Thursday 14 December 2017

कुरुंजीतलं गमभन :शेती आणि त्याला अनुषंगिक कामं

शेती आणि त्याला अनुषंगिक कामं नक्की काय असतात याबद्दलची माझी माहिती बऱ्यापैकी ऐकीव होती. मुळशी तालुक्यात काम करताना बायका पुरुषांना वेळोवेळी शेतात काम करताना बघितलं होतं.
कुरुंजीत गेल्यापासून हे चित्र जास्त स्पष्ट झालं. भातशेतीचं चक्र पूर्ण बघितलं.
शाळेत शिकलो होतो की जून पासून शेतात कामं सुरू होतात. पण कुरुंजीत एक वेगळंच चक्र डोळ्यासमोर आलं.
पौष महिन्याच्या पौर्णिमेला (जानेवारी महिन्यात) देवीची जत्रा भरते. त्यानंतर थोड्या दिवसात लोक ‘कवळं’ गोळा करायला रानात जातात. कवळं म्हणजे झाडांच्या फांद्या. या छाटून मोळ्या बांधून आणल्या जातात. या फांद्या नंतर शेतात वाळण्यासाठी पसरवल्या जातात. उन्हात त्या वाळत राहतात. साधारण शिमग्याच्या आसपास त्यात शेण मिसळून त्या जाळतात. ही भाताची रोपं तयार करण्याची सुरुवात असते. पावसाच्या आधी यात बियाणं पेरतात. पहिल्या पावसानंतर रोपं उगवून येतात. यांना दाढ्या म्हणतात. खरा मान्सून सुरू झाला आणि शेतात भरपूर पाणी साठून चिखल झाला की ही तयार रोपं थोड्या थोड्या रोपांची मूठ तयार करून एका ओळीत किंवा असंच विशिष्ट अंतरावर लावली जातात. लावणी झाली, की मध्ये मध्ये तण काढायचं काम असतं.


साधारण दिवाळीच्या आगेमागे भात पक्व होऊन पिवळा पडतो आणि कापायला तयार होतो.
या तयार भाताची कापणी करून ती रचून ठेवली जातात त्या रचनेला उडवं म्हणतात. मग आपापल्या सोयीनुसार मळणी करून भात वेगळा केला जातो आणि गिरणीतून तो पॉलिश होऊन तांदूळ म्हणून खाण्याजोगा होऊन पोत्यात भरून ठेवला जातो.
हे सगळं मी काही शब्दांत मांडलं खरं... पण लिहितानाच मला शब्दांची निरर्थकता समजत गेली. कित्येक हजार वर्षांतून माणसानं कमावलेलं "traditional wisdom" अजूनही चालत आहे. ती एक अनुभवायची गोष्ट आहे.
बियाणं पेरल्यावर पावसाची उत्सुकतेनं वाट बघणं, रोपं लावून झाल्यावर त्यांना पाहिजे तेवढं पाणी शेतात जमा होतं की नाही, हेही पावसावर अवलंबून असणं, वेगवेगळ्या पातळ्यांवर असलेल्या जमिनींसाठी पाट काढून घालून पाण्याचं नियोजन करणं, तासनतास गच्च पावसात उकिडवं बसून रोपं लावणं, सतत ओणवं उभं राहून तण काढणं, एकाच कुटुंबाच्या मालकीचे जमिनीचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे ती पळापळ, कुणा नातेवाईकांकडे मनुष्यबळ कमी असेल, तर त्यांना त्यांच्या कामात मदत करायला जाणं, जनावरांची मदत घेणं, कापणी मळणीत सगळ्या कुटुंबाचा बैलांसकट सहभाग वगैरे. एक मोठा सृजन सोहळा सुरू असतो आणि यात आख्खी कुटुंबं बुडून, दमून जातात. घरातल्या प्रत्येक सदस्याला यात भाग घ्यायला लागतो. आजी, आजोबा ते नातवंडं सगळी कामाला लागलेली असतात. वरून पाऊस कोसळत असतो. सगळीकडे पाणी, प्रवाह, धबधबे, हिरवाई..

कुरुंजीत बघितलं, की पुरुष आणि बायका दोघं बरोबरीनं राबतात. भातकापणी झाल्यानंतर गावाजवळच्या डोंगरावर वाढलेलं गवत जनावरांसाठी चारा म्हणून आणलं जातं. यासाठी बायका पुरुष सकाळीच निघतात. गवताचे भारेच्या भारे डोक्यावर वाहून आणतात. घरासमोर, शेतात ती रचली जातात. पाऊस आला की घरात पोटमाळ्यावर त्यांची रवानगी होते.
नवीन तांदूळ घरात आला की जत्रेचे वेध लागतात. घरं सारवली जातात, घरातली बाईच भिंतींना पुन्हा लिंपून रंग देते, घरातली सगळी भांडी लख्ख घासून पुन्हा मांडण्यांवर मांडली जातात. अंथरुणं, पांघरुणं धुतली जातात. जत्रेसाठी सगळे नातेवाईक जमा होतात. नवे कपडे घेतले जातात. जत्रा भरते. पहिल्या दिवशी पुरण पोळी, नंतर मटणाची जेवणं होतात आणि मंडळी पांगतात आणि माझ्या मते भाताचं मोसम संपतो. नवीन चक्राला सुरुवात होते.
यातच कोंबडया, शेळ्या, बकऱ्या , गाई, म्हशी पाळल्या जातात. डेअरीला थोडं फार दूध जातं. बैल तर असतातच.
पावसाळ्याच्या आधी सरपण गोळा करून ठेवणं आहे, गोवऱ्या थापून पाणी न लागेल असं रचून ठेवणं आहे. उन्हाळ्यात सांडगे घालणं आहे.
नियमितपणे येणाऱ्या निसर्गाच्या चक्राला प्रतिसाद देत निसर्गाला धरून जगणं हे इथं अजूनही दिसतं.
रंजना बाजी

No comments:

Post a Comment