Tuesday 5 December 2017

जे विकतं तेच पिकवा

"जे विकतं तेच पिकवा, तरच शेती फायद्याची ठरेल." शेतकरी सखाराम शिंदे सांगत होते. बीडपासून दहा किलोमीटरवर शिवणी गावाच्या टोकाला शिंदे यांची शेती आहे. त्यांच्या शेतात जायला डोंगराच्या पायथ्यापासून रस्ता धरावा लागतो. पण एकदा त्यांच्या शेतीत फेरफटका मारला की प्रवासाचा सगळा शीण निघून जातो. शिवाय एका जिद्दी शेतकऱ्याच्या प्रयत्नांचं दर्शन घडतं.
शिंदे यांच्या शेतीप्रयोगाला सुरवात झाली, १९८९ पासून. त्यावेळी त्यांनी दोन एकरात निलगिरीची झाडं लावली. परंतु कोणी तरी त्यातली काही झाडं जमीनदोस्त केली. पण शिंदे खचले नाहीत. त्यांनी निलगिरीत बांबू आणि सागवान हे आंतरपीक घेतलं. ही सगळी झाडं त्यांच्या मेहनतीने बहरली. वृक्षलागवडीसाठी त्यांना १९९४ मध्ये, शासनाकडून ‘वनश्री पुरस्कार’ मिळाला. नवनवी माहिती घेण्याच्या सवयींमुळे ते डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या सानिध्यात आले. दोन एकर डोंगराळ जमीन विकत घेत त्यांनी तिथं डाळिंब लागवड केली. जवळपास दहा वर्षं त्यांची शेती डाळिंबाच्या बागेमुळे तरली. पण त्यावर रोग पडल्याने संपूर्ण बाग मोडून काढावी लागली. तरीही खचून न जाता शिंदे यांनी, नव्या जिद्दीने डाळिंबाऐवजी फुले सरबती या वाणाच्या लिंबाची बाग लावली. सध्या त्यांच्याकडे लिंबाची २०० तर मोसंबीची ११ झाडं आहेत. त्यातून चांगलं उत्पन्न मिळू लागलं आहे. शेवगा, केसर आंबा, सिताफळ ही झाडंही त्यांच्या शेतात आहेत. 














लिंबू पिकामुळे त्यांचं लिंबू वर्गातील ‘गळलिंबू’ आणि ‘पामेलो’ या वनस्पतीकडे लक्ष गेलं. जेमतेम शालेय शिक्षण घेतलेल्या शिंदे यांनी इंटरनेटच्या माध्यमातून या दोन्ही झाडांची माहिती घेतली. सुरवातीला गळलिंबुची झाडे लावली. त्याला आता फळधारणा होत आहे. मुतखडा, पोटाच्या विकारावर गळलिंबू उपयुक्त असल्याने त्याला अगदी पुण्यातून सुध्दा मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं. तब्बल शंभर रुपयाला एक या भावाने पुण्याच्या मार्केटमध्ये हे गळलिंबू विकलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. पामेलो हे लिंबूवर्गीय झाडदेखील त्यांनी शेतात लावलं आहे. त्यालाही आता फळधारणा झाली आहे. पामेलो या फळाचा उपयोग उत्साह वाढवणे, मूत्रमार्ग विकार, पित्तविकार आणि स्वादुपिंडाची क्षमता वाढवण्यासाठी केला जातो. लोकांची मागणी असलेलं पीक घेतलं तर शेतीत नुकसान होत नाही. त्यामुळे जे परंपरेने पिकतं ते विकू नका, तर जे विकलं जाऊ शकेल तेच पिकवा असा सल्ला सखाराम शिंदे शेतकऱ्यांना देतात .
- राजेश राऊत.

No comments:

Post a Comment