Thursday 23 February 2017

जिद्दीतून आली समृद्धी


अत्यंत हलाखीची परिस्थिती. पतीला काम होत नसल्याने खैरूण यांच्यावर संसाराची जबाबदारी आली. पन्नाशी गाठलेली. पदरी चार मुली, दोन मुले. पत्र्याच्या शेडचा मोडकातोडका आडोसा असलेलं घर. पावसाळ्यात अर्धा संसार पाण्याखाली. त्या म्हणतात, घर कसं चालवायचं अशी चिंता माझ्यापुढे होती. धुणी-भांडी करत होतेच. मग `राहत' बचत गटाच्या बिनव्याजी कर्जातून शेळ्या घेतल्या. बचत गटाची साथ मिळाली. आता चार मुलींची लग्न करून दिली. मुलांना शिक्षण देतेय. मिरची कांडप मशिन, पिठाची गिरणी चालवून आनंदाने संसार करत आहे, खैरूण अभिमानाने सांगतात.


शमा मन्सूर खान यांचं कपड्याचं दुकान. या व्यवसायापुरती जागाही त्यांच्याकडे नाही. तरीही पत्र्याच्या शेडमध्ये अुपऱ्या जागेत, आणि पैशांत योग्य नियोजन करून त्यांनी आपला व्यवसाय वाढवला आहे. साबेदा बेगम शेख यांच्या पतीचे ५ वर्षापूर्वी निधन झाले. जगण्यासाठी काही उद्योग हवा होता. ‘राहत’ बचत गटाकडून कर्ज घेऊन त्यांनी लाकूड विक्री सुरू केली. आता रोज ५०० रुपयांची लाकूड विक्री करणाऱ्या साबेदा आनंदाने संसार करीत आहेत. ताहेराबी शेख यांना दोन मुले. गटाकडून कर्ज घेतले. आणि बांगड्याचा व्यवसाय सुरु केला. त्यावर संसार उभा राहिला आणि मुलंही शिकली. 

लैला यांचे पती अमिर शेख सेंट्रींगच्या कामावर रोजंदारी करीत होते. लैला यांनी ‘राहत’ बचत गटाकडून कर्ज घेतले आणि पतीला बांधकाम क्षेत्रात गुत्तेदारी करण्यास प्रोत्साहित केले. अमिर सध्या गुत्तेदारी करतात. त्यांच्याकडे स्वत:चे भांडवल तयार झाले आहे. 
खैरूण, ताहेराबी, शमा या सगळ्या संसार उभा करण्यासाठी, व्यवसायासाठी धडपडणार्‍या गरिबीशी झुंजणार्‍या जिद्दी स्त्रिया. त्यांना २०१२मध्ये ‘राहत’ पतसंस्थेच्या बचत गटाने बिनव्याजी कर्ज दिले आणि गालिबनगरातील १६ जणी स्वत:च्या व्यवसायातून समृध्द झाल्या.


 ‘राहत’चे सचिव आशरफ शेख म्हणतात, "पतीच्या व्यसनाधीनतेमुळे जेव्हा संसार उघड्यावर पडायची वेळ येते, तेव्हा अशा कुटुंबात महिला संसाराचं छत्र बनतात. शहरातील काही भागात यासाठी सर्व्हे केला. आणि २०१२ पासून महिलांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यास सुरुवात केली. सध्या दोन बचत गट आहेत. २०१७ मध्ये आणखी दहा सुरू करणार आहोत". बचत गटाकडून कागदपत्रांच्या अडथळ्यांशिवाय महिलांना छोट्या व्यवसायासाठी तातडीने बिनव्याजी कर्ज दिले जाते. त्यामुळे अनेक महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या. शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू असलेल्या उस्मानाबादसारख्या जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करून कुटुंबाचा आधार होणार्‍या, समृद्धी खेचून आणणार्‍या या महिला कौतुकास पात्र आहेत.
- चंद्रसेन देशमुख.

No comments:

Post a Comment