Sunday 3 December 2017

वेबमाध्यम आणि मुलांच्या मेंदूचा प्रतिसाद


आपल्या मेंदूमध्ये सदासर्वकाळ विद्युतरासायनिक लहरी निर्माण होत असतात. हे मेंदूसाठी आवश्यक असतं. यालाच ब्रेन वेव्हज म्हणतात. ज्यावेळी मुलं किंवा मोठी माणसं गॅझेट्स हाताळत असतात त्यावेळी एरवी निर्माण होणाऱ्या मेंदूच्या लहरींपेक्षा या लहरींचा पॅटर्न वेगळा असतो. मेंदू शास्त्रज्ञांना आढळलं की, जी मुलं मोबाईलवर खूप जास्त वेळ गेम खेळत असतात त्यांच्यामध्ये त्यांना एडीएचडी (attention deficit hyper disorder)हा आजार जडू शकतो. या मुलांमध्ये एकाग्रतेची समस्या निर्माण होऊ शकते.
मुळात गॅझेट्सची सवय लागायला अनेक मानसिक कारणं असतात. परीक्षेतले कमी गुण, सततचं अपयश, आईबाबांची बोलणी खाणं, मित्र- मैत्रिणीनंबरोबर मैत्रीपूर्ण संबंध नसणं, अभ्यासाचा / नेमून दिलेल्या कोणत्याही कामाचा आत्यंतिक कंटाळा, काहीही करावसं न वाटणं, घरात किंवा आसपासच्या वातावरणात भांडण, रुसवाफुगवा, नैराश्य अशी नकारात्मकता, घरात माणसं नसल्याने आलेला एकटेपणा, आईबाबांनी टीव्ही बघू न देणं, आळस, एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये धावणं, सतत लेखन, पाठांतराचं ओझं, अभ्यास- गृहपाठ असा अतिशय व्यस्ततेचा बराच काळ गेला असेल तर थोडासा जरी मोकळा वेळ मिळाला तरी मुलं लगेच मोबाईलकडे वळतात. हेच काय ते एकमेव मनोरंजन, असं त्यांना वाटायला लागतं.
म्हणजेच, आजूबाजूच्या घटनांमधला, माणसांमधला रस कमी झाला, कोणत्याही गोष्टीबद्दल छान वाटेनासं झालं की मुलं या स्वस्त मनोरंजनाकडे वळतात. या माध्यमातून त्यांना सतत काही तरी मिळत राहतं. काही गोष्टींपासून लांब जाण्यासाठी जसा व्यसनांचा सहारा घेतला जातो, तसंच. मोबाईलचा वापर करता करता त्यात इतके गुरफटून जातात की हे योग्यच आहे, इथेच तर सगळी मजा आहे असं त्यांना वाटायला लागतं.
गॅझेट्सच्या मानसिक दुष्परिणामांच्या अशा अनेक केसेसशी संबंधित मोठ्या प्रमाणात अभ्यास आणि संशोधन होत आहे. अमेरिकन ऍकेडमी ऑफ पेडियट्रिक यांनी प्रत्येक वयोगटात किती वेळ मोबाईल हाताळावा यासाठी वेळ मर्यादा आखून दिलेली आहे. त्यानुसार दोन वर्षाखालील मुलांना मोबाईल मुळीच द्यायचा नाही. तीन ते पाच वयाच्या मुलांना एक तासाच्या वर कोणतीही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स देऊ नयेत असं स्पष्ट केल आहे. 10 ते 18 वयोगटातल्या मुलांनी केवळ दोन तास वापरला तर हरकत नाही. तर त्यावरच्या वयोगटांना या पेक्षा थोडा अधिक काळ चालू शकतो असं सांगितलेलं आहे. पण, यापेक्षा किमान दुप्पट तरी वेळ मुलं मोबाइल हाताळत असतात .
मोठ्या माणसांनी मोबाईल हाताळला, त्यावर काही वेळापुरते गेम खेळले तर चालू शकतं. यामुळे त्यांचे ताणतणाव काहीसे कमी होतात आणि काही वेळानंतर सहजपणे मोबाईल बाजूला ठेवून ते आपापल्या कामाला लागू शकतात. परंतु मुलांचं असं होत नाही. ते मोबाइल बाजूला ठेवत नाहीत. अशी गॅझेट्स बाजूला करायचा प्रयत्न केला तर मुलं भयंकर चिडचिड करतात. तो बाजूला ठेवायला सांगितल्यानंतर त्यांना ते जमत नाही. एखादं व्यसन सोडवतांना त्या माणसामध्ये withdrowal symtoms दिसतात, तेच symptoms मोबाईल पासून मुलांना दूर करताना दिसून येतात. याचा अर्थ मेंदूने ही सवय घट्टपणे लावून घेतलेली आहे.
ऑनलाईन एक्टिविटी ही खूप वेगात चालू असते. आपण एकाच वेळेला अनेक गोष्टी हाताळू शकतो. आता तर मोबाईलमुळे एकाच वेळी whatsapp ,फेसबुक, instagram, कॅलक्युलेटर, अलार्म, बॅंक, अशा अनेक गोष्टी वेगात होऊ शकतात. ते ही बसल्याजागी ! मात्र शास्त्रज्ञांच्या मते मेंदू एका वेळी एकच काम चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्याला जास्त कामाला लावलं तर विलक्षण थकवा येतो. चिडचिड वाढते. लहान मुलांच्या बाबतीत तर मेंदूतले पॅटर्न बदलू शकतात. म्हणूनच काही प्रमाणात इ लर्निंग आवश्यक असलं, तरी सर्रास digitization नको. यापुढच्या काळात मोबाईलसारखी गॅझेट्स महत्वाची आहेत असं मानून ती हाताळण्याचं योग्य प्रशिक्षण मिळायला हवं.
  डॉ. श्रुती पानसे


No comments:

Post a Comment