Saturday 9 December 2017

35 वर्षांपूर्वी घेतलेला हुंडा केला परत


परभणीतले सत्यनारायण रामजीवन चांडक हे भारतीय स्टेट बँकेत शाखाधिकारी होते. नुकतेच ते साकोली शाखेतून निवृत्त झाले. समाजातील गरजूंना मदत करणारे ही त्यांची ओळख. विशेषतः ‘सेवालय प्रकल्प’, हसेगाव, लातूर इथल्या एचआयव्हीबाधितांच्या पुनर्वसनविषयक गरजांसाठी ते वेळोवेळी पुढे असतात. सेवानिवृत्तीनिमित्तानेही, त्यांनी साकोलीला सेवालयच्या 'हॅपी म्युझिक शो' चं आयोजन केलं. आणि लोकसहभागातून 1 लाख 35 हजाराची मदतदेखील केली. पण, चांडक यांची खरी गोष्ट पुढेच आहे.
त्यांचं 35 वर्षांपूर्वी म्हणजे 1981 मध्ये बसंती यांच्याशी लग्न झालं. तेव्हा प्रथेप्रमाणे त्यांनी सासऱ्यांकडून 21 हजाराचा हुंडा घेतला होता. आता मुलं मोठी झाली. त्यांचेही विवाह पार पडले. आता दोन्ही मुलं पवन आणि पंकज वडिलांना विचारू लागली, “बाबा, आम्ही तर आमच्या लग्नात हुंडा नाही घेतला. तुम्ही का घेतला? तुम्ही तो परत द्यायला हवा.” बाप-लेकात दिलखुलास चर्चा व्हायची. योग्य वेळ आल्यावर उत्तर देईन, असं म्हणत ते चर्चेला विराम द्यायचे.
सत्यनारायण चांडक यांची एकसष्टी नुकतीच साजरी झाली. त्यावेळी चांडक पती-पत्नींची खाद्यसामुग्रीने तुला करून त्या वजनाचं साहित्य सेवालय प्रकल्पाला दिलं गेलं. हीच वेळ साधून सत्यनारायण यांनी 35 वर्षांपूर्वी हुंडा घेतला ते चुकलं, अशी प्रांजळ कबुली दिली. आणि 21 हजाराचा चेक मेहुण्याच्या हाती दिला. परंतु रूढीपालन करणार्‍या मेहुण्यांनी ते पैसे स्वीकारण्यास नम्र नकार दिला. मग मदतीची खरी गरज समाजातील वंचित बालकांना आहे, हे जाणून सत्यनारायण यांनी ते हुंड्याचे पैसेही सेवालयालाच दिले.
सत्यनारायण चांडक यांनी, लग्नानंतर 35 वर्षांनी का होईना, हुंडा परंपरा चुकीची असल्याचं मान्य केलं. हुंड्याची रक्कम परतही केली.
लग्नात हुंडा घेणार्‍यांनो, कराल का तुम्ही त्यांचं अनुकरण? 

- बाळासाहेब काळे.

No comments:

Post a Comment