Thursday 9 February 2017

पावसाचं पाणी जमिनीत जिरवणारा अधिकारी

एखादा कल्पक आणि तळमळीचा अधिकारी त्याच्या प्रत्येक पदावर आणि बदलीच्या प्रत्येक ठिकाणी लोककारणार्थ काही काम करतोच. 
रमेश भताने २००७ मध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून बीडला होते. तेव्हापासून त्यांना एक काम करायचं होतं. पुन्हा दोन वर्षांपूर्वी बीड आणि औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालक या पदावर ते आले आणि कामाला लागले. जिल्ह्यातील १४०३ गावांमध्ये दहा लाख हेक्टरपैकी लागवडीसाठी आठ लाख हेक्टर सोडल्यास पडिक क्षेत्रावर काय? यावर डीप सीसीटी, कंपाऊंड बंडिंग, नद्या, नाल्यांचं खोलीकरण, तलावातील गाळ काढणं सारखी कामं दुष्काळात झाल्यास पावसाळ्यात त्याचं फळ निश्चित मिळेल, असा विचार करून त्यांनी नियोजन केलं. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्यासमोर मांडले. मंत्री पंकजा मुंडे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवलं. आणि मुख्यमंत्र्यांची महत्वाकांक्षी योजना म्हणून जलयुक्त शिवार योजना अवतरेली, क्रांतिकारी ठरली ! आधीच्या
पाणलोट विकास योजनेतच जलयुक्त शिवारची बिजं असल्याचं रमेश भताने सांगतात. 
आदर्श गाव आणि इतरांसाठी प्रेरणास्थान असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या हिवरेबाजाराचा कायापालटही पंचवीस वर्षांपूर्वी राबवलेल्या राज्य शासनाच्या पाणलोट विकास योजनेमुळेच झाला होता. तेव्हाही तिथे रमेश भताने कृषी विभागाचे अधिकारी होते. सरपंच पोपटराव पवार यांच्या पुढाकाराने तिथे मोठं काम उभं राहिलं. भूपृष्ठावर पडणारं पावसाचं पाणी जागीच जिरवल्यावर भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होते, हे हिवरे बाजारने दाखवून दिलं. रमेश भाताने यांच्या डोक्यात घर करून बसलेलं हे मॉडेल त्यांनी चक्क दुष्काळी, चारशे मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस होणाऱ्या आपल्या मायभूमीत, बीडमध्ये राबवलं. 
१९८७ मध्ये वैजापूर (जि. औरंगाबाद) इथे जलसंधारणासाठी कृषीविभागाने बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्यांच्या डिझाइनचं काम भताने यांच्याकडे होतं. १९८८-८९ मध्ये सुमारे दीडशे ते दोनशे बंधारे वैजापूर तालुक्यात बांधण्यात आले. जायकवाडी धरणातून पाणी लिफ्ट करून या बंधाऱ्यात अडवण्याची त्यांची कल्पना होती. यानंतर नगर येथेही त्यांनी पाणलोट विकास योजना कार्यान्वित केली. तेव्हा ते उपविभागीय कृषी अधिकारी होते. पाणलोट, कृषी विभाग, लघूपाटबंधारे,जीएसडीएस, सामाजिक वनीकरण या विभागांनी संयुक्तपणे काम सुरु केलं. तीन तालुक्यांत टँकरमुक्तीसाठी कामं सुरू झाली. या कामांमधून दुष्काळमुक्ती झालीच; शिवाय आम्हाला कामासाठी प्रेरणा मिळाली, असे भताने म्हणाले.
२६ जानेवारी २०१५ रोजी जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचा प्रारंभ झाला, पहिल्या टप्प्यात बीड जिल्ह्यातील २७१ गावे निवडण्यात आली. यात साडेसहा हजारांवर कामं करण्यात आली. डीप सीसीटी, जुने गॅबियन,सिमेंट आणि गाळाने भरलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ही कामं हाती घेण्यात आली. लोकसहभागातून या योजनेत ६८ तलावांमधील १५ लाख ५० हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. अशासकीय, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने नदी, नाल्यांचं खोलीकरण, रूंदीकरण हाती घेण्यात आले. ५५४ किलोमीटर एवढे काम करण्यात आले. शासकीय यंत्रणेकडून ४१ ठिकाणचा ३४ लाख ७१ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. यात सुमारे दीड ते दोन लाख टीएमसी एवढा पाणीसाठा असून, ७५ हजार ९७२ हेक्टर सिंचन क्षेत्रासाठी पाणी संरक्षित झालं आहे. २०१६-१७ साठी ५२८१ गावे जलयुक्त शिवारसाठी निवडली गेली आहेत. या गावांमध्ये ३५३२९ कामे पूर्ण झालेली आहेत.
मुकुंद कुलकर्णी,

No comments:

Post a Comment