Wednesday 1 February 2017

केल्याने होत आहे रे...


जुनाट इमारती, त्यांच्या खिडक्यांवर वाळणारी कपडे, त्याच कपड्यांचा इमारतीतून येणार कुबट वास. कुठे ६०/४०चा चमकणारा बल्ब. एकाच रूममध्ये अंथरुणाची वळकटी कोपऱ्यात जमा करून त्यालाच उशी करून बसलेले विद्यार्थी. तिथेच सामानसुमान लावून आशाळभूत नजरेने भिंतीकडे नजर लावून भविष्याची स्वप्ने रंगवणारी मुले... हे कुठल्याही शासकीय वसतिगृहाचं एक ठाशीव चित्र.
या चित्राला फाटा देत जालना जिल्ह्यातील घनसावंगी इथं साकारलं गेलंय एक वेगळं वसतिगृह. जालना जिल्ह्यातला घनसावंगी तालुका. इथंचं सामाजिक न्याय विभागाअंतर्गत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह’ आहे. चार एकर परिसरामध्ये हे वसतिगृह उभारलेले आहे. २०११ मध्ये हे वसतिगृह सुरु झाले. आज साधारण १०० विद्यार्थी इथं राहतात. अगदी आठवीपासून ते आयटीआयचे शिक्षण घेणारी मुलं इथं आहेत. वसतिगृह सुरु झाले तेव्हा इमारत सोडून सगळा परिसर भकास, बकाल होता. हे बघूनच पवार यांनी वातावरण बदलाचा ध्यास घेतला. दुर्दम्य इच्छाशक्ती, मुलांना काहीतरी चांगलंच दिलं पाहिजे, त्यांच्यातही बदल घडवून आणला पाहिजे हेच ध्येय वसतिगृहाचे गृहपाल अरुण पवार यांनी समोर ठेवलं. आणि येथूनच परिवर्तनाला सुरुवात झाली. मग सहकारी आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांनी वस्तीगृहाचं रुपडं बदलून टाकलं. आयएसओ मानांकन मिळवणारं महाराष्ट्रातील हे पहिलं वसतिगृह ठरलं. 



शोभिवंत फुलझाडे, फळझाडे लावली गेली. काही विद्यार्थी आणि शिक्षकांनीच ती दत्तकही घेतली. पाण्याची कमतरता असतांनाही ७५० ते ८०० झाडांची जोपासना ठिबक सिंचनाद्वारे केली. सांडपाणी वाया न घालता त्याच्या उपयोगातून झाडे जागवली. उरलेले अन्न वाया न घालवता त्यातून कंपोस्ट खताचा उपक्रम राबवला जातोय. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना स्वच्छता, नीटनेटकेपणा याची जाणीव करून दिल्याने स्वच्छतेच्या बाबतीत हे वसतिगृह सर्वोत्तकृष्ट ठरले. ई-लायब्ररी, संगणीकृत अभ्यासिका, स्पर्धा परिक्षांविषयी मान्यवरांचे वेळोवेळी मार्गदर्शन, विविध खेळ, उत्कृष्ट भोजन व्यवस्था, RO फिल्टरचे पाणी अशा सुविधा येथे दिल्या गेल्यात. एकूणच पाणी टंचाईची परिस्थिती कायमच असल्याने छोट्या शेततळे बांधण्यात येणार असल्याचे गृहपाल अरुण पवार यांनी सांगितले.
बकाल परिसर बदलायचा या विचारातून सुरुवात झाली आणि ISO बद्दल माहिती मिळाली. सर्व विद्यार्थी,वसतिगृहातील कर्मचारी यांनी सहभाग दिला आणि महाराष्ट्रातील पहिले शासकीय वसतिगृह ISO मानांकन घेऊ शकले. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे याचा प्रत्यक्ष अनुभव या वसतिगृहास भेट दिल्यास होतो.
- अनंत साळी.

No comments:

Post a Comment