Thursday 7 December 2017

लहान वयात भक्तीचा मार्ग धरणं, सत्तरीपर्यंत निभावणं! विलक्षणच.

 साठ वर्षांपूर्वीचं कुरुंजी डोळ्यासमोर आणूया. रस्ते नाहीत. प्रवास फक्त भाटघर धरणाच्या पाण्यातून, लॉन्च आणि होड्यातूनच. घनदाट जंगलाचा परिसर. अर्थातच वीज नाही्च. गावात नदीजवळ देवीचं देऊळ होतंच. मूर्ती म्हणून एक मोठा दगड उभा असलेला. देवळात दिवा लावायला एकजण रोज यायचा, तेवढंच. बाकी कुणीच नसायचं. या दिवा लावणाऱ्या माणसाला जाणवायला लागलं होतं, की देवळात कुणाचा तरी वावर आहे. कोण ते मात्र दिसेना. एके दिवशी तो दिवा लावल्यावर बाहेर लपून बसला. थोड्या वेळानं देवळात मूर्तीच्या मागून एक तेरा चौदा वर्षांची पोरसवदा मुलगी पुढे आली. आणि इथून सुरू झाली मठातल्या अनसुयाबाईंची विलक्षण कहाणी.
या जेजुरीत राहणाऱ्या मुलीचे आईवडील रीतीप्रमाणे तिचं लग्न ठरवत होते. पण भक्तीमार्गाकडे ओढ असलेल्या अनसूयेला ते पसंत नव्हतं. कुरुंजीत नलावडे आहेत. तीही नलावड्यांचीच. त्यामुळं ती जेजुरीतून थेट कुरुंजीला पोचली आणि देवळात आसरा घेतला. आईवडील तिची समजूत घालायला आले. पण ही मुलगी गेली नाही. तिथंच जंगलात देवाची उपासना करत राहिली.
कुरुंजीत आम्ही पहिल्यांदा जाताना पोळीभाजीचा डबा घेऊन गेलो होतो. रस्त्यात कुरुंजी मठ अशी पाटी दिसली. आत वळून मठापर्यंत गेलो. बाईंचा कुणी मदतनीस होता. त्यानं देवळात जेवायला बसू शकता असं सांगितलं. आम्ही डबे उघडले. थोड्याच वेळात तोच मदतनीस भाकरी, भाजी आणि लोणचं घेऊन आला. बाईंनी पाठवलंय असं सांगितलं.

जेवण झाल्यावर आम्ही बाईंच्या निवासात गेलो. भगवी वस्त्रं नेसून केस डोक्यावर बांधून बाई जमिनीवर बसल्या होत्या. पंच्याहत्तरीच्या असाव्यात. म्हातारपणामुळं चालणं जमत नव्हतं. कसंनुसं सरकत चालायच्या. त्यांच्या गरजेच्या वस्तू जमिनीवरच पसरून ठेवलेल्या. त्यांच्याशी आम्ही बोललो. त्यांच्या बोलण्यातून विरक्ती जाणवत होती. सहजपणे रामदास, तुकाराम, ज्ञानेश्वर अश्या संतांची वचनं त्या सांगत होत्या. मठात बरीच झाडं, भाज्या लावल्या होत्या. गावापासून दूर, जंगलात, नदीपलीकडे त्यांचा मठ आहे. परवापरवा पर्यंत एकट्याच रहात. आता तब्येत नादुरूस्त झाल्यामुळे कुणी ना कुणी भक्त सोबतीला मदतीला असतात. गावातल्या लोकांना बाईंबद्दल प्रेम, आदर आहे. त्यांच्याबद्दलच्या गोष्टी लोक खूपच आस्थेनं सांगतात.
अनसूयाबाईंना गावातल्या काही लोकांनी जागा दिली. तीच मठाची जागा. तिथं जमिनीखाली एक गुहा आहे. बाईंनी चार वर्ष या गुहेत राहून तपश्चर्या केली. रोज भल्या पहाटे चार वाजता त्या नदीत अंघोळीसाठी उतरत. नंतर दिवसभर गुहेत तपश्चर्या. तेजूची आज्जी मठातल्या बांधकामाच्या वेळी मजुरीला होती. तिने हाताचा पंजा नागाच्या फण्यासारखा वाकवून दाखवत, गुहेच्या तोंडाशी ‘हा’ त्यांच्या रक्षणासाठी बसायचा असंही सांगितलं होतं. खाली गुहेत बसूनही अनसुयाबाईंना बांधकामाचं किती सामान संपलं, किती शिल्लक आहे हे अचूक माहीत असे, हे तेजूच्या आज्जीने सांगितलेलं. अनसुयाबाई पूर्वी तरुणपणी गौराईच्या सणात गौराईचे खेळ खेळायला गावात येई. खेळ मनसोक्त खेळून झाले की एकटीच कंदील घेऊन अपरात्रीची पण निर्भयपणे जंगलातल्या मठात चालत जाई.
एकदा एक शिपाई वाईट इच्छा धरून बाईंकडे गेला. बाईंनी त्याच्याबरोबर धरणात पोहण्याची शर्यत लावली आणि तो पाण्यात बुडून मेला ही गोष्टसुद्धा कानावर आलेली
बाईंचे भक्त भरपूर आहेत, असं ऐकण्यात आलं होतं. त्या वेगवेगळ्या गावात कीर्तनं करायल जात असत. खूपदा, बसमध्ये भेटणारे लोक, कुरुंजी म्हटल्यावर, मठावरच्या बाईंची खुशाली विचारतात.
उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलं म्हणाली, मठावर जाऊया. मग धरणाच्या वाळलेल्या पात्रातून चालत आम्ही मठावर गेलो. बाई बाहेर अंगणात बसल्या होत्या. मुलांनी त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या. त्या खूप प्रेमानं बोलल्या. त्यांनी मुलांना लिंबाचं सरबत करून दिलं. मुलांनी त्यांना काय मदत पाहिजे ते विचारलं. बागेची थोडीफार सफाई केली. मठाचं कुंपण काही ठिकाणी मोडलं होतं. ते पुन्हा येऊन दुरुस्त करू असं मुलांनी आश्वासन पण दिलं. मुलं आणि बाई यांचा चांगला संवाद सुरू होता. मी सार्थककडे कॅमेरा देऊन फोटो काढ असं सांगितलं. फोटो काढणार म्हटल्यावर बाईंनी बाजूला पडलेली ओढणी डोक्यावर पांघरून घेतली आणि मुलांना प्रेमानं जवळ घेऊन फोटो काढून दिला.
या मनस्वी अनसुयाबाईंचं गेल्या रविवारी देहावसान झालं.
एका मुलीनं एवढया जुन्या काळात लहान वयात भक्तीचा मार्ग धरणं, त्यासाठी एवढं धाडस करणं आणि ते सत्तरीपर्यंत निभावणं! विलक्षणच.
रंजना बाजी 

No comments:

Post a Comment