Wednesday 1 February 2017

देणार्‍याचे हात हजार



“सगळं जग किती स्वार्थी झालंय! कुणाला दुसर्‍यांशी काही देणं-घेणं राहिलेलं नाही”, अशी खंत आपण एकमेकांना बोलून दाखवत असतो. 
पण याच भारतात आपणच 'दान उत्सव’ सप्ताह अगदी दिवाळी आणि ईदसारखा मोठ्या प्रमाणात साजरा करतोय. हा सप्ताह २००९ पासून दर वर्षी साजरा केला जातोय. गांधी जयंतीपासून ८ ऑक्टोबरपर्यंत या उत्सवाचा कालवधी असतो.
सुरुवातीला या उत्सवाचं नाव होतं ‘जॉय ऑफ गिव्हिंग’.
कुणाला तरी, विशेषत: गरजू व्यक्तीला काही तरी देण्यातला आनंद किती मोठा असतो, हे आपण सर्वच जण वेळोवेळी अनुभवत असतोच. भारतीय मानसिकतेचा विचार करून या सोहळ्याचं नामकरण ‘दान उत्सव’ असं केलं. आपल्याकडे दान हे पुण्यकर्म समजलं जातं. दिल्याने आपल्याकडचं वाढतं, असं म्हणतात. हो. आनंद, समाधान तर नक्कीच वाढतं.
समाजात मोठा वर्ग वंचित आहे. या वर्गासाठी ज्यांना शक्य आहे, त्यांनी काही ना काही द्यावं, देत राहावं, अशी अत्यंत ह्रद्य कल्पना या उत्सवामागे आहे. ज्यांना ती पटेल त्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात आणि आवडीच्या विषयावर आपापल्या पद्धतीने अनुसरावी.
 उदाहरणार्थ, ‘गूंज’ या मॅगसेसे अवार्डविजेत्या संस्थापकाच्या संस्थेने असा संकल्प सोडला आहे, की या आठवड्यात ते एक लाख दानकृती घडवतील. यात कपडे, पुस्तकं असतील, जे नंतर गरजूंना पुरवण्यात येतील. ठाण्यातल्या ‘आसरा’ संस्थेने युरोकीड या सधनांच्या बालशाळेतील विद्यार्थी आणि पालकांकडून वस्तू गोळा केल्या आहेत. त्या स्ट्रीट चिल्ड्रेनना देण्यात येतील.
अमुक एक कृती आणि ती अमुकांसाठी असं काहीही बंधन नाही. ज्यांना ही कल्पना रुचेल, त्यांनी या सोहळ्यात सामील व्हावं.
दान उत्सवात दर वर्षी एक हजारपेक्षा जास्त कॉर्पोरेट कंपन्या आणि तेवढ्याच सामाजिक संस्था, दोन हजारांहून अधिक शाळा, कॉलेजं आणि शिवाय इतर अगणित संस्था भाग घेतात. गेल्या वर्षी ५० लाखांपेक्षा जास्त लोकांनी दान उत्सवात भाग घेतला. ११० शहरांत उत्सव साजरा झाला.
सोशल मिडियाचं महत्व आणि प्रभाव लक्षात घेता या दानकल्पनेचा प्रसार करण्यासाठी काही गोष्टी सुचवल्या आहेत. खाली दिलेल्या फोटोप्रमाणे आपल्या बोटावर पेनने बोधचिन्ह काढावं, सेल्फी घ्यावा. त्याला #HappyDot selfie असं म्हणून फेसबुक, व्हॉट्सअप वगैरे आपण वापरत असलेल्या सोशल नेटवर्क वर टाकावं. फक्त एक वाक्यात आपण जे दान केलं त्याचं वर्णन करावं. #DaanUtsav, #HappyDot हे हॅशटॅग त्या वाक्यात पेरायला मात्र विसरू नये वगैरे.
कविवर्य विंदा करंदिकरांच्या ’घेता’ या गाजलेल्या कवितेच्या समारोपाच्या ओळी किती मोठी शिकवण देऊन जातात –
देणार्‍याने देत जावे घेणार्‍याने घेत जावे
 घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावेत
खरोखर, देण्याची कृती ही आपल्या माणूसपणाची उत्कट अभिव्यक्ती आहे.
- अनिल शाळीग्राम.

No comments:

Post a Comment