसाळ, सुंदर धवन, विलास वानरे, विष्णू कुंभार यांचाही या परिवर्तनात मोठा सहभाग आहे.
या १११ शाळांमध्ये २०१६-१७ साठी पायाभूत चाचणीही घेण्यात आली. त्यात २५ शाळा ‘क’ मधून ‘ब’ श्रेणीत आल्या, कौडगावची शाळा ‘ब’ मधून ‘अ’ श्रेणीत तर माहेर येथील शाळा ‘क’ मधून थेट ‘अ’ श्रेणीत आली. ३५ शाळा प्रगत म्हणून घोषित झाल्या तर एक पेपरलेस शाळा म्हणजे tab युक्त शाळा बनली. मुलांना शाळेबाबत वाटणार्‍या अनास्थेची जागा शाळेविषयीच्या ओढीने, अभिमानाने घेतली.
एका कल्पक कार्यनिष्ठ अधिकार्‍याच्या प्रयत्नांमुळे लोकसहभागातून पूर्णा तालुक्यातले शाळाविश्वच सुधारले. नमुनेदार उदाहरण ठरले.
विठ्ठल भुसारे संपर्क - 88 88 329423
- बाळासाहेब काळे.

No comments:

Post a Comment