Friday 3 February 2017

तुमच्या घराच्या दारावर कुणाच्या नावाची पाटी आहे?

जालना जिल्ह्यातील पाच हजारावर कुटुंबांनी आपापल्या घरांच्या दारावर लेकीच्या नावाची पाटी लावली आहे. मुली नाहीत तिथे सुनांची नावं आहेत.
हे कसं, कुणामुळे घडलं?
निर्भया, कोपर्डी घटनांपायी मुलींना घराबाहेर पडणं अवघड झालेलं. याचा परिणाम खेड्यापाड्यात लगेच जाणवू लागला. घाबरलेल्या मुली शाळादेखील बुडवू लागल्या. या
मुलींना आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी, त्यांच्या गैरहजेरीचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी दादाभाऊ जगदाळेंना ही अनोखी कल्पना सुचली. जालन्याच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्रात (DIET) गेली 11 वर्ष ते कंत्राटी पद्धतीने साधनव्यक्ती पदावर काम करत आहेत.
मुलींना कुटुंबात, समाजात मानाचं स्थान मिळायला हवं यासाठी वातावरणनिर्मिती केली. मुलींची नावं घरावर लावण्यासाठी शिक्षिका लगेच तयार झाल्या. नंतर शिक्षकांनीही तयारी दाखवली. हळुहळु सर्वच कुटुंबांनी भाग ध्यायचं ठरवलं. प्रश्न होता पाट्यांसाठी येणाऱ्या खर्चाचा. त्याच वेळी लेकींच्या सन्मानासाठी मागे राहायचं नाही, या भावनेतून शिक्षकांनी स्वतःच खर्च उचलण्यास सुरुवात केली.
कोरोवेट सीट पासून पाट्या बनल्या. आणि १०९ शिक्षकांनी स्वहस्ताक्षराने पाट्या लिहिल्या. आणि बघता बघता २८ गावांसह वाड्या, वस्त्या,तांडे यातील ५,२३१ कुटुंबाच्या भिंती लेकीच्या नावाने शोभून दिसू लागल्या. जाफराबाद तालुक्यातल्या कुंभरझारी आणि अकोलादेव या दोन केंद्रांतर्गत येणारी गावं या उपक्रमात सामील झाली. 
माजी मंत्री आमदार राजेश टोपे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनीही आपल्या घराच्या दारावर लेकीचं नाव झळकवलं. अलिकडे नवरात्रात भोकरदनचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या उपस्थितीत सावरगाव म्हस्के गावात लेकींच्या नावाच्या पाट्या बसवण्यात आल्या. 
कंत्राटी कामावर असूनही नेमून दिलेल्या कामापलीकडे जात सर्व शिक्षकांना सोबत घेऊन हे अभिनव काम जगदाळे यांनी केलं. जगदाळे सरांच्या या संकल्पनेची वेगवेगळ्या जिल्ह्यांतून विचारपूस होत आहे.
डायटचे प्राचार्य भटकर, डॉ विशाल तायडे, जालना जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यांनी ही कल्पना उचलून धरत जिल्हाभर राबवण्यासाठी तयारी दाखवली आहे.
आता सांगा, तुमच्या घराच्या दारावर कुणाच्या नावाची पाटी आहे?
-अनंत साळी

No comments:

Post a Comment