Monday 25 December 2017

"शेळ्याच मही बँक..."


सकाळचे आठ वाजून गेलेत, कोवळी उन्हं झाडीपट्टीतला गारवा छान शेकून काढतायेत... किशाभाऊ आपल्या शेळ्या रानभर सोडून, उन्हाच्या तिरपिला पाठ लावून बसलेत. किशाभाऊ कराळे, हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील 'करवाडी' या आदिवासी वस्तीवरला एक गरीब मनुष्य. 'अंध' आदिवासी असलेल्या या माणसाच्या आयुष्यात चार पत्र्यांच्या घराशिवाय काहीच प्रॉपर्टी नाही. ना शेतीबाडी, ना पैसाअडका, ना नोकरी ना कामधंदा. आहेत त्या फक्त शेळ्या..!
आई वडील मजुरी करायचे त्यांच्या जीवावर किशाभाऊ कसेबसे सातवीपर्यंत शिकले. पण खाणारी तोंडं मोठी झाली की त्यांना पोसणे कठीण होऊन जातं. परिणामी किशाभाऊंना शाळेची पुस्तक फरताळात टाकून रोजमजुरी करावी लागली. आज त्यांचं वय पन्नाशीकडं झुकलं आहे. साधारण तेराव्या वर्षांपासून त्यांनी मजुरीला सुरुवात केली असावी. किमान 38 वर्षे ते रोज काबाडकष्ट करतात. ना सुट्ट्या, ना पीएफ, ना आरोग्य सुविधा, ना वेतन आयोग त्यांच्या नशिबी फक्त कर्मयोग. रोजमजुरीपासून शेळ्यांपर्यंतच्या प्रवासाची किशाभाऊंची कहाणी संघर्षाने भरलेली आहे. ते सांगत होते, "मी लहानपणी मजुरी करायचो तेंव्हा दिवस बरे होते. मजुरी मिळायची, दाणे मिळायचे, गावं आबादी आबाद होतं. आता काळ बदलला. ज्यांची शेतं आहेत त्यांचीच उपासमार सुरू आहे. मग, आम्हा मजुरांची काय गत? शेतमजुरीत परवडेना तेंव्हा मीही गेलो पुण्यामुंबईला मस कामं केली पण लोकं नुसती राबवून घ्यायची. पदरात काहीच उरायचं नाही. अखेरीला माघारी येऊन ह्या शेळ्या चालू केल्या बघा..."


एकाच्या दोन, दोनच्या चार करत आज किशाभाऊंचा शेळ्यांचा संसार चाळीस वर पोचला आहे. वर्षाकाठी दहा एक शेळ्या त्यांना विक्रीला मिळतात. पाच पन्नास हजार हाती पडतात. घरदार भागतं त्यांचं त्यात. आजही कधीमधी मजुरीनं जातात. त्यावर तेल मीठ भागवतात. गावच्या जंगलात शेळ्या चारून दिवस ढकलणाऱ्या किशाभाऊंच्या मनात स्वतःच्या मुलांना शिकवता आलं नाही, याचं शल्य आहेच. आज तरी शेळ्या नावाच्या बँकेने या माणसाच्या आयुष्यात जगण्याचं चैतन्य निर्माण केलंय.
 - दत्ता कानवटे.

No comments:

Post a Comment