Thursday 9 February 2017

एक आहे गाव. मेंढालेखा त्याचं नाव.

गावात सतत अभ्यास चालतो, चर्चा होतात. निर्णय सामूहिकपणे घेतले जातात. बहुमताचं बळ धोक्याचं, हिंसेचंही ठरू शकतं म्हणून तिथे सर्वमताचा आग्रह आहे आणि गाव एकमताला पोचेपर्यंत संवाद सुरू ठेवणं, अल्पमताचा आदर करणंही आहे. गावातल्या सर्वांच्या हिताचं राजकारण करता येतं हे त्यांनी दाखवलं आहे. सगळ्यांचा अग्रक्रम एकच. गावविकास. एकेक कायदा समजून घ्यायचा आणि अंमलात आणायचा. गावविकासासाठी त्यांनी आपसातले तंटे मिटवले. गावातल्या आणि भोवतालच्या वनजमिनीवर, वनउत्पादनांवर गावाला अधिकार बहाल करणारा २००६चा वनहक्क कायदा सुजाणपणे अंमलात आणणारं, बांबूविक्रीचा अधिकार मिळणारं आणि प्रत्यक्ष बांबूविक्री करणारंही देशातलं हे पहिलं गावं ठरलं. 
भारतीय राज्यघटना सांगते की देश म्हणजे देशातले लोक! मग प्रत्येक वेळी फक्त सरकारकडे कसं बोट दाखवणार? आपण निवडून दिलेलं मुंबई-दिल्लीतलं प्रातिनिधिक सरकार कायदे करतं, धोरणं-योजना आखतं. या कायद्या-योजनांची अंमलबजावणी कोणी करायची? सरकार तर आपलंच आहे. तेव्हा जबाबदारी आपलीसुद्धा. मेंढावासींनी ती स्वीकारली आणि स्वतःला सिद्धही केलं. दर पाच वर्षांनी मतदान करण्यापुरती नागरिकत्वाची भूमिका बजावणार्‍यांपेक्षा ते निराळे आहेत. स्वतःच्या जीवनावर, भोवतालावर स्वतःचंच नियंत्रण रहावं म्हणून ते दररोज दक्ष आहेत. 
"दिल्ली-मुंबईत आमचं सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार" या घोषणेतला आशय मेंढा गावकर्‍यांना उलगडला. भारतीय ‘प्रजा’सत्ताकाला त्यांनी नवा आशय दिला. नक्षलवाद, माओवादासारख्या समस्यांवरचं हे राजकीय उत्तर असू शकतं.
मेंढ्यात हे घडलं म्हणून इतरत्र घडेल? वरवर पाहाता मेंढा आदिवासींचं म्हणून एकजिनसी आणि अशा प्रक्रियेला पोषक वाटलं तरी अन्य कोणत्याही गाव-वस्ती-सोसायटी-चाळीप्रमाणे तिथेही टोकाचे मतभेद, विषमता, समस्या, जगण्याचे व्याप-ताप आहेतच. तिथेही सिनेमा-टीव्ही, राजकीय-धार्मिक पुढारी यांचे प्रभाव आहेतच. पण गावाचे निर्णय सर्वसहमतीने घ्यायचे, हे ज्या क्षणी त्यांनी ठरवलं, त्या क्षणी मेंढावासी अन्यांपेक्षा निराळे ठरले. म्हणजेच हे इतरत्रही घडण्यासारखं आहे. एकजिनसी वस्त्या-गावात तरी नक्कीच घडावं. मुद्दा आहे आधुनिक, शहाणं नागरिक होण्याचा, एकजुटीचा! मेंढालेखाच्या वाटेने अनेक गावांना खुणावलं आहे. वाट सोपी नसली तरी सामूहिक शहाणपणाची, म्हणून लाभाची आहे, हे नक्की.
पटतं आणि शक्य वाटतं का तुम्हाला हे? सांगा.
- मेधा कुळकर्णी

No comments:

Post a Comment