Wednesday 1 February 2017

गांधी समजून घेताना...


गांधींजींविषयी समाजमन कलूषित करण्याचा प्रयत्न सुरू असतो. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधींचे कोणतेही दैवतीकरण न करता गांधी जसे होते तसे नेमकेपणाने समाजासमोर आणायचे या उद्देशाने अमरावतीच्या ‘आम्ही सारे फाऊंडेशन’ने जानेवारी २०१५ पासून ‘गांधी समजून घेताना’ हा उपक्रम सुरू केला. त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
संकेत मुनोत (पुणे), भूजंग बोबडे (जळगाव) असे तरुण गांधीविचाराने प्रेरित होऊन समाजापर्यंत गांधी पोचविण्यासाठी कृतिशील धडपड करताहेत, 'गांधी समजून घेताना' शिबिराची ही उपलब्धी आहे.
बदलत्या जागतिक परिस्थितीत वाढता दहशतवाद, मानसिक-वैचारिक आणि शस्त्रांच्या हिंसाचारात गांधी समजून घेणे क्रमप्राप्त ठरते. ‘आम्ही सारे’चे संयोजक अविनाश दुधे म्हणाले, ‘गांधींजीबाबत समाजातील सर्वच स्तरात असलेले गैरसमज, शंका, आक्षेप याने भविष्यात भारताचे फार मोठे नुकसान होणार आहे, असे सतत वाटायचे. म्हणून गेल्या वर्षी 'आम्ही सारे'च्या सदस्यांनी एकत्र येऊन गांधींच्या पुण्यतिथीला काही विचारवंतांकडून गांधी समजून घ्यायचे ठरविले.
‘गांधी समजून घेताना...’चे पहिलेच शिबीर गांधींच्या कर्मभूमीत, सेवाग्रामला ३० जानेवारी २०१५ रोजी झाले. गांधींचे पणतू तुषार गांधी उद्घा्टक होते. ऑक्टोबर २०१५ मध्ये दुसरे शिबीर गोव्यात पणजीला झाले. संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, बेळगावातून शंभरच्या वर शिबिरार्थी आले होते. ३०, ३१ जानेवारी २०१६ ला पुण्याच्या शिबिरात गोव्यापासून चंद्रपूरपर्यंतच्या दिडशेच्यावर प्रतिनिधींनी दोन दिवस पूर्णवेळ उपस्थित राहून गांधी समजून घेण्याचा प्रयत्न केला.
शिबिरात महात्मा गांधींचे समाजाला माहिती नसलेले पैलू उलगडून सांगण्यात येतात. त्यामुळे प्रत्येक वेळी गांधी नव्याने समजतात, असे या तिन्ही शिबिरात कार्यकर्ता म्हणून सहभागी असलेले हर्षल रेवणे म्हणाले.
येत्या १२,१३ नोव्हेंबरला मुंबईत दोन दिवसाचे निवासी शिबीर ‘वी निड यू सोसायटी'च्या सहकार्याने होत आहे. वांद्र्याच्या ‘द रिट्रीट’मध्ये होणाऱ्या शिबिरात गांधीचं जीवन, तत्वज्ञान, त्यांची विचार-कृतीची भाषा, शिक्षण, आरोग्य, स्त्रीशिक्षण आदि विषयातील त्यांचे जगावेगळे प्रयोग, सत्याग्रह, सत्याचे प्रयोग, त्यांचा 'आतील आवाज' अशा विषयांवर चर्चा होणार आहे. महात्मा गांधींबद्दलच्या वाद-आक्षेपाच्या मुद्यांवरही मोकळेपणाने चर्चा, प्रश्नोत्तरे होणार आहेत. डॉ अभय बंग, रावसाहेब कसबे, डॉ. गणेश देवी आदी मार्गदर्शक असणार आहेत.
प्रा. शेषराव मोरे, दत्ता भगत, सुरेश द्वादशीवार, डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, डॉ. सदानंद मोरे, अनिल अवचट, विनोद शिरसाठ, संजय आवटे, सचिन परब हे आधीच्या शिबिरांमधले व्याख्याते होते.
 ‘आम्ही सारे फाऊंडेशन’ हे विविध क्षेत्रात काम करणार्‍या, काही वेगळं करण्याची आस बाळगणार्‍या ४०-४५ व्यक्तींनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी आंदोलक चंद्रकांत वानखडे यांच्या प्रेरणेतून तयार केलेली संस्था आहे. अमरावतीला मुख्यालय असलेल्या ‘आम्ही सारे फाउंडेशनचे’ कार्यकर्ते आज महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटकपर्यंत विखुरले आहेत.
जात, धर्म, पंथ यांचा अभिनिवेश न बाळगता समाजाला पोषक ते देणार्‍या या विचारपीठाला 'गांधी' या विषयाचा जिव्हाळा असला तरी कोणत्याही विचारांचं वावडं नाही.

नितीन पखाले.

No comments:

Post a Comment