Friday 29 December 2017

सफर- नाशिकमधील 'प्रगत' निफाड बीटची

2016 साली निफाड प्रगत बीट असल्याचे जाहीर झाले. ‘प्रगत बीट’ म्हणजे काय तर शाळेत ज्ञानरचनावादी पद्धतीने शिक्षण दिले जावे, त्यासाठी किमान 20 प्रकारचे साहित्य शिक्षकांनी बनविलेले असावे, हे निकष 100 टक्के पूर्ण करणाऱ्या शाळेला 'प्रगत शाळे'चा दर्जा दिला जातो. आणि 100 टक्के प्रगत शाळा असणारे बीट हे 'प्रगत बीट' म्हणून घोषित करण्यात येते. सातारा जिल्ह्यातले कुमठे हे पहिले प्रगत बीट. त्यापाठोपाठ चंद्रपूरचे ताडाळी बीट, सांगलीचे मिरज बीट, नाशिकचे निफाड बीट असे अनेक बीट प्रगत झाले.निफाड बीटमधील चांदोरीजवळच्या नागापूरच्या जिल्हा परिषद शाळेत गणित आणि मराठीचे ज्ञानरचनावादी खेळ आम्हांला पाहायला मिळाले. यातील 'गणिती संगीत खुर्ची'चा खेळ मनोरंजक आणि खेळता- खेळता गणित शिकविणारा आहे. यात सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात कागदावर लिहिलेले काही आकडे देतात. संगीत खुर्चीत शाळेचा बॅन्ड वाजू लागला की विद्यार्थी खेळू लागतात.
ज्या विद्यार्थ्याला खुर्ची मिळत नाही त्याने इतर विद्यार्थ्यांच्या हातात असलेल्या आकड्यांची बेरीज, वजाबाकी किंवा गुणाकार करून दाखवायचा. इयत्तेनुसार आकड्यांची आणि गणिती क्रियांची काठिण्य पातळी ठरते. काही वेळेला दोन इयत्ता मिळूनही हा खेळ खेळतात आणि प्रेक्षक बनलेले विद्यार्थी गणितं सोडवितात.
याच शाळेतील वैशाली तेलोरे मॅडम यांनी भाषेचे देखील अनेक साधे सोपे खेळ बनविले आहेत. त्यांनी अ ते ज्ञ ही मुळाक्षरे, काना, मात्रा, वेलांटी, उकार ही अकारविल्हे आणि अंकांसाठी त्यांनी चक्क सांकेतिक भाषा बनविली आहे. वर्गात गेल्यानंतर आपले नाव फक्त मॅडमच्या कानात सांगायचे. त्यानंतर तेलोरे मॅडमनी केलेल्या हावभावानुसार विद्यार्थी ते नाव ओळखतात. त्याचप्रमाणे कुठलाही शब्द आणि कुठलीही पाच अंकी संख्यासुद्धा तिसरी- चौथीचे विद्यार्थी ओळखतात. हे करण्यासाठी मॅडम काय हातवारे करीत आहेत, याकडे मुलांना लक्ष द्यावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढली आहे, असे तेलोरे मॅडम सांगतात.
शिवाय पहिली -दुसरीच्या विद्यार्थ्यांना लेखन- वाचनाची सवय व्हावी याकरिता रंगीत साबुदाणे, लग्नातील अक्षतांचे तांदूळ कागदावर चिकटवून विद्यार्थ्यांची नावे लिहून घेतात. वाचनासाठी माशाच्या आकारात कापलेल्या कार्डबोर्ड पेपरवर जोडशब्द लिहिलेले आहेत. प्रत्येक शब्दापाठीमागे धार नसलेल्या ब्लेडचा अर्धा तुकडा जोडलेला आहे. वर्गातील लोहचुंबक लावलेल्या दोऱ्याच्या साहाय्याने विद्यार्थी ते शब्दरुपी मासे उचलतात आणि अवघड शब्दांचे वाचन करतात. कार्डबोर्ड पेपरवर विखुरलेले शब्द वाचून म्हणी तयार करणे, असे अनेक खेळ या शाळेत पाहायला मिळाले. 

 - स्नेहल बनसोडे- शेलुडकर.

No comments:

Post a Comment