Sunday 26 February 2017

शेतकर्‍याने सांभाळलं मजुरांना, मजुरांनी सांभाळलं शेतीला


मिलिंद वैद्य, गाव: रीळ, तालुका, जिल्हा रत्नागिरी. या उच्च शिक्षित तरूण प्रयोगशील शेतकऱ्याने मजुरांची काळजी घेत, निसर्गाच्या लहरीपणावर मात करत, योग्य नियोजनाद्वारे सगुणा पद्धतीने भाताचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. या पद्धतीचा फायदा लक्षात घेऊन जिल्ह्यात यंदा आणखी १०१ शेतकरी हा प्रयोग करीत आहेत. या सर्वांचेही उत्पन्न वाढेल असा अंदाज आहे. या नव्या ‘सगुणा’ पद्धतीमुळे मशागतीवर होणारा ५० टक्के खर्च कमी होतो. खतांच्या खर्चात ५० टक्के बचत होते. पावसाने ओढ दिल्यास फारसा परिणाम होत नाही आणि कमी पाण्यावरही पीक चांगले येते,
मिलिंद वैद्य यांचा मुख्य व्यवसाय आंबा उत्पादन. ते वार्षिक सहा हजार पेट्या इतके आंब्याचे उत्पादन घेतात. त्यांच्याकडे ३० मजूर वर्षभर कामाला असतात. मजुरांना प्रशिक्षण, वर्षभर काम, चांगले वेतन, त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी, मजुरांच्या मुलाना चांगले शिक्षण, मजुरांच्या भविष्याची तरतूद आणि त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याच्या बांधिलकीमुळे त्यांच्याकडे वर्षभर मजूर उपलब्ध होतात. ते चांगले कामही करतात. हेच यशाचे गमक आहे, असे मिलिंद वैद्य सांगतात.
भात आणि आंबा उत्पादनासाठी गेल्या काही वर्षात कोकणातले तरुण शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत आहेत. या प्रयोगांना स्थानिक शेतकरी चांगला प्रतिसाद देत आहेत. शेतकऱ्यांचे प्रयत्न आणि सरकारच्या विविध योजना यातून रत्नागिरी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर क्षेत्रात आंबा आणि काजूची तर ३ लाख हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड झाली आहे.
सध्या बागायती शेतीकडे कल वाढत आहे. निसर्गाचा लहरीपणा, मजुरांची उणीव आणि वाढता खर्च यामुळे भातशेतीचे क्षेत्र मात्र कमी होताना दिसतेय. मात्र या परिस्थितीवर मात करीत भाताची शेती फायद्यात कशी करावी ते मिलिंद वैद्य यांनी भाताची त्रिसूत्री लागवड करत हेक्टरी १९.२४ टन उत्पादन घेत दाखवून देले आहे.
भात आणि आंबा या पिकांसाठी कोकणाची विशेष ओळख आहे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे ही ओळख टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. पारंपारिक भात लागवडीसाठी रोप काढणे, नांगरणी, भाजावळ करणे, पुनर्लागवड,चिखलणी, फोड, बेर करावी लागते यासाठी मजूर मोठ्या प्रमाणावर आवश्यक असतात. यामुळे जंगलतोड होते. निसर्गावरही परिणाम होतो. याबरोबरच पारंपारिक शेतीमुळे उत्पादनखर्चही वाढतो. मिलिंद वैद्य यांनी केलेल्या सगुणा पद्धतीमध्ये या सगळ्या गोष्टी केल्या जात नाहीत तर गादी वाफे तयार करून लागवड केली जाते. दहा वर्षे नांगरट करावी लागत नसल्याने खर्च वाचतो, उत्पादनखर्च कमी येतो आणि दोन किवा तीन पिकेही प्रतिवर्षी घेता येतात. या पद्धतीमुळे जिल्ह्यातील पारंपारिक वायंगणी शेतीला चांगले दिवस येतील आणि वायंगणी शेती परत एकदा सुरु झाली की पाण्याचे चक्र सुरळीत सुरु होऊ शकेल, असे शेतकरी सांगतात. कारण वाढत्या पाणीटंचाईचे मूळ कारण हे चक्र मोडण्यात आहे. त्यामुळे हा प्रयोग रत्नागिरी जिल्ह्यासाठी मैलाचा दगड ठरेल, हे नक्कीच.
-निलेश डिंगणकर.

No comments:

Post a Comment